News Flash

निरोगी जीवनाचा ध्यास

सध्याची बदललेली जीवनशैली पाहता आरोग्य हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.

|| नमिता धुरी/ मानसी जोशी

सध्याची बदललेली जीवनशैली पाहता आरोग्य हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. नुकत्याच पार पडलेल्या या दिनाच्या निमित्ताने तरुण पिढीच्या आरोग्यविषयक जाणिवेचा आढावा.

‘आमच्या काळात आम्ही शुद्ध खायचो, शुद्ध हवेत फिरायचो. म्हणून आजही आम्ही सुदृढ आहोत’, अशा प्रकारचे संवाद आपल्याला वयोवृद्धांकडून बऱ्याचदा ऐकायला मिळतात. मात्र आजकालच्या तरुण मुला-मुलींची स्थिती याच्या अगदी विरुद्ध असते. महाविद्यलयात असल्यापासूनच त्यांना गुडघेदुखी, पाठदुखी, पित्त यांसारखे आजार जडतात. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे, सध्याचे प्रदूषण आणि दुसरे म्हणजे सर्वच क्षेत्रांत वाढलेली स्पर्धा. प्रदूषणामुळे श्वसनविकार जडतात, बदलेल्या जीवनशैलीमुळे घरचे कमी आणि बाहेरचे प्रदूषित खाणे जास्त होते. यामुळे पचनसंस्था बिघडते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे शारीरिक दुर्बलता येते. तसेच परीक्षा, प्रोजेक्ट सबमिशन्स, विविध स्पर्धा, ऑफिसमधल्या डेडलाइन्स या सगळ्याला तोंड देताना प्रचंड मानसिक ताणातून जावे लागते. हरवत चाललेला कौटुंबिक संवाद आणि मोबाइलचा अतिवापर याचाही परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.

मध्यंतरीच्या काळात तरुण मुले या सगळ्या गोष्टींना अपरिहार्यता समजत होती. मात्र अलीकडे आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे. शारीरिक आणि मानसिक निरोगीपण हे परस्परांवर अवलंबून आहे. निरोगी आरोग्यासाठी तीन घटक आवश्यक असतात.

आहार, व्यायाम आणि मानसिक संतुलन. काही अशी तरुण मंडळी आहेत जी न चुकता शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वेळ काढतात. सध्या योगसाधना हा प्रकार लोकप्रिय होतो आहे. यात शरीर आणि मन दोघांचाही व्यायाम होतो. शिवाय व्यायामशाळेत अधूनमधून होणारे अपघात पाहता योगसाधना हा सुरक्षित व्यायामप्रकार आहे. सध्या तरुणाईत गणवेशधारी करिअरचे आकर्षण वाढते आहे.

सुरक्षा दलांमध्ये जायचे असेल तर सुदृढ राहण्यावाचून पर्याय नसतो. त्याची काळजी महाविद्यलयीन जीवनापासूनच घेतली जाते. काहींचे पालक जागरूक असतील तर लहानपणापासूनच व्यायामाची सवय लावली जाते.

काही दिवसांपूर्वीपर्यंत सडपातळ बांधा म्हणजे चांगले आरोग्य हे चित्रपटांनी लोकांच्या मनावर ठसवले होते. बारीक होणे म्हणजे सुदृढता हा गैरसमज रूढ झाला होता.

मुले चुकीच्या पद्धतीने बारीक होत होती. मात्र हल्ली चित्रपटांमधून ‘फिटनेस’ या गोष्टीला महत्त्व दिलेले असते. पडद्यावर दिसणारे अभिनेता, मॉडेल्स यांचे आकर्षण तरुण मुलांमध्ये आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणाऱ्या महिला खेळाडूंना पाहून मुलींमध्येही शरीराविषयी जागरूकता वाढते आहे. मुलींनी फक्त नाजूक दिसावे ही मानसिकता खेळाडूंमुळे बदलत आहे.

हे करा

१) स्वत:साठी किमान ४५ मिनिटे काढा.

२) व्यायाम करा.

३) मोबाइलचा कमीत कमी वापर करा.

४) छंद जोपासा.

५) चांगल्या मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवा.

६) पुरेशी झोप घ्या.

आजकाल चित्रपटांचा प्रभाव तरुणाईवर दिसून येतो. हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल आणि अक्षय कुमार आदी अभिनेते फिटनेसबद्दल सजग आहेत. ते यूटय़ूब,  इंस्टाग्राम यावर जिममधले फोटो, व्हिडीयो पोस्ट करतात. यामुळे तरुण प्रभावित होतात आणि त्यांच्यासारखे शरीर बनविण्याचा अट्टहास धरतात. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने शरीर कमावतात. शरीर कमावले म्हणजे मी फिट हा गैरसमज मुलांमध्ये असतो. परंतु एखादा बारीक चणीचा मुलगासुद्धा निरोगी असू शकतो.   – केदार रानडे,  विद्यार्थी.     

काही वेळा फक्त लोकांना दाखवण्यासाठी व्यायाम केला जातो. पण फक्त व्यायाम न करता शरीराची स्वच्छता ठेवणे, तीन किंवा सहा महिन्यांनी शरीराची तपासणी करणे हे सुद्धा शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.    – दत्ता गायकवाड, फिटनेस तज्ज्ञ.

आरोग्यासाठी शैक्षणिक संस्थांचा पुढाकार

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शैक्षणिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. महाविद्यालये, शाळांमध्ये विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालयात मानसशास्त्र केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येते. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात. तसेच वर्षभर स्पर्धा, तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्यात येते, असे ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या वेदवती परांजपे यांनी सांगितले.

कंपन्यांतही उपक्रम

कंपनीत सकाळी दिवसातील एक तास कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात येतो. यावेळी कर्मचाऱ्याला आवडीचे काम करण्याची मुभा असते. या वेळात कर्मचारी वेब सीरिज बघतात किंवा योगासने, झुंबा यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात. कर्मचाऱ्यांपैकी एखादा स्टँडअप कॉमेडी करतो. यामुळे शरीर आणि मन प्रसन्न राहण्यास मदत होते, असे राहुल पाटील यांनी सांगितले.

ऑनलाइन आरोग्य

आरोग्यासंबंधी माहिती दोणारे अ‍ॅप्स, उपकरणे, गॅजेट्स तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे डिजिटली आरोग्याविषयी काळजी घेण्यात येत आहे. मी मोबाइलमध्ये स्टेप काऊंटर नावाचे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून माझ्या हृदयाची स्पंदने, संपूर्ण दिवसात चालले गेलेले अंतर याविषयी माहिती मिळते. आणि एमआय बँड घेतल्याने आरोग्याची काळजी घेणे सहज सोपे झाले आहे, असे वैष्णवी वैद्य हिने सांगितले.

चालणे आणि गपाष्टक!

शहरातील मुख्य ठिकाणी असलेल्या उद्यानांमध्ये किंवा मरिन ड्राइव्ह, शिवाजी पार्क, ठाण्यातील तलावपाळी, उपवन तलाव येथे तरुणांचे समूह धावताना, व्यायाम करताना दिसतात. शहरातील गृहसंकुलांनी व्यायामशाळा, छोटे उद्यान वा एक जागा यासाठी राखून ठेवलेली असते. येथे तरुण मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे सकाळी, सायंकाळी गप्पा मारताना, चालताना, धावताना दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2019 1:14 am

Web Title: the importance of exercising for health
Next Stories
1 कोळंबीचे लोणचे
2 काळजी उतारवयातली : मूत्रपिंडाचे विकार
3 इन्हेलरचा वापर समज-गैरसमज
Just Now!
X