|| मकरंद जोशी

महाराष्ट्राचे वैशिष्टय़ हेच की इथे भूगोल आणि इतिहास हातात हात घालून नांदतात. त्यामुळेच इथल्या भूगोलाचा इतिहास आणि इतिहासाचा भूगोल रोचक, रंजक आणि रमणीय आहे. सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा आणि सागराचा फेसाळता किनारा जसा याची साक्ष देतो त्याचप्रमाणे घाट माथ्यावरची गवताळ कुरणे आणि माळरानेही याची ग्वाही देतात. पुणे जिल्ह्य़ातील मयूरेश्वर-भुलेश्वर, त्यापैकीच!

अनमोल जैवविविधता आणि अलौलिक कलाकुसर याचं दर्शन घडवणारी अनेक ठिकाणं महाराष्ट्रात आहेत त्यातलंच एक म्हणजे पुणे जिल्ह्य़ातलं मयूरेश्वर-भुलेश्वर. महाराष्ट्राच्या निसर्गवैभवात भर घालण्याचं काम गवताळ कुरणांनी म्हणजे ग्रासलॅण्ड्सनी केलं आहे, पण दुर्दैवाने या गवताळ कुरणांचा परीघ दिवसेंदिवस आक्रसत चालला आहे. कुरणांतलं वन्यजीवनही धोक्यात आलं आहे. त्यामुळेच मोरगावजवळील मयूरेश्वर अभयारण्य महत्त्वाचं ठरतं.

१९९७च्या ऑगस्टमध्ये बारामती तालुक्यातल्या सुपे या इतिहासप्रसिद्ध गावाजवळच्या गवताळ कुरणांना अभयारण्याचा दर्जा मिळाला आणि तिथल्या जीवसंपदेला संरक्षण लाभलं. जवळच अष्टविनायकांमधलं मोरगाव असल्याने या अभयारण्याला मयूरेश्वर अभयारण्य असं नाव देण्यात आलं. सुमारे सव्वापाच चौरस किलोमीटरच्या परिसरात वसलेलं हे अभयारण्य आकाराने लहानसं असल्याने दोन दिवसांत सहज पाहून होतं. शुष्क हवामानाच्या परिसरातील काटेरी झुडपं इथे मोठय़ा प्रमाणावर आढळतात. पर्जन्यछायेच्या प्रदेशात असल्याने इथे पाऊसही अगदी बेताचाच पडतो. कवठ, बाभूळ, खैर, काटेसावर, कडुनिंब, शिरीष, बोर अशी झाडं इथे आहेत. मयूरेश्वरचं मुख्य वैशिष्टय़ म्हणजे ‘चिंकारा’ हे हरीण. भारतातील अ‍ॅण्टिलॉप्स म्हणजे कुरंगांच्या गटातील हे हरीण ‘इंडियन गॅझल’ म्हणून ओळखलं जातं. स्वभावाने लाजरे असलेले आणि वेगाने पळणारे चिंकारा देखणे असतात. पाण्याशिवाय अनेक दिवस राहू शकत असल्याने मयूरेश्वरच्या कोरडय़ा, रखरखीत परिसरात ते मजेत राहतात. या हरणांचे शिकारी म्हणजे लांडगे, कोल्हे आणि खोकड यांचाही वावर या अभयारण्यात आहे. मयूरेश्वर हे पक्षी निरीक्षकांचंही आवडतं ठिकाण आहे, कारण फक्त माळरानावरच दिसणारे अनेक पक्षी इथे सहज पाहायला मिळतात. त्यात चंडोल म्हणजे लार्कच्या अनेक जाती आहेत. तसेच रेड वॅटल्ड आणि यलो वॅटल्ड हे टिटवीचे दोन्ही प्रकार दिसतात. मात्र पक्षी निरीक्षकांची नजर शोधत असते सॅण्डग्राऊज म्हणजे भाट तितरला. हा खास माळरानावरचा पक्षी त्याच्या रंगसंगतीमुळे भोवतालच्या परिस्थितीशी इतका एकरूप होऊन जातो की शोधूनही सापडत नाही. तसेच मयूरेश्वरच्या गवताळ कुरणांमध्ये इंडियन कोर्सर म्हणजे धाविक पक्षीदेखील पाहायला मिळतो.

पुण्याहून सोलापूरकडे जाताना चौफुला फाटय़ावरून सुप्याकडे येऊन मयूरेश्वर अभयारण्याला जाता येते. मुंबईहून येत असाल तर एक्सप्रेस वे वरून कात्रजकडे वळून सासवडची वाट धरावी. बोपदेव घाट किंवा दिवे घाट चढून सासवड, नंतर खंडोबाची जेजुरी आणि त्यानंतर मोरगाव मार्गे मयूरेश्वरला जाता येते. मोरगावमध्ये निवासाची सोय होऊ  शकते किंवा मयूरेश्वरजवळ वनखात्याचे तंबू आहेत, त्यात राहता येतं.

मयूरेश्वर अभयारण्याजवळ अध्र्या तासाच्या अंतरावर भुलेश्वराचं प्राचीन आणि कोरीव मंदिर आहे. मूळ मंदिर यादवकाळातलं मानलं जातं. मात्र १७व्या शतकात मुरार जगदेव याने त्याभोवती तटबंदी उभारून किल्ले दौलतमंगळ किंवा मंगळगड हा टेहळणीचा किल्ला उभारला. पुढे १८व्या शतकात पेशवे आणि छत्रपती शाहू महाराजांचे गुरू श्री ब्रह्रोंद्रस्वामी धावडशीकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे मंदिराच्या बांधणीतील फरक स्पष्ट दिसतो. उंच टेकडीवर असल्याने दूरवरूनच मंदिराचं शिखर दिसू लागतं. मात्र आतल्या कलाकारीची कल्पना बाहेरून येत नाही. भिंतीवरची कोरीव शिल्पं आणि नाजूक नक्षीकामाने सजवलेले स्तंभ यामुळे डोळ्यांचं पारणं फिटतं. त्यात भर पडते ती गाभाऱ्यातील प्रसाद सेवनाच्या आख्यायिकेची.

या मंदिरातल्या शिवशंकराच्या पिंडीवर जो मुखवटा आहे, त्यामागच्या पोकळीत प्रसादाचे पेढे ठेवल्यावर त्यातील एक पेढा गायब होतो असा भाविकांचा समज आहे. मात्र या आख्यायिकेपेक्षा अनाम कारागिरांनी काळ्या पत्थरातून अप्रतिम कलाकृती घडवण्याचा केलेला चमत्कार संस्मरणीय ठरतो. रामायण, महाभारतातील प्रसंग, स्त्रीरूपातील गजानन (लंबोदरी), साजशृंगार करणाऱ्या, वादन-नर्तनात मग्न झालेल्या स्त्रिया अशा शिल्पांनी नटलेल्या या मंदिरातील नंदीची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते. प्रदक्षिणा मार्गावरच्या झरोक्यांची वेगवेगळ्या प्रकारची नक्षीही तुमचं पाऊल अडवते. मात्र आक्रमणांत तोडफोड झाल्यामुळे भुलेश्वर मंदिरातील अनेक शिल्पं भंगलेली आहेत. पुण्याहून सोलापूरकडे जाताना महामार्गावरून यवत गावामध्ये आत शिरून भुलेश्वरकडे जाता येते. शनिवार-रविवारची सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी मयूरेश्वर आणि भुलेश्वर सहलीचा बेत उत्तम. एकाच फेरीत निसर्गाचे वैभव आणि कलेचा वारसा पाहण्याची संधी या सहलीत नक्की मिळेल.

makarandvj@gmail.com