|| डॉ. विवेक पाखमोडे

मुख स्वच्छतेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकणारी १९६२ पासून अस्तित्वात असलेली मात्र दुर्दैवाने सध्या दुर्लक्षित असलेली ‘वॉटर फ्लॉसर’ ही महत्त्वाची वस्तू आहे.

दातांच्या, हिरडय़ांच्या उत्तम आरोग्यासाठी दात स्वच्छ आणि हिरडय़ा सुदृढ ठेवणे अत्यावश्यक असते. त्यासाठी सुदैवाने टुथपेस्ट आणि टुथब्रशचा वापर वाढला आहे. मात्र दातांच्या डॉक्टरांकडे येणारे अनेक रुग्ण सांगतात की, ‘आम्ही न चुकता, न विसरता, सकाळी आणि रात्री दात घासतो, तरी आमचे दात का किडले?’

दोन दातांमध्ये अडकून, फसून राहिलेले अन्नकण अशा प्रकारे दात किडण्यास कारणीभूत असतात. असे अन्नकण टुथब्रशच्या सहाय्याने पूर्णपणे निघत नाही. त्यासाठी वापरावा लागतो. ‘डेंटल फ्लॉस’ नामक विशिष्ट दोरा. दोन बोटांमध्ये पकडून हा दोरा दोन दातांच्या फटीत घुसवून मागेपुढे सरकावा लागतो. प्लॅस्टिकच्या स्टिकमध्ये अडकवलेले फ्लॉसही बाजारात उपलब्ध आहेत.

दात स्वच्छ राखण्यासाठी डेंटल फ्लॉस हा प्रकार अतिशय प्रभावी आणि अत्यावश्यक असा असतो. मात्र ही क्रिया बरीच वेळखाऊ आणि काही प्रमाणात त्रासदायक ठरते. दातांना ब्रेसे लावल्यानंतर, अति वयस्कर व्यक्तींना, विविध समस्यांमुळे बोटांवर नियंत्रण नसणाऱ्यांना फ्लॉसिंग करणे कठीण होऊन बसते.

या सर्वावर ‘वॉटर फ्लॉसर’ने मात करता येऊ शकते. जसे धाग्याच्या फ्लॉसने दोन दातांमध्ये फसलेले अन्नकण निघणे अपेक्षित असते, तेच कार्य पाण्याच्या झोताने साध्य करता येते. अशा या वैशिष्टय़पूर्ण पिचकारीला ‘वॉटर फ्लॉसर’ वा ‘वॉटर इरिगेटर,’ ‘वॉटर जेट’ म्हणतात.

‘वॉटर फ्लॉसर’, हे एक छोटेखानी साधन असून त्यात मोटर आणि वॉटरपंप, पाणी ठेवण्याचा डबा आणि पाण्याचा झोत सोडणारी टीप /नोझल असते.

मोटरच्या सहाय्याने निर्माण झालेल्या प्रेशरमुळे, नेझलद्वारे पाण्याचा झोत सोडून दातांच्या विविध भागांवर जमा झालेले अन्नकण काढून दात स्वच्छ करणे वॉटर फ्लॉसरने सुलभ ठरते.

दंतवैद्याकडे जे रुग्ण वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठी ब्रेसेस लावतात, त्याचप्रमाणे आंशिक कवळी लावणारे, दातांवर चिटकवलेले सौंदर्यालंकार लावणारे स्टाइलिश लोक, इम्प्लांट, ब्रीजचे उपचार घेतलेले रुग्ण यांच्यासाठी वॉटर फ्लॉसर हे उपयुक्त साधन आहे.

वॉटर फ्लॉसरचे टीप / नोझल हिरडय़ांच्या थोडय़ा जवळपास पकडून वॉश बेसिनजवळ उभे राहायचे आणि पाण्याचा झोत दातांवर सोडायचा, इतके हे सोपे आहे. वॉटर फ्लॉसरद्वारे आपण माऊथवॉशही दातांना जंतूमुक्त करण्यासाठी वापरू शकतो.

एक मात्र लक्षात ठेवायला हवे की वॉटर फ्लॉसर, टुथब्रश + टुथपेस्ट किंवा धाग्याच्या फ्लॉसला पर्याय नसून सहाय्यक आहे.

‘वॉटर फ्लॉसर’ सध्या फक्त ऑनलाइनच मिळते किंवा दंतपरिषदांमध्ये आढळते. तसे ते बऱ्यापैकी महागसुद्धा असते. मात्र त्याचा वापर वाढल्यास अगदी पाचशे रुपयात वॉटर फ्लॉसर लवकरच मिळेल आणि आपले मुखआरोग्य सुदृढ करण्यास सहाय्यक ठरेल अशी आशा करूया!