डॉ. अविनाश सुपे

उन्हाळा म्हणजे अंगाची काहिली, रखरखीतपणा, उष्माघात, घामाच्या धारा- असं कोय काय मनात येतं. अशा वेळी जीव नकोसा होतो. मे महिन्यात सर्वत्र तापमान वाढू लागतं. मुंबईसारख्या शहरांमध्ये भरपूर घाम येतो तर देशावर उन्हाळी लागते. उन्हाळ्यात शरीराची कशी काळजी घ्यावी ते समजून घेऊ या. उन्हाळ्यामध्ये मुख्यत्वे त्वचा, केस, पायांचे विकार आणि तीव्र उन्हामुळे येणारी तिरमिरी, उष्माघात या आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात.

उष्माघात

ही जास्त तापमानामुळे झालेली एक तीव्र समस्या असते. यामध्ये शरीरात जास्त उष्णता शोषून घेतली जाते. त्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. हा गंभीर आजार असून त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज असते.

त्वचेवरचे परिणाम

उन्हाळ्यात खूप जणांना घामोळ्यांचा व फोडांचा त्रास होतो. अनेक जण याचा संबंध आंबे खाण्याशी जोडतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. त्वचेचा शुष्कपणा, वाढलेला घाम आणि धूळ यामुळे हे फोड येऊ लागतात. घामोळ्यांचा त्रास टाळण्यासाठी थंड पाण्यानेच अंघोळ करणे फायदेशीर असते. पातळ व सलसर कपडे घालावेत. अंघोळीनंतर शरीराला टाल्कम पावडर लावावी. शरीरावर पुरळ (स्किनरॅश) असल्यास कॅलाड्रिल किंवा तत्सम लोशनचा वापर करावा. उन्हाळ्यात आपल्या पायांना, मुख्यत्वे अंगठा व बोटे यांना त्वचेच्या रुक्षतेमुळे व धुळीमुळे जंतुसंसर्ग होण्याचा संभव असतो. बाहेरून आल्यानंतर पाय चांगले चोळून धुवावेत आणि आवश्यक असल्यास त्वचा मुलायम ठेवणारे मलम किंवा मॉइश्चरायझर लावावे. कोंडा होण्याचे प्रमाणही उन्हाळ्यात वाढते.

तेलकट त्वचा असल्यास अधिक तेलकट दिसते आणि कोरडी त्वचा खडबडीत दिसते. सूर्याची तीव्र किरणे अधिक मेलॅलिन रंगद्रव्ये तयार करतात. त्यामुळे त्वचा काळवंडते. हे टाळण्यासाठी उन्हात बाहेर जाताना शरीरावर सनस्क्रीन लोशन लावावे. भडक किंवा अधिक मेकअप टाळावा. वातावरणातील रुक्षता व आद्र्रतेमुळे त्वचेच्या रंध्रांवर आधीच परिणाम झालेला असतो. अति मेकअपमुळे ती बंद होतात आणि त्यामुळे त्वचेला अजिबात श्वास घेता येत नाही. आहारात संत्री, मोसंबी यासारखी फळे, हिरव्या पालेभाज्या, गाजर, शेंगदाणे व तृणधान्ये यांचा समावेश असावा म्हणजे त्वचा तुकतुकीत राहते. सोबत अँटीऑक्सिडंट्स घ्यावीत, त्यामुळे त्वचेतील आद्र्रता कायम राखली जाते.

घामामुळे उन्हात जास्त फिरल्यास, श्रम अधिक केल्यास किंवा खेळल्यास हातापायांत पेटके (क्रॅम्प्स) येतात. पोटऱ्यांमध्ये गोळे येतात. अशा वेळी सावलीच्या ठिकाणी आराम करावा, मीठ साखरेचे पाणी किंवा फळांचा रस भरपूर प्रमाणात घ्यावे. निथळणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी सतत बाहेर जात असते. त्यामुळे अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर, मळमळ, पायात पेटके येणे सहजशक्य आहे. यासाठी भरपूर पाणी, सरबत किंवा नारळपाणी प्यावे.