News Flash

इतिहासातील ‘उद्याची मोटार’

१९६९ मध्ये मानवाने चंद्रावर पाहिल्यांदा पाऊल ठेवले आणि संपूर्ण जग बदलून गेले.

व्हिंटेज वॉर : वैभव भाकरे

मोटारीच्या शोधाने संपूर्ण जग बदलले. आधुनिक तंत्रज्ञानातूनच मोटारीचा जन्म झाला. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे या गाडय़ा अधिक वेगवान, सुरक्षित, कार्यक्षम झाल्या. आज या मोटारी कृत्रिम संज्ञेचा वापर करून बुद्धिमान होत आहेत. आज आपण वापरत असलेली मोटार भविष्यात कशी असेल? ५०-६० वर्षांनी या गाडीचे रूप पूर्णपणे बदललेले असेल का? याबाबत विचारमंथन आणि स्वप्नरंजन अगदी ५० आणि ६० च्या दशकापासून केले जात आहे.

१९६९ मध्ये मानवाने चंद्रावर पाहिल्यांदा पाऊल ठेवले आणि संपूर्ण जग बदलून गेले. या अभूतपूर्व घटनेमुळे तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या क्षमतेवर लोकांचा विश्वास बसला. आज चंद्र काबीज केलाय आता पुढे काय? असा विचार तत्कालीन कलाकार, लेखकांना स्वस्थ बस देत नव्हता. त्यातून भविष्याचे अतिप्रगत आणि रंजक चित्र उभे करण्यात आले. अशा प्रकारच्या कल्पना १९५० आणि १९६० मध्ये समोर आल्या.

भविष्यातील मोटार रेखाटताना ती जेट विमानसारखी असे, त्या काळात कॉन्सेप्ट कार म्हणजे या जमिनीवर चालणारे विमानाच जणू अशा स्वरूपातच तयार केली जात. गाडीचा आकार, क्षमता, इंधन याबाबत अत्यंत अचाट कल्पना समोर येत होत्या. फोर्डने १९५७ मध्ये न्यूक्लिऑन ही कॉन्सेप्ट मोटार जगासमोर आणली. महत्त्वाचे म्हणजे ही गाडी अंतर्गत ज्वलन इंजिनावर चालणारी नसून, आण्विक ऊर्जेवर चालणारी होती. पाणबुडय़ाप्रमाणे मोटारीसाठी आण्विक ऊर्जा वापराता येईल असे भविष्यात या ऊर्जेचे स्वरूप होईल अशी कल्पना तेव्हा करण्यात आली होती. फोर्डच्या या संकल्पनेवर आधारित एक मोटार तयार करण्यात आली असून ती अमेरिकेतील मिशिगन येथे असलेल्या हेन्री फोर्ड वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. ही कॉन्सेप्ट ज्या काळात जगासमोर आली. तेव्हा जगासाठी आण्विक ऊर्जा अगदीच नवीन होती. या ऊर्जेला संक्षिप्त रूप देत कार स्वस्तात उपलब्ध करून देणे कधी तरी शक्य होईल, असा विश्वास वक्त केला जात होता. आण्विक ऊर्जा हाच भविष्यात ऊर्जेचा प्राथमिक स्रोत असणार आहे असे मानले जात होते. आण्विक ऊर्जेवर ही वाहने ८०४६ किमी अंतर प्रवास करू शकतील त्यानंतर वाहन रिचार्ज करावे लागणार. एकदा आण्विक ऊर्जा आल्यावर पेट्रोल आणि डिझेल निरुपयोगी होणार अशी भविष्यवाणी केली गेली. भविष्यात पेट्रोल पंप नामशेष होतील, असे आखाडे लावण्यात आले होते.

फोर्ड जायरॉन हीसुद्धा भविष्यच्या रंजक शक्यतांमधून जन्माला आलेली मोटार.  १९६१चा डेट्रॉइट मोटार शोमध्ये प्रथम ही कॉन्सेप्ट मोटार जगाला दाखवण्यात आली. ही गाडी प्रख्यात संकल्पनात्मक कलाकार सिड मीड यांनी डिझाइन केली होती. या गाडीला मोटरसायकलप्रमाणे केवळ दोनच चाके होती. गाडीतील जायरोस्कोपच्या आधारे ही गाडी संतुलित राहणार होती. ही गाडी केवळ संशोधन आणि विपणनाच्या कामासाठी तयार करण्यात आली होती. मूळ फायबरग्लासपासून तयार करण्यात आलेल्या या गाडीचे कॉन्सेप्ट एका आगीत नष्ट झाले. या गाडीचे एकमात्र मॉडेल २०१२ मध्ये एका लिलावात अडीच कोटी रुपयांना विकण्यात आले.

लिंकनने लिंकन फ्युचुरा ही १९५५ मध्ये एका ऑटोशोमध्ये दाखल केली होती. ही भविष्यातील गाडी आहे हे अधोरेखित करण्यासाठी गाडीच्या नावातच ‘फ्युचुरा’ होते. या मोटारीला मार्केटिंगसाठी मोठय़ा प्रमाणात वापरण्यात आले. त्याचप्रमाणे ही गाडी चित्रपटांमध्येही अनेक वेळा झळकली. परंतु १९६६मध्ये आलेल्या बॅटमॅन या लोकप्रिय मालिकेत झळकल्याने या गाडीला मोठे वलय मिळाले. मोटार तज्ज्ञांनी ज्या गाडीला बेढब म्हटले होते, ती या मालिकेत बॅटमोबिल म्हणजे बॅटमॅनची मोटार म्हणून अगदी साजेशी ठरली.

फोर्डची ‘एक्स २०००’ ही तर फोर्डच्या भविष्यातील रूपरेषेची नांदी होती. येत्या काळात गाडय़ांमध्ये होणारे डिझाइनबाबतचे बदल फोर्डने या गाडीमार्फत दर्शविलेले होते. या कॉन्सेप्स्ट गाडय़ांसह ५० आणि ६०च्या दशकात २१ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सर्व गाडय़ा स्वयंचलित असतील आणि हवेत उडतील अशाही रंजक कल्पना मांडल्या होत्या. यातील सर्वेच खोटे ठरले असे नाही. स्वयंचलित मोटारी आल्या पण त्या अद्यापही प्रायोगिक टप्प्यावरच आहेत. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाने आज मोटारींना स्मार्ट केले आहे. ६०ते ७० वर्षांआधी रंगवलेला भविष्यकाळ अजूनही भविष्यातच आहे. त्या काळच्या शक्यता आणि स्वप्नांची जागा आज गरज आणि चिंतेने घेतली आहे. त्या काळी मोटारीसाठी ऊर्जेचा पर्यायी स्रोत शोधणे हे मानवाने एक तांत्रिक आव्हान म्हणून स्वीकारले होते, आज पर्यायी ऊर्जास्रोत शोधणे केवळ एक आव्हान नसून अस्तित्वाची लढाई आहे. तंत्रज्ञानामुळे ही मोटार एके दिवशी खरच स्वयंचलित होईल, हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून करेल, हवेतही उडेल कारण भविष्य हे सकारात्मक आणि शक्यतांचे आहे.

vaibhavbhakare1689@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 1:25 am

Web Title: tomorrow motor akp 94
Next Stories
1 आधुनिक प्रयोगातून ‘ऑर्किड’ची लागवड
2 किल्ले, महालांचं शहर
3 एग अजुबा, एग उंधियो
Just Now!
X