News Flash

राहा फिट : वाढत्या वयासाठी आरोग्यपूरके

पूरक गोळ्या घेतल्याने हृदयरोग अथवा कर्करोग होण्याचा धोका कमी होत नाही

डॉ. अविनाश सुपे

हल्ली आपण वर्तमानपत्रे किंवा टीव्हीवर आहारातील काही घटकांची कमतरता भरून काढण्याचा दावा करणाऱ्या आहारपूरक गोळ्यांच्या जाहिराती बघत असतो. जरी ही पुरके औषधाच्या दुकानात मिळत असली तरी ही काही आजारांवरील औषधे नाहीत.

आरोग्यपूरके गोळ्या, कॅप्सूल, पावडर, जेल टॅब, अर्क किंवा द्रव स्वरूपात येतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, अमीनो अ‍ॅसिड्स, औषधी वनस्पती किंवा इतर वनस्पती किंवा एंझाइम्स असू शकतात. कधीकधी, आहारातील पूरक घटक पेय पदार्थामध्ये समाविष्ट केले जातात.

शरीराला शरीर संरक्षण, संवर्धन, आणि दैनंदिन कामांसाठी लागणारी ऊर्जा जीवनसत्त्वे पुरवतात. सकस, सात्विक आणि चौरस आहार घेतला तर शरीराच्या गरजेइतकी सत्त्वे आहारातून मिळतात. मात्र वाढत्या वयामध्ये आहार व हालचाल कमी होते तसेच पचनाचे कार्य मंदावते. अशावेळी शरीरात जीवनसत्त्वे व खनिजांची कमतरता होते. त्यामुळे वाढत्या वयात हे घेणे आवश्यक ठरते. मोठय़ा आजारातून बरे होताना गरजेनुसार डॉक्टर पूरक आहार म्हणून काही पूरके काही कालावधीसाठी घेण्याची शिफारस करू शकतात. जर तुम्ही सकस, सात्त्विक आहार घेत असाल आणि निरोगी असाल तर डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय आरोग्य पूरके घेणे आवश्यक नाही. इतकेच नाही तर त्यामधील जीवनसत्त्व ड , बीटाकॅरोटिन, कॅल्शिअम पुरके आवश्यक मात्रेपेक्षा जास्त असल्यास हानिकारक ठरू शकतात. गर्भार अवस्थेत दिले जाणारे फॉलिक अ‍ॅसिड तसेच लोह, कॅल्शिअम याच्या गोळ्या गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्याने घेणे उपयुक्त असते.

गैरसमज

पूरक गोळ्या घेतल्याने हृदयरोग अथवा कर्करोग होण्याचा धोका कमी होत नाही. तसेच स्मरणशक्तीचा ऱ्हास इत्यादी बुद्धीशी निगडित आकलनविषयक आजारांचा धोकाही कमी होत नाही.

कधी घ्यावीत?

५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजांची आवश्यकता असू शकते. ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडे पोकळ होऊन कमजोर होतात किंवा संधिवात यांसारख्या आरोग्याच्या समस्येमध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्व ड हे हाडे मजबूत ठेवण्यासाठी दिले जाते.

* जीवनसत्त्व बी ६- लाल रक्त पेशी तयार करण्यासाठी या जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. हे बटाटे, केळी, कोंबडी, भाज्या, सोयाबीन यांमध्ये आढळते.

* जीवनसत्त्व बी १२- आपल्या लाल रक्तपेशी आणि तंत्रिका निरोगी ठेवण्यास मदत करते. वृद्ध प्रौढांना इतर प्रौढांइतकेच बी १२ची आवश्यक असते. परंतु काहींना अन्नात नैसर्गिकरीत्या असलेले जीवनसत्त्व शोषण्यास त्रास होतो.

अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय?

हे अन्नातील नैसर्गिक पदार्थ आहेत, जे आपल्याला काही आजारांपासून वाचवितात. येथे अँटीऑक्सिडेंट्चे काही सामान्य स्रोत आहेत. जे आपल्या आहारात आपण निश्चितपणे समाविष्ट केले पाहिजेत.

*  बीटा कॅरोटीन- गडद रंगाची फळे आणि भाज्या एकतर गडद हिरव्या किंवा गडद केशरी, अंडय़ाचा बलक

*  सेलेनियम – मासे , यकृत, मांस आणि धान्ये

*  जीवनसत्त्व सी – लिंबूवर्गीय फळे, मिरपूड, टोमॅटो, मोड आलेले कडधान्य, आवळा, पेरू, सिमला  मिरची , बटाटा आणि बेरी

*  जीवनसत्त्व ई- सुका मेवा, तीळ, आणि कॅनोला, ऑलिव्ह, गव्हाचा भुसा आणि शेंगदाणा तेल

आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही आरोग्याच्या स्थितीचे निदान करू नका किंवा त्यावर उपचार करू नका. शरीराला अनावश्यक पूरक पदार्थावर पैसे वाया जाऊ  नये. म्हणून डॉक्टरांच्या किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने ही पुरके घ्यावीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 3:53 am

Web Title: tips for healthy aging healthy medicine for growing age zws 70
Next Stories
1 काळजी उतारवयातली : पायातील रक्तवाहिन्यांचे आजार
2 योगस्नेह : वज्रासन
3 आरोग्यदायी आहार : ओल्या हळदीचे लोणचे
Just Now!
X