26 September 2020

News Flash

आजारांचे कुतूहल : थायरॉइडचे विकार

थायरॉइड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी गळ्यामध्ये स्वरयंत्राच्या खालच्या बाजूस असते.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अविनाश भोंडवे

थायरॉइड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी गळ्यामध्ये स्वरयंत्राच्या खालच्या बाजूस असते. यालाच ‘गलग्रंथी’ म्हणतात. त्यातून थॉयरॉक्सिन नावाच्या संप्रेरकाची निर्मिती होऊन ते रक्तात सोडले जाते. त्यानंतर हे संप्रेरक शरीरातील सर्व महत्त्वपूर्ण अवयवांमध्ये प्रसृत केले जाते. थायरॉइडच्या योगे शरीरातील ऊर्जेचा वापर सहजसाध्य होतो, शरीर उबदार राहते आणि हृदय, मेंदू, शरीरातील स्नायूंची कार्ये योग्यरीत्या केली जातात.

थायरॉइडचे आजार

हायपोथायरॉइडिझम- थायरॉइड संप्रेरके कमी स्रावल्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण कमी होऊन हा विकार उद्भवतो. वजन वाढणे, थकवा येणे, केस गळणे अशी लक्षणे या विकारांत प्रामुख्याने आढळून येतात. ‘थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स’च्या  तपासणीत याचे निदान होते. थायरॉइड संप्रेरकांच्या औषधांनी हा विकार काबूत ठेवता येतो.

हायपरथायरॉइडिझम – थायरॉइड संप्रेरके जास्त प्रमाणात स्रावल्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण वाढते आणि हा विकार उद्भवतो. शरीराला कंप सुटणे, दरदरून घाम फुटणे, हृदयाची धडधड वाढणे आणि थायरॉइड ग्रंथीची वाढ होणे ही लक्षणे यामध्ये दिसून येतात.

थायरॉइड नोडय़ुल्स– ग्रंथींमध्ये गाठी होऊन हा विकार होतो. सोनोग्राफी, थायरॉइड स्कॅन, एमआरआय यातून निदान होते. यापैकी दहा टक्के रुग्णांना कर्करोगाची बाधा होण्याची शक्यता असते.

गॉयटर किंवा गलगंड– थायरॉइड ग्रंथीची अस्वाभाविक वाढ म्हणजे गलगंड. थायरॉइड संप्रेरके तयार करण्यासाठी मेंदूतील पिटय़ुटरी ग्रंथीद्वारे टीएसएच हे संप्रेरक स्रावते. जेव्हा थायरॉइड संप्रेरके कमी असतात तेव्हा टीएसएच जास्त स्रावते.

गलगंड होण्याची कारणे

आयोडिन कमतरता- थायरॉइड संप्रेरकाच्या निर्मितीसाठी आयोडिन लागते. आयोडिन समुद्राच्या पाण्यात, समुद्री मासे, प्रवाळ वनस्पतींमध्ये आणि अल्प प्रमाणात भूगर्भातल्या पाण्यात आढळते. समुद्रकिनाऱ्यापासून दूर असलेल्या डोंगराळ प्रदेशातल्या आहारात आयोडिनचे प्रमाण कमी असल्याने टीएसएचद्वारे थायरॉइड ग्रंथीच्या पेशींचे आकारमान वाढवून संप्रेरकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न शरीर करते. साहजिकच गलग्रंथीच्या आकारमानात वाढ होऊन गलगंड होतो. गलगंडामध्ये थायरॉइड संप्रेरकांची रक्तातील पातळी काही रुग्णांत आवश्यक इतकी असू शकते, तर काहींमध्ये कमी अथवा जास्तदेखील असते.

जन्मजात- गरोदर मातांच्या आहारात आयोडिनचे प्रमाण कमी असल्यास जन्माला येणाऱ्या बाळात थायरॉइड ग्रंथीशी समस्या आढळते. त्यामुळे अनेक रुग्णालयात नवजात अर्भकांची थायरॉइडबाबत तपासणी करण्याची पद्धत आहे.

हाशिमोटो डिसीज – हा ऑटोइम्युन आजार असतो. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली (इम्युन सिस्टीम) स्वत:च्याच थायरॉइड ग्रंथीच्या पेशी नष्ट करते. थायरॉइड हार्मोन्स कमी स्रावू लागते. परिणामत: मेंदूतील पिटय़ुटरी ग्रंथीद्वारे टीएसएच जास्त प्रमाणात स्रवते आणि ग्रंथीचा आकार वाढून गलगंड होतो.

ग्रेव्हज डिसीज – रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे थायरॉइड स्टिम्युलेटिंग इम्युनोग्लोबिन नावाचे प्रथिने स्रावते. त्यामुळे थायरॉइड ग्रंथीच्या पेशींची वाढ होऊन तिचा आकार वाढतो, थायरॉइड संप्रेरके मोठय़ा प्रमाणात निर्माण होतात आणि हायपरथायरॉइडिझम असलेला गलगंड होतो.

प्रतिबंधात्मक उपाय

* आहार : सर्व अन्नघटकांच्या योग्य समावेशासह, आयोडिनयुक्त मीठ, लोह, ‘अ’ जीवनसत्त्व यांचा समावेश आहारात असल्यास थायरॉइड संप्रेरके योग्य रीतीने स्रवतात. साखर, पिष्टमय पदार्थ, तेल, तूप, चरबी वाढवणारे पदार्थ टाळल्यास हृदयविकार, मधुमेहासह थायरॉइडच्या विकारांवरही नियंत्रण मिळवता येते.

* व्यायाम : रोज ३० ते ४५ मिनिटे व्यायाम केल्यास रक्ताभिसरण वाढून रक्तातील थायरॉइड शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते.

*  वैद्यकीय सल्ला : थायरॉइड विकारांशी संबंधित लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ल्यानेच औषधोपचार सुरू करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 12:14 am

Web Title: thyroid disorders symptoms cure causes treatment
Next Stories
1 राहा फिट : आहाराबाबत संभ्रम
2 आरोग्यदायी आहार : उत्तप्पम पिझ्झा
3 योगस्नेह : वृक्षासन
Just Now!
X