विद्यापीठ विश्व : प्रथमेश आडविलकर

विद्यापीठाची ओळख – ऑस्ट्रेलियामधील एक महत्त्वाचे विद्यापीठ असलेले सिडनी विद्यापीठ (द युनिव्हर्सटिी ऑफ सिडनी) हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले बेचाळिसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरामध्ये स्थित असलेले हे विद्यापीठ त्या देशामध्ये स्थापन केले गेलेले पहिले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १८५० साली करण्यात आली. सिडनी विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. सिडनी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस हा जगातल्या दहा सर्वोत्कृष्ट विद्यापीठांपकी एक आहे. ‘द स्टार्स चेंज, माइंड रिमेन्स सेम’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. सिडनी विद्यापीठामध्ये सध्या जवळपास पाच हजारपेक्षा अधिक तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आणि प्रशासकीय वर्ग आहे तर जवळपास चार हजार डॉक्टरल विद्यार्थ्यांसहित साठ हजारपेक्षाही अधिक पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाचे इतर कॅम्पस सिडनीमध्येच आहेत. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, शैक्षणिक आणि संशोधन केंद्रे व तत्सम कॅम्पस ऑस्ट्रेलियामध्ये ठिकठिकाणी स्थित आहेत.

अभ्यासक्रम – सिडनी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे तीन, चार किंवा त्याहून अधिक वर्षांच्या कालावधीचे पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम एक वर्षांपासून ते चार वर्षांपर्यंतच्या कालावधीचे आहेत. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी आणि प्रोफेशनल डॉक्टरेट अशा दोन पद्धतीने पीएचडी पदवी विद्यार्थ्यांना ग्रहण करता येते. सिडनी विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची संख्या साडेचारशेपेक्षा जास्त आहे. सिडनी विद्यापीठामध्ये एकूण सहा फॅकल्टी-शैक्षणिक विभाग आणि तीन युनिव्हर्सटिी स्कूल्स आहेत. विद्यापीठात पदवी स्तरावर आर्ट्स अ‍ॅण्ड सोशल सायन्स, बिझनेस, इंजिनिअिरग, हेल्थ सायन्सेस, मेडिसिन, अ‍ॅण्ड हेल्थ, सायन्स हे शैक्षणिक विभाग आहेत तर आíकटेक्चर, डिझाइन अ‍ॅण्ड प्लॅनिग, कन्झव्‍‌र्हेटेरियम ऑफ म्युझिक आणि लाँ हे युनिव्हर्सटिी स्कूल्स आहेत. याबरोबरच पदव्युत्तर स्तरावर आíकटेक्चर, डिझाइन अ‍ॅण्ड प्लॅनिग, आर्ट्स अ‍ॅण्ड सोशल सायन्स, बिझनेस, इंजिनीअिरग अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्सेस, मेडिसिन अ‍ॅण्ड हेल्थ, एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशल वर्क, सायन्स, म्युझिक आणि लॉ हे नऊ विभाग आहेत.

सुविधा – सिडनी विद्यापीठाच्या या परिसरामध्ये विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या निवासाच्या सोयीसाठी ‘हॉल्स ऑफ रेसिडन्सेस’ म्हणजेच वसतिगृहांच्या माध्यमातून केलेले आहे. याशिवाय सर्व सोयीसुविधांनी युक्त व आधुनिक जीवनशैलीने सुसज्ज अशी निवासी महाविद्यालये आहेत. विद्यापीठाचे मोठे ‘द युनिव्हर्सटिी ऑफ सिडनी लायब्ररी’ ग्रंथालय असून त्यामध्ये स्वतंत्र अकरा ग्रंथालये आहेत. याशिवाय विद्यापीठाची ‘सेंटर फॉर कन्टिन्युइंग एज्युकेशन’ हे प्रौढ शिक्षण केंद्र, निकोलस म्युझियम आणि मॅक्ले म्युझियम ही संग्रहालये, ‘द युनिव्हर्सटिी आर्ट कलेक्शन’ आणि ‘द युनिव्हर्सटिी आर्ट गॅलरी’ या गॅलरीज आहेत. याशिवाय विद्यापीठाच्या आवारात आरोग्य केंद्र, आंतरराष्ट्रीय आरोग्य विमा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीपूर्व तयारी अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन केंद्र, कॅफे, अद्ययावत व्यायामशाळा, बगीचे इत्यादी बाबी आहेत. विद्यापीठ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विविध स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात आणि ‘ऑन कॅम्पस जॉब्ज’ यांसारख्या वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब केला जातो. विद्यापीठाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीला वाहून घेतलेले विविध सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्लब्ज आहेत.

 

वैशिष्टय़

सिडनी विद्यापीठ हे ऑस्ट्रेलियातील एक प्रमुख संशोधन विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे संशोधन जागतिक स्तरावर गौरवले गेले आहे. जगभरातील विविध अशा नव्वद विषयांतील संशोधनासाठी सिडनी विद्यापीठ हे एका अर्थाने ‘विद्येचे माहेरघर’ आहे. विद्यापीठातील ‘चार्ल्स पíकन्स सेंटर, द ब्रेन अ‍ॅण्ड माइंड सेंटर, द युनिव्हर्सटिी ऑफ सिडनी नॅनो सेंटर’ ही प्रमुख संशोधन केंद्रे आरोग्य, हवामान बदल आणि अन्न सुरक्षा यांसारख्या जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर अविरत संशोधन करत आहेत. सिडनी विद्यापीठ हे ‘ग्रुप ऑफ एट, सीईएमएस, द असोसिएशन ऑफ पॅसिफिक रिम युनिव्हर्सटिीज (एपीआरयू) आणि वर्ल्डवाइड युनिव्हर्सटिीज नेटवर्क’ इत्यादी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांचे सदस्य आहेत. या विद्यापीठातील विद्यार्थी-प्राध्यापकांना आतापर्यंत पाच नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत. ऑस्ट्रेलियातील सात पंतप्रधान आणि दोन गव्हर्नर जनरल हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाने आतापर्यंत ११० ऱ्होड्स स्कॉलर्स तर १९ गेट स्कॉलर्स निर्माण केलेले आहेत. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संपर्काचा आजी विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होतो. विद्यापीठातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याचे प्रमाण अतिशय उत्तम आहे. रोजगार मिळवण्याच्या निकषामध्ये सिडनी विद्यापीठाचा जगामध्ये पाचवा क्रमांक आहे. पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही स्तरांवरील विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून इंटर्नशिप्सची संधी दिली जाते.

सिडनी विद्यापीठ हे एक प्रतिष्ठित विद्यापीठ आहे.  माजी विद्यार्थ्यांनी या विद्यापीठाची एक उत्तम प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार केलेली आहे. ज्याचा फायदा आजी विद्यार्थ्यांना निश्चितच होतो. त्यामुळे मलासुद्धा  तंत्रज्ञान क्षेत्रातील एका प्रसिद्ध सल्लागार कंपनीकडून इंटर्नशिप मिळाली, तेही कोणताही अनुभव नसताना.  मला विद्यापीठातील अभियांत्रिकी विभाग सर्वोत्तम वाटतो. कारण येथे शिक्षकांकडून केवळ पुस्तकी शिक्षणावरच नव्हे तर प्रात्यक्षिकांवर विशेष भर दिला जातो.   विषयाची एकूण समज आणि तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासाठी या गोष्टीचा निश्चितच फायदा होतो.’’

राम प्रसाद, डेटा सायंटिस्ट (माजी विद्यार्थी, सिडनी विद्यापीठ ).  संकेतस्थळ https://sydney.edu.au

itsprathamesh@gmail.com