24 January 2019

News Flash

हम्पीच्या तटावर, हिप्पींच्या बेटावर..

कर्नाटकात असणाऱ्या हम्पीला मुंबई किंवा पुण्याहून सहज जाता येतं.

रामायणातील सुग्रीव-हनुमानाची किष्किंधा नगरी ‘पंपाक्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध होती. त्याचंच अपभ्रंश होऊन हम्पी हे नाव रूढ झालं. ते चौदाव्या शतकातल्या भव्य विजयनगर साम्राज्याचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं केंद्र बनलं. अल्लाउद्दीन खिल्जीचा दक्षिणेतल्या अनेगुंदीचा राज्यकारभार सांभाळणाऱ्या हरिहर आणि बुक्क या संगमपुत्रांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि तुंगभद्रेच्या काठावर स्वतंत्र राज्य स्थापन केलं. पुरातत्त्व अवशेषांनी समृद्ध असलेलं ऐतिहासिक साम्राज्य, प्रभू रामाचं पौराणिक तीर्थक्षेत्र, तेनालीरामाच्या चातुर्यकथांचं आगर आणि गोव्यासारखं मोकळढाकळं वातावरण असलेलं शहर अशा विविध रूपांत हम्पी आपल्याला दिसतं.

कर्नाटकात असणाऱ्या हम्पीला मुंबई किंवा पुण्याहून सहज जाता येतं. बंगळूरु किंवा मंगळूरला विमानाने जाऊन तिथून हम्पीला जाता येतं. ट्रेनचा पर्याय वेळकाढू आहे. बजेट आणि वेळ या दोन्ही निकषांवरचा चांगला पर्याय म्हणजे ट्रॅव्हल्सच्या बस. या बसने १२ ते १४ तासांत आपण थेट हॉस्पेटला पोहोचतो. हॉस्पेट हे हम्पीलगतचं मोठं शहर आहे.  हॉस्पेटहून रिक्षा, टॅक्सी किंवा बसने काही मिनिटांत आपण हम्पीला पोहोचतो.

आज हम्पीला दोन हजारांहूनही जास्त दगडी मंडप, भव्य मंदिरं आणि अगणित शिल्पांचा खजिना पाहायला मिळतो. लयबद्ध पायऱ्यांच्या पुष्करिणी, वैभवशाली साम्राज्याचा वारसा सांगणारे राजप्रासाद, पुरातन बाजारपेठा स्तिमित करतात. नेत्रदीपक पाषाणरथाचं विजय विठ्ठल मंदिर आणि त्याचं विस्तृत प्रांगण, भैरप्पांच्या वादग्रस्त ‘आवरण’ पुस्तकात वर्णन केलेली भग्न उग्रनृसिंह मूर्ती पाहून मन भरून येतं. रामकथा सांगणारी प्रस्तरशिल्पं, असंख्य शिवलिंग कोरलेले ‘कोटिलिंग’ यांसारखी स्थापत्यशैलीची अनेक आश्चर्ये दृष्टीस पडतात. ताला-सुरात वाजणारे कल्यामंडपातील दगडी खांब, विरुपाक्ष मंदिराच्या गोपुराची आत एका कोपऱ्यात दिसणारी उलटी प्रतिमा, सहा विविध शिल्पमुद्रा दर्शवणारं छोटंसं शिल्प यांसारखी अनेक वैशिष्टय़ं आपल्याला चकित करतात. तुंगभद्रेच्या काठावर असणारं हम्पी म्हणजे इतिहास, स्थापत्याची आवड असणाऱ्यांची पंढरीच! जवळच रामभक्त शबरीचं पंपा सरोवर, हनुमानाचं जन्मस्थान मानला जाणारा अंजनाद्रि ही तीर्थक्षेत्रंही आहेत.

इतिहासाच्या घाटावर आपल्या भौगोलिक वैशिष्टय़ांसह उभ्या असणाऱ्या हम्पीच्या पलीकडच्या घाटावर मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतं. अनेगुंदीचाच एक भाग असणारं हे पलीकडच्या काठावरचं विरूप गड्डे गाव आता ‘हिप्पी आयलंड’ म्हणून ओळखलं जातं. ही जागा परदेशी पर्यटकांचं घरच बनलं आहे. या गावात महिनोन् महिने मुक्काम ठोकून असलेले हिप्पी इथल्या विविध कॅफेमध्ये सदैव पडीक असतात. संध्याकाळी कॉफी, मद्य किंवा हुक्का यांचा आस्वाद घेत काँगो किंवा तत्सम वाद्यांवर आफ्रिकन संगीत वाजवत शेकोटीभोवती फेर धरणाऱ्या हिप्पींनी हम्पीच्या पारंपरिक रूपाला वेगळाच आयाम मिळवून दिला आहे. अंगावरचे टॅटू आणि केसांच्या जटा मिरवत रॉयल एन्फील्डवरून भटकणाऱ्या हिप्पींमुळे हम्पीच्या या भागात मिनी-गोव्याचा ‘फील’ येतो. पावसाळ्यानंतरचा काळ हम्पीत फिरण्यासाठी सर्वोत्तम असतो. उन्हाळ्यात तीव्र ऊन, झाडांची कमतरता आणि कोरडय़ाठाक पुष्करिणी फिरण्याच्या उत्साहाला ग्रहण लावू शकतात. पूर्ण हम्पी पालथं घालण्यासाठी साधारण तीन दिवस पुरेसे आहेत. हम्पीमध्ये फिरण्यासाठी रिक्षा/टॅक्सी उपलब्ध आहेत. सायकलचा पर्याय उत्तम. गाइड्सच्या मदतीने हम्पी पाहण्यापेक्षा लोकल स्टॉल्सवर मिळणाऱ्या पुस्तकांच्या मदतीने हम्पीचा इतिहास जाणून घेणं जास्त किफायतशीर आहे. राहण्यासाठी ‘होम स्टे’चा पर्याय सर्वात चांगