News Flash

अबू सिम्बलची मंदिरे   

प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन-दोन असे ६५ फूट उंचीचे चार भव्य दगडी पुतळे आहेत.

इजिप्तमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठिकाण म्हणजे अबू सिम्बलचे जोड मंदिर!

विजय दिवाण

पिरॅमिड्सच्या खालोखाल इजिप्तमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठिकाण म्हणजे अबू सिम्बलचे जोड मंदिर! ख्रिस्तपूर्व १२६४ ते १२२४ या काळात इजिप्तचा तत्कालीन राजा रामेसेस् (दुसरा) याच्या कारकीर्दीत हे मंदिर संकुल निर्माण केले गेले असावे. तुर्कस्तानातील अ‍ॅनातोलिया प्रदेशातील हित्ती लोकांशी झालेल्या युद्धात रामेसेस् राजाने मिळवलेल्या विजयाच्या स्मृत्यर्थ ही मंदिरे बांधली गेली.

या जोड मंदिरांतील पहिले मंदिर मोठे आहे. ते ‘रा-होराक्ती’ आणि ‘ताह’ या प्राचीन इजिप्शियन देवांच्या आणि देवासमान असा राजा रामेसेस यांच्या गौरवार्थ उभे केलेले आहे. तर दुसरे थोडे लहान मंदिर आहे. ते ‘हथोर’ नामक एका देवतेच्या आणि राणी नेफेरतारीच्या गौरवार्थ बांधलेले आहे. वाळवंटात सतत उठणाऱ्या वादळांमुळे काळाच्या ओघात ही मंदिरे वाळूने झाकली गेली. त्यामुळे ख्रिस्तपूर्व १२२४ पासून इसवीसन १८१३ पर्यंत तब्बल ३ हजार ३७ वर्षे ही मंदिरे अदृष्य होती. पुढे इसवीसन १८१३ मध्ये बर्कहार्ड नावाच्या एका स्विस संशोधकाने इजिप्तमध्ये जाऊन वाळवंटात गाडली गेलेली ही अतिप्राचीन मंदिरे शोधली. काही अभ्यासक असेही सांगतात की ज्या स्थानिक अरबी मुलाने मंदिरांची ती जागा बर्कहार्ड या स्विस संशोधकाला दाखवली, त्या मुलाचे नाव अबू सिम्बल होते. त्यामुळे त्या संशोधकानेच त्या जागेचे नाव अबू सिम्बल असे ठेवले.

कैरोतून अबू सिम्बलला जाण्यासाठी थेट विमानसेवा आहे. त्याचप्रमाणे कैरोहून आसवानपर्यंत रेल्वेने जाऊन, आसवानपासून बसने अथवा नाईल नदीतील क्रूझबोटीने अबू सिम्बलला जाता येते. हे गाव मुळात एका टेकडीवजा उंचवटय़ावरचे छोटे खेडे आहे. आजही तिथे पर्यटकांसाठी फारशा सोयी नाहीत. आपण ज्यांना अबू सिम्बलची मंदिरे म्हणतो ती वस्तुत: राजा रामेसेस् आणि राणी नेफेरतारीची मंदिरे आहेत.

पहिल्या आणि मोठय़ा मंदिराची उंची ९८ फूट आणि लांबी ११५ फूट आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन-दोन असे ६५ फूट उंचीचे चार भव्य दगडी पुतळे आहेत. हे चारही पुतळे सिंहासनस्थ रामेसेस् राजा (दुसरा) याचे आहेत. या चार पुतळ्यांच्या खाली रामेसेस् राजाने ज्यांचा पराभव केला त्या नुबियन, लीबियन आणि हित्ती लोकांच्या कोरीव मूर्ती आहेत. राजा रामेसेसचे कुटुंबीय आणि त्याच्या संरक्षक देवता यांच्या आकृती खाली कोरलेल्या आहेत. राजाच्या शौर्याची काही प्रतीकेही त्या दगडांत कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या दुतर्फा भव्य पुतळ्यांच्या मधोमध मंदिराच्या आत जाण्याचा रस्ता आहे. आतल्या सभागृहाच्या भिंतींवरही राजाच्या आयुष्यातील विविध प्रसंगांची शिल्पचित्रे आहेत. अबू सिम्बलचे हे पहिले भव्य मंदिर ‘रामेसेस् राजाचे मंदिर’ म्हणून ओळखले जाते.

