News Flash

व्हिंटेज वॉर : तीनचाकी रॉबिन

तीनचाकी मोटारीची कल्पना जरी न पटण्यासारखी असली तरी तीनचाकी मोटारींचा इतिहास हा मोठा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

रतन टाटा यांनी जेव्हा जगातील सर्वात स्वस्त मोटार निर्माण करण्याचे जाहीर केले. तेव्हा या गाडीवर काम करणाऱ्या अभियंत्यांसमोर अनेक अडचणी होत्या. एक लाखाची किंमत असल्यामुळे खर्च कमी करण्यासाठी विविध कल्पना लढवल्या जात होत्या. त्यात या गाडीला दरवाजे नसावेत किंवा या गाडीला केवळ तीन चाकेच असावीत असे विचार देखील सुरुवातीला समोर आले. परंतु ‘नॅनो’ ही चार दरवाजांची आणि चार चाकांची एक परिपूर्ण मोटार असली पाहिजे असा टाटा यांचा निर्धार होता. त्यामुळे या कल्पना हद्दपार झाल्या.

तीनचाकी मोटारीची कल्पना जरी न पटण्यासारखी असली तरी तीनचाकी मोटारींचा इतिहास हा मोठा आहे. या तीनचाकी मोटारींमध्ये रिलायंट रॉबिन हे अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. इंग्लंडमधील रिलायंट मोटार कंपनीकडून रिलायंट रॉबिन या गाडीची निर्मिती केली जात असे. एमके १, एमके २, एमके ३ अशा विविध मॉडेलची विक्री ३० वर्षे करण्यात आली. फायबर ग्लासपासून तयार करण्यात आलेल्या मोटारींमध्ये सर्वात जास्त विक्री झालेली दुसरी मोटार होती.

नोव्हेंबर १९७३ मध्ये रिलायंट रॉबिनच्या उत्पादनाला सुरुवात झाली. टी डब्ल्यू ८ या सांकेतिक नावाखाली या गाडीची निर्मिती सुरू झाली. या गाडीच्या डिझाइनचे काम ओगले डिझाइन लिमिटेडकडे देण्यात आले होते. या गाडीत ३२ हॉर्स पॉवरची ऊर्जा निर्माण करणारे चार सिलिंडरचे ७५० सीसीचे इंजिन होते.

गाडीची चासी ही स्टीलची होती, तर गाडीची पूर्ण बॉडी ही फायबर ग्लासपासून बनविण्यात आली होती. त्यामुळे ही गाडी वजनाला हलकी होती. तीनचाकी रॉबिन ही विविध प्रकारांमध्ये उपलब्ध होती.

दि स्टँडर्ड रॉबिन, दि सुपर रॉबिन, दि रॉबिन इस्टेट आणि दि रॉबिन व्हॅन. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गाडीचे वजन कमी करण्यात आले होते. गाडीच्या सुपर व्हर्जनमधील डॅशबोर्डवर एखाद्या चारचाकीच्या तुलनेत अधिक सुविधा होत्या. १९७५मध्ये रॉबिनमध्ये सुधारणा करून तिची इंजिनक्षमता वाढवून ८५० सीसी करण्यात आली.

या काळात रिलायंट रॉबिनही ब्रिटनमधील सर्वात लोकप्रिय गाडी बनली. रिलायंट रॉबिनची लोकप्रियता इतकी होती की, रिलायंटची इतर वाहने देखील रॉबिन म्हणूनच ओळखली जाऊ लागली. १९८९ मध्ये रिलायंटने नव्या डिझाइनसह पुन्हा रॉबिन बाजारात दाखल केली. गाडीच्या चासीमध्ये बदल करण्यात आला होता. १९९९ पर्यंत या गाडीचे उत्पादन सुरू होते. १९९९ मध्ये रॉबिन एम के ३ ही बाजारात आली. यावेळी या गाडीचे रुपडे पूर्णपणे बदलण्यात आले होते. गाडीच्या पुढील आणि मागच्या बाजूचे डिझाइन बदलले होते. नवे हेड लाइट, दरवाजे असे अनेक बदल गाडीत होते. यात रेडिओ आणि कॅसेट प्लेअर देण्यात आला होता. फेब्रुवारी २००१ नंतर या गाडीचे उत्पादन बंद झाले. या गाडीच्या उत्पादनाची ६५ र्वष पूर्ण झाल्याने रॉबिन ६५ ही विशेष गाडी तयार करण्यात आली.

३० एप्रिल २००१ मध्ये बी अ‍ॅण्ड एन प्लास्टिक कंपनीने रिलायंटच्या परवान्याचा वापर करून पुन्हा रिलायंट रॉबिन बाजारात आणली. या गाडीचे रिलायंट रॉबिन बीएन-१ असे नामकरण करण्यात आले. १२ जुलै २००१ मध्ये रॉबिन बीएन-२ ची घोषणा झाली. या गाडीच्या सर्व प्रकारांमध्ये विद्युत शक्तीवर चालणाऱ्या खिडक्या होत्या आणि सीडी प्लेअर देण्यात आला होता. जुलै २००२ मध्ये इलेक्ट्रिक रॉबिनची घोषणा देखील कंपनीने केली होती. परंतु काही अडचणींमुळे या सर्व गाडय़ांचे उत्पादन ऑक्टोबर २००२ ला थांबवण्यात आले. तेव्हापासून यातील कोणत्याही गाडीचे उत्पादन करण्यात आले नाही.  गाडीच्या तीनचाकी डिझाइनमुळे  ही गाडी चालवताना मुख्यत: वळवताना धोक्याचे ठरत. ब्रिटनमधील लोकप्रिय मालिका ओन्ली फूल्स अ‍ॅण्ड हॉर्सेसमध्ये ही गाडी झळकली होती त्यानंतर या गाडीची लोकप्रियता

अजूनच वाढली. ब्रिटनमध्ये ही गाडी जरी लोकप्रिय असली तरी जगभरात मात्र ही गाडी अनेकदा थट्टेचा विषय ठरत असेल. तरीही ब्रिटनमध्ये आजही रॉबिनची लोकप्रियता टिकून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 12:10 am

Web Title: three wheeled robin motor abn 97
Next Stories
1 जुन्नरमधील अपरिचित मंदिरे
2 गुलाश सूप
3 टेस्टी टिफिन : रताळ्याची खीर
Just Now!
X