व्हिंटेज वॉर : वैभव भाकरे

आपल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या टेस्लाने जगासमोर आणलेल्या सायबर ट्रकने सर्वानाच अवाक केले आहे. सायबर ट्रकबाबत परस्परविरोधी प्रतिक्रिया जगभरातून येत आहेत. गाडीचा आकार, बॉडी ही बाजारात असलेल्या कोणत्याही वाहनाच्या तुलनेत अत्यंत क्रांतिकारी आहे, असे काहींनी म्हटले आहे, तर अनेकांनी या गाडीला कुरूप असे म्हटले आहे.

पिकअप ट्रक हा प्रकार आपल्याकडे म्हणजे भारतीय उपखंडामध्ये केवळ व्यावसायिक वापरासाठी वापरला जातो. त्यामुळे पिकअप ट्रकबद्दल सामान्य ग्राहकांना कुतूहल वाटण्याचे काही कारणच नाही. मात्र अमेरिकेत पीकअप ट्रकचा इतिहास हा १०० वर्षे जुना आहे. काळाच्या ओघात साहजिकच या पिकट्रकमध्ये अनेक आमूलाग्र बदल झाले. पण पुढे चालकाचे केबिन आणि मागे सामान ठेवायला जागा अशी ही रचना कायम राहिली. अवजड सामान वाहून नेणारे म्हणून या वाहनाला पिकअप हे नाव देण्यात आले. पहिला लोकप्रिय पिकअप ट्रकचा बहुमान फोर्ड मॉडेल टी रनअबाऊटला जातो. १९२०च्या दशकात या मोटारीची निर्मिती करण्यात आली होती.

शैली, मॉडेल, उद्देश आणि भौगोलिक परिसरानुसार हे ट्रक वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. बदलत्या काळानुसार ट्रकचा त्यांच्या वजन वाहून नेण्याच्या क्षमतेनुसार उल्लेख केला जाऊ  लागला. अध्र्या टनाचा ट्रक, एक टनाचा ट्रक असे या वाहनाला संबोधले जाऊ  लागले. १९६०च्या दशकात केवळ अर्धा टन वाहून नेण्याची क्षमता असणारे ट्रक आज किती तरी जास्त पटीने वजन वाहून नेऊ  शकतात. व्यावसायिक वाहन म्हणूनच वापरात असलेले हे ट्रक. अमेरिकेत काही वेळेस मुख्य वाहन म्हणून देखील वापरण्यात येते. छोटय़ा शहरांमध्ये अशा प्रकारच्या ट्रकचा वापर अधिक केला जातो. डेम्लर, फोर्ड, वोल्वो या प्रसिद्ध ट्रक उत्पादक कंपन्यांना स्पर्धा देण्यासाठी एक नवी कंपनी मैदानात उतरत आहे.

आपल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या टेस्लाचे हे नवे वाहन. अभूतपूर्व असे आहे. सहसा अभूतपूर्व, अतुल्य, अद्वितीय हे शब्द सर्रास वापरले जातात. मात्र टेस्लाने जगासमोर आणलेल्या सायबर ट्रकने सर्वानाच अवाक केले आहे. सायबर ट्रकबाबत परस्परविरोधी प्रतिक्रिया जगभरातून येत आहेत. गाडीचा आकार, बॉडी ही बाजारात असलेल्या कोणत्याही वाहनाच्या तुलनेत अत्यंत क्रांतिकारी आहे, असे काहींनी म्हटले आहे, तर अनेकांनी या गाडीला कुरूप असे म्हटले आहे. या ट्रकवर परस्परविरोधी प्रतिक्रिया जरी येत असल्या तरी जगाचे लक्ष या ट्रकने वेधून घेतले आहे. चार-पाच वर्षांच्या मुलाचा गाडीचे चित्र काढण्याचा प्रयत्न फसल्यावर कागदावर जे काही असेल, त्यासारखे या गाडीचे डिजाईन आहे.

टेस्ला सायबर ट्रक हा अतिटणक अशा स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आला असून त्याला आर्मर्ड ग्लास वापरण्यात आली आहे. गाडीचे युनिबॉडी डिजाईन अत्यंत मजबूत असल्याचा दावा कंपनीने केला असून त्यासंबंधी प्रात्यक्षिके देखील अनावरणाच्या प्रसंगी दाखवण्यात आली.

टेस्लाचा सायबर ट्रक तीन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. सिंगल मोटर आरडब्ल्यूडी, डय़ुअल मोटर एडब्ल्यूडी, ट्राय मोटार एडब्ल्यूडी असे तीन प्रकार या ट्रकचे असून तिन्ही पर्यायांची वेगवेगळी ताकद आहे. या ट्रकची मालवाहू क्षमता ३ टन ते ७ टन एवढी आहे. ट्रकमध्ये रिअरव्हील ड्राइव्ह, ऑल व्हील ड्राइव्ह असे पर्याय आहेत. हा ट्रक इलेक्ट्रिक आहे. एका चार्जमध्ये हा ट्रक त्याच्या मॉडेलनुसार ४०० ते ८०० किमीपर्यंतचा प्रवास करू शकतो. त्याचप्रमाणे मॉडेलप्रमाणे या ट्रकला ० ते ६० किमी प्रतितास एवढा वेग गाठायला ६.५ ते २.९ सेकंद एवढा वेळ लागतो. अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचे टेस्ला यांनी सांगितले आहे. या ट्रकची किंमत ३९,९०० डॉलर ते ४९,९००च्या दरम्यान आहे. सायबर ट्रकमध्ये अनुकूल सस्पेन्शन प्रणाली आहे. या गाडीची उंची गरजेप्रमाणे ४ इंच कमी किंवा जास्त केली जाऊ  शकते. या गाडीच्या केबिनमध्ये ६ जण बसू शकतात. सेंट्रल कन्सोलमध्ये १७ इंची पॅनल देखील देण्यात आले आहे.

या ट्रकचे उत्पादन २०२०च्या शेवटी सुरू होण्याचा अंदाज आहे. सायबर ट्रक प्रिऑर्डरसाठी उपलब्ध आहे. यासाठी १०० डॉलर एवढी किंमत भरावी लागणार आहे. गाडीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून एका आठवडय़ातच या ट्रकसाठी २ लाख ऑर्डर आल्या आहेत.  डिजाईन आणि तंत्रज्ञानाच्याबाबतीत क्रांतिकारी असलेला हा ट्रक रस्त्यावर काय कामगिरी करतोय याची उत्सुकता मोटारविश्वाला आहे.

vaibhavbhakare1689@gmail.com