07 December 2019

News Flash

थायरॉइडची व्याधी

योग्य थायरॉइडतज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य उपचार यांद्वारे थायरॉइडसंबंधी पुष्कळ व्याधींवर मात करता येते.

संग्रहित छायाचित्र

|| डॉ. हर्षल एकतपुरे, अंतस्राव ग्रंथी आणि मधुमेहतज्ज्ञ

योग्य थायरॉइडतज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य उपचार यांद्वारे थायरॉइडसंबंधी पुष्कळ व्याधींवर मात करता येते. त्यामुळे त्याचा बाऊ  न करता नियमित तपासणी आणि उपचारांद्वारे निरोगी आयुष्य जगता येते.

थायरॉइड म्हणजे अवटू ग्रंथी. ही गळ्याच्या समोरील भागात असणारी, फुलपाखरासारखा आकार असलेली एक ग्रंथी असून याचे दैनंदिन काम म्हणजे शरीरात ‘टी ३’ आणि ‘टी ४’ ही संप्रेरके (हार्मोन्स) तयार करणे होय. शरीरातील इतर अंत:स्रावी ग्रंथी जशा मेंदूच्या नियंत्रणात असतात, त्याप्रमाणे थायरॉइड ग्रंथीही मेंदूतील पिटय़ुटरी ग्रंथीद्वारे नियंत्रित केल्या जातात. सामान्यत: हे नियंत्रण टीएसएच (थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स) या संप्रेरकाद्वारे केले जाते. म्हणून एखादी व्यक्ती जेव्हा थायरॉइडसाठी रक्ततपासणी करते, तेव्हा त्यामध्ये टी३/टी४/ टीएसएच या संप्रेरकांचे प्रमाण मोजले जाते आणि निष्कर्ष काढला जातो.

दैनंदिन जीवनात थायरॉइड संप्रेरके (टी३ आणि टी४) शरीराची चयापचय क्रिया (मेटाबोलिझम) नियंत्रित करतात. त्यामुळे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. शरीराचे तापमान नियंत्रित राखणे, त्याप्रमाणे वजन, भूक, पोटाच्या हालचाली, हाजमा, स्नायूंची कणखरता आणि इतर अनेक शरीर संस्था व्यवस्थित काम करण्यासाठी थायरॉइड संप्रेरके आवश्यक असतात.

थायरॉइडसंबंधी आजारांचे प्रकार

  • हायपोथायरॉइडीसीम

थायरॉइडसंबंधी सर्वसामान्य आजार म्हणजे हायपोथायरॉइडीसीम हा आहे, यामध्ये विभिन्न कारणांमुळे थायरॉइड ग्रंथीची काम करण्याची क्षमता कमी होत जाते. नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते ८०-९० वर्षांच्या वयोवृद्धापर्यंत कोणालाही हा आजार होऊ  शकतो. साधारणपणे १८ ते ३५ वयोगटातील महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळून येते. साधारण लोकसंख्येमध्ये याची व्याप्ती ४ ते ८ टक्के इतकी आहे. यामध्ये शरीरातील टी३/टी४ यांचे प्रमाण कमी होते आणि परिणामस्वरूप टीएसएचचे प्रमाण वाढू लागते.

  • लक्षणे

चेहऱ्यावर सूज येणे, सुस्ती वाटणे, जास्ती झोप येणे, हात-पाय दुखणे, बद्धकोष्ठता, मनाची चलबिचल आणि उदास वाटणे, महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे आणि थोडय़ा प्रमाणात वजन वाढणे ही साधारण लक्षणे दिसून येतात.

  • उपचार

या प्रकारच्या हायपोथायरॉइडीसीमची उपचार पद्धती अतिशय सोपी असते. जेवढय़ा प्रमाणात शरीरात टी४ संप्रेरकाची कमतरता आहे, तेवढय़ा प्रमाणात ते गोळीच्या माध्यमातून दिले जाते आणि नियमितपणे रक्ततपासणी करून त्यांचे प्रमाण योग्य राखले जाते. त्यामुळे हायपोथायरॉइडीसीम हा आजार नसून एक कमतरता आहे. एकदा ती कमतरता गोळीद्वारे भरून काढली की रुग्ण एका सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन व्यतीत करू शकतो. थायरॉईडच्या गोळीमध्ये जे नैसर्गिक संप्रेरक (टी४) शरीरात असते, तेच केवळ गोळीच्या माध्यमातून दिले जाते. योग्य वैद्यकीय देखरेख आणि नियमित तपासणीद्वारे योग्य डोस घेतल्यास या गोळीचा शरीरावर कोणताही दूरगामी दुष्परिणाम दिसून येत नाही.

 

हायपोथायरॉइडची कारणे

सध्या या प्रकारचे हायपोथायरॉइड होण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वयंरोगप्रतिकारशक्ती (ऑटोइम्युनिटी) होय. ज्यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारशक्ती स्वत:च्या थायरॉइडविरुद्ध लढा देते आणि कालांतराने थायरॉइड नष्ट करते. त्यामुळे या प्रकारात जीवनशैली फारच अत्यल्प भूमिका निभावते. सध्या इंटरनेटवर थायरॉइडसंबंधीचे आहार आणि व्यायाम यांचा सुळसुळाट झाला आहे. यातून बऱ्याच वेळा योग्य माहिती मिळण्याऐवजी रुग्ण गोंधळून जातात आणि स्वत:चे नुकसान करून घेतात. याशिवाय हायपोथायरॉइड होण्याची इतर कारणे म्हणजे जन्मत: थायरॉइड ग्रंथी तयार न होणे, थायरॉइड  शस्त्रक्रियेनंतर हायपोथायरॉइड होणे, आयोडिन कमतरतेमुळे होणारा हायपोथायरॉइड.