तिथले दुसरे मंदिर छोटे आहे. ते सुमारे ४० फूट उंच आणि ९२ फूट लांब असे आहे. या दुसऱ्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरदेखील दोन्ही बाजूंना तीन तीन, असे एकूण सहा मोठे दगडी पुतळे आहेत. प्रत्येक बाजूच्या तीन पुतळ्यांमध्ये दोन पुतळे राजाचे, तर एक पुतळा राणी नेफेरतारीचा आहे. सर्व सहा पुतळे प्रत्येकी ३२ फूट उंचीचे आहेत. त्या काळात इजिप्तमध्ये पुरुषप्रधान संस्कृती होती. स्त्रियांना दुय्यम स्थान असे. राजाला तर लोक देवदूत (फारोह) मानत. परंतु या मंदिरामध्ये मात्र राजा व राणी यांना समान दर्जा दिलेला दिसतो. या दोहोंच्या मूर्ती एकाच उंचीच्या आणि एकाच आकाराच्या आहेत. अबू सिम्बलचे हे छोटे मंदिर आणखी एका कारणाने वैशिष्टय़पूर्ण मानले जाते. एखाद्या राजाने स्वत:च्या राणीच्या नावे मंदिर उभे करण्याचे इजिप्तच्या इतिहासातले हे दुसरे उदाहरण होय. त्याआधी ख्रिस्तपूर्व १३५३ ते १३३६ या काळात फारोह अखेनातोन या राजाने त्याची राणी नेफेरतारी हिच्या नावाने एक मंदिर बांधले होते. येथील छोटय़ा मंदिरात अनेक ठिकाणी राजा आणि राणी ‘हथोर’ नामक देवतेला नैवेद्य अर्पण करतानाची शिल्पे आहेत. प्राचीन इजिप्तमध्ये अबू सिम्बल हे ठिकाण मुळातच ‘हथोर’ या देवीचे स्थान होते. रामेसेस् राजाने स्वत:चे आणि स्वत:च्या राणीचे मंदिर उभे करण्यासाठी या गावाची निवड कदाचित हेतुपुरस्सर केली असावी. कारण ही दोन मंदिरे जेव्हा उभी राहिली तेव्हापासूनच प्राचीन इजिप्तमधील लोक राजा रामेसेसला देव आणि राणी नेफेरतारी हिला देवी मानू लागले. अबू सिम्बलची ही दोन्ही मंदिरे पूर्वाभिमुख आहेत. त्यामुळे २१ फेब्रुवारी आणि २१ ऑक्टोबरला उगवत्या सूर्याची किरणे मोठय़ा मंदिराच्या गाभाऱ्यांपर्यंत थेट पोहोचतात, आणि त्यामुळे गाभाऱ्यात असणारे राजा रामेसेस् आणि सूर्यदेव आमून यांचे पुतळे उजळून निघतात. याच दोन तारखा अनुक्रमे राजा रामेसेसच्या जन्मदिनाच्या आणि राज्याभिषेकाच्याही तारखा आहेत, असे तेथील लोक मानतात. परंतु त्याचे कोणतेही पुरावे आजपर्यंत उपलब्ध नाहीत.

समूळ स्थलांतर

ही मंदिरे अबू सिम्बल गावापासून नाईल नदीच्या पात्रालगत होती. नाईल नदीवर आसवान येथे धरण बांधण्याचा निर्णय झाला. त्यामुळे तयार होणाऱ्या जलाशयात ही मंदिरे बुडण्याचा धोका होता. त्यामुळे धरण बांधून पूर्ण होण्याआधीच ही मंदिरे समूळ उखडून अबू सिम्बलला स्थलांतरित करण्यात आली. हा प्रकल्प युनेस्कोने प्रायोजित केला होता. त्यासाठी दोन्ही मंदिरांचे पायापासून माथ्यापर्यंतचे सर्व दगड विलग करण्यात आले. त्यांच्यावर क्रमांक लिहून ते अबू सिम्बलला नेण्यात आले आणि त्या नव्या जागी जुन्याच क्रमाने रचून मंदिरे पुन्हा जशीच्या तशी उभरण्यात आली. मूळ मंदिराखाली असलेली टेकडीसुद्धा दगड-माती रचून कृत्रिमरीत्या तयार केली. हा संपूर्ण प्रकल्प युनेस्कोने प्रायोजित केला होता. तेव्हापासून नव्या जागी स्थलांतरित केलेली ही मंदिरे ‘अबू सिम्बलची मंदिरे’ म्हणून ओळखली जाऊ  लागली.

vijdiw@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 3:02 am

Web Title: the salvage of the temples of abu simbel
Next Stories
1 दोन दिवस भटकंतीचे
2 खाद्यवारसा : कांद्याचे लोणचे
3 सुंदर माझं घर : खोक्यातले कोडे
Just Now!
X