राजगड, रायगड या किल्ल्यांनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी तामिळनाडूतील जिंजी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७७ मध्ये जिंजी किल्ला जिंकून घेतला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोघलांनी रायगडाला वेढा घातला. त्यामुळे राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. या भक्कम, बेलाग किल्ल्याला राजधानी बनवून त्यांनी ९ वर्षे राज्यकारभार केला. चेन्नईपासून १६० किलोमीटरवर जिंजी गाव आहे. गावाबाहेर तीन किल्ले आहेत. राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रायन दुर्ग या तीन किल्ल्यांचा मिळून जिंजीचा किल्ला बनला आहे.

जिंजीचा किल्ला व्यवस्थित पाहाण्यासाठी दोन दिवस लागतात. राजगिरीला राजाचा किल्ला म्हणून स्थानिक लोक ओळखतात. पुरातत्त्व खात्याने हा किल्ला आणि परिसर व्यवस्थित राखलेला आहे. सकाळी ९ वाजता किल्ल्याचे दरवाजे उघडतात आणि ५ वाजता बंद होतात. बाहेरच्या तटबंदीत पाँडेचरी दरवाजा आणि वेल्लोर दरवाजा असे दोन दरवाजे आहेत. इथे पुरातत्त्व खात्याने किल्ल्याच्या परिसरातून जमा केलेल्या मूर्तीचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. तिसरा दरवाजा ओलांडून किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा आवाका आपल्या ध्यानात येतो. राजगिरी किल्ला ३ टप्प्यांत पसरलेला आहे. पहिल्या टप्प्यात मैदानी भाग असून त्यावर सात मजली मंगल महाल, धान्य कोठारे, दारू कोठार, अश्वशाळा, सदर इत्यादी महत्त्वाच्या आणि भव्य वास्तू आहेत. दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्याचा दुसरा टप्पा प्रचंड आकाराच्या खडकांची उतरंड असलेल्या डोंगराचा आहे. या खडकांमधील माती पावसामुळे कधी काळी वाहून गेली आहे. त्यामुळे या टप्प्यात तुरळक झाडे आहेत. तामिळनाडूच्या गरम आणि दमट वातावरणात हा टप्पा चढून जाणे म्हणजे आव्हान आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान जाणे उत्तम. या टप्प्यात खडक फोडून केलेली वाट, खडकांच्या आधाराने बांधलेली तटबंदी आणि ८ दरवाजे आहेत. हा टप्पा चढून गेल्यावर माचीसारखा सपाट भाग लागतो. तिथे झाडी, मंदिर, वाडे आणि तलाव आहेत. शेवटचा टप्पा म्हणजे बालेकिल्ला हा एका मोठय़ा नैसर्गिक खंदकाने किल्ल्यापासून वेगळा झाला आहे. त्यावर पक्का पूल आहे. या पुलावरून बालेकिल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे. पायथ्यापासून बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी १३ प्रवेशव्दारे पार करावी लागतात. बालेकिल्ल्यावर धान्य व दारू कोठार, मंदिर आणि तीन मजली महाल आहे. राजगिरी हा या भागातील सर्वोच्च डोंगर असल्याने तिथून दूरवरचा प्रदेश, कृष्णगिरी आणि चंद्रायन दुर्ग दिसतात.

kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास
Harsh Goenka shares video
ग्वाल्हेरच्या राजवाड्यात राजेशाही जेवणाचा थाट! पाहा, कसे वाढले जाते महाराजांचे ताट; हर्ष गोयंकांनी शेअर केला Video

शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकल्यावर सर्व चौक्या आणि तटबंदी पाडण्यासाठी पाँडेचेरीतील फ्रेंचांकडे सुरुंग लावणारे कसबी कामगार मागितल्याची नोंद फ्रेंच कागदपत्रांत आहे. फ्रेंचांनी महाराजांना माणसे दिली नाहीत; पण महाराज स्वत:च दुर्गस्थापत्यकार असल्याने त्यांनी हे किल्ले पुन्हा बांधून बेलाग बनवले. याच किल्ल्यांनी मुघलांना ९ वर्षे झुंजवले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच कृष्णगिरी किल्ला गाठावा. या किल्ल्याचे दरवाजेही सकाळी ९ वाजता उघडून ५ वाजता बंद होतात. एका दिवसात दोन्ही किल्ले पाहाण्यासाठी एकच १५/- रुपयांचे तिकीट काढावे लागते. कृष्णगिरी किल्ल्याला स्थानिक लोक राणीचा किल्ला म्हणून ओळखतात. हा किल्ला राजगिरीच्या मानाने छोटा आहे. डोंगराच्या पायथ्याशी तलाव आहे. किल्ल्याला विविध उंचीवर ४ चार प्रवेशव्दार आहेत. माथ्यावर धान्य, दारू कोठार, मंदिर आणि महाल आहेत. किल्ल्यावरील हवामहाल उल्लेखनीय आहे. चंद्रायन दुर्ग अभयारण्य क्षेत्रात असल्याने किल्ल्यावर जाण्याची परवानगी मिळत नाही.

पोटपूजा

तामिळनाडूत जेवणाची आबाळ होत नाही. इडली, मेदुवडे, डोसे दिवसभर मिळतात. जिंजी छोटे गाव असूनही तिथेही खाण्याची सोय चांगली आहे. जिंजी बस स्थानकासमोरील वसंत हे उपाहारगृह न्याहरी आणि मिठायांसाठी उत्तम आहे. हॉटेल अन्नपूर्णामधील बिर्याणी एकदा खायलाच हवी.

कांचीपुरम, महाबलीपुरम

दुसऱ्या दिवशी शिल्लक राहणारा वेळ सत्कारणी लावायचा असेल, तर तिथून ९० किमीवर असणारे वेल्लोर गाठावे. जिंजी बस स्थानकातून २१६ क्रमांकाची बस तसेच अन्यही खासगी बस वेल्लोरला जातात. इसवीसन १६७७ मध्येच शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. किल्ल्याचा बराचसा भाग पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतु तटबंदीवरून किल्ला व्यवस्थित पाहाता येतो. किल्ल्यातील पुराणवस्तू संग्रहालय, जलकंदेश्वर मंदिर प्रेक्षणीय आहे. आणखी एखादा दिवस हाती असल्यास कांचीपूरमला मुक्काम करावा. सकाळी तिथली मंदिरे पाहून महाबलीपुरमला जावे. ते पाहून झाल्यानंतर चेन्नईला परतीचा प्रवास सुरू करावा.