 

हायपरथायरॉइडिसम

हायपोथायरॉइड विपरीत जो आजार असतो, त्यास हायपरथायरॉइडिसम असे संबोधले जाते, ज्यामध्ये थायरॉइड ग्रंथी गरजेपेक्षा अधिक वेगाने काम करते. परिणामी शरीरातील टी३ आणि टी४ संप्रेरकांचे प्रमाण वाढते आणि टीएसएच कमी होते.

  • लक्षणे

हात-पाय थरथर कापणे, वजन कमी होणे, वारंवार शौचास होणे, छातीमध्ये धडधड जाणवणे, खूप घाम येणे ही लक्षणे दिसतात. काहींमध्ये डोळे सुजणे, डोळे लाल होणे असे त्रासदेखील होऊ  शकतात. या प्रकारच्या थायरॉइड आजाराची व्याप्ती साधारण लोकसंख्येमध्ये एक टक्का आहे.

  • उपचार

थायरॉइड विपरीत काम करणारी गोळी, रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयोडिन थेरपी अथवा शस्त्रक्रिया अशा उपचारपद्धती अवलंबल्या जातात. याव्यतिरिक्त थायरॉइड ग्रंथीमध्ये गाठी होणे (गॉयटर), थायरॉइड ग्रंथीचा कॅन्सर, थायरॉइड स्थानभ्रष्ट असणे (एक्टोपिक थायरॉइड) हे आजार असू शकतात. त्यांचे उपचार रुग्ण आणि तपासणी अहवालांपरत्वे वेगवेगळे असू शकतात.

 

थॉयराइड आणि गर्भावस्था

ज्या महिलांना हायपोथायरॉइड आहे आणि गर्भवती होण्याची इच्छा आहे त्यांना थायरॉइडची रक्ततपासणी करून पूर्वनियोजित रीतीने गोळीचा डोस वाढविला जातो, कारण बाळाच्या मेंदूची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी थायरॉइड संप्रेरके अत्यावश्यक असतात. गर्भावस्थेत जर हायपोथायरॉइडीसीमची तीव्रता अधिक असेल तर बाळ मतिमंद जन्माला येण्याचा धोका राहू शकतो. काही महिलांना गरोदरपणात पहिल्यांदा हायपोथायरॉइडीसीमचे निदान होते, अशा वेळी आजाराची तीव्रता, गर्भधारणेचा काळ या अनेक बाबींचा विचार करून मग उपचार निश्चित केला जातो.

 

थायरॉइडपासून प्रतिबंधात्मक उपाय

आता तुम्ही थायरॉइडसंदर्भातील आजार होऊ  नये म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाय करू शकता का? तर याचे उत्तर दुर्दैवाने नाही असे आहे, कारण हा मुळी जीवनशैलीशी निगडित आजारच नाही. हल्ली थायरॉइडसंदर्भातील आजार खूप वाढल्याचे दिसून येत आहे. थायरॉइड रक्ततपासणी सहजरीत्या उपलब्ध आहे आणि एकंदरीतच या ना त्या कारणाने थायरॉइड तपास करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे थायरॉइडसंदर्भातील आजार लवकरच्या टप्प्यातच गवसू लागले आहेत. काही दशकांपूर्वी केवळ तज्ज्ञांद्वारे सांगितल्या जाणाऱ्या तपासण्या आता कोणीही करून घेत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून थायरॉइडसंबंधी आजार वाढल्याचे भासमान चित्र निर्माण झाले आहे. यामध्येच काही दर्जाहीन आणि गुणवत्ताविरहित रक्त चाचण्या केंद्र यांची भर पडली आहे.

 

थायरॉइडचे योग्य निदान आवश्यक

हल्ली सगळीकडे थायरॉइड तपासणीचे पेव फुटले आहे. जरा वजन वाढले, थकवा जाणवतो, केस गळतात, मासिक पाळी अनियमित आहे अशी लक्षणे दिसून आली की थायरॉइड तपासण्या केल्या जातात. आणि मग पॅकेजच्या नावाखाली भरमसाट तपासण्या केल्या जातात आणि जरा कुठे टीएसएचचे प्रमाण वर-खाली दिसले की सर्व समस्यांचे खापर थायरॉइडवर फोडले जाते. त्यामुळे थायरॉइडची गोळी सुरू करण्याआधी तुमच्या सध्याच्या व्याधी खरेच थायरॉइडमुळे आहेत का हे तज्ज्ञांकडून तपासून घेणे अनिवार्य आहे. जर हायपोथायरॉइड असे योग्य निदान झाले असेल आणि थायरॉइडची गोळी चालू असेल तर ती बंद होत नाही. फक्त गोळीचा डोस कमी-जास्त होऊ  शकतो. त्यामुळे थायरॉइडची गोळी बंद करून दाखवतो, तुमचा थायरॉइडचा आजार नष्ट करतो वगैरे वल्गना करणाऱ्यांपासून सावध राहा. राहिली गोष्ट पर्यायी इलाजाची (आयुर्वेद आणि होमिओपॅथी) ज्यामध्ये थायरॉइडची गोळी वेगवेगळ्या स्वरूपात (पूड, भुकटी, चूर्ण इ.) दिली जाते आणि थायरॉइड बरा केल्याचा दावा केला जातो.

First Published on August 13, 2019 12:53 am

Web Title: thyroid problems
Just Now!
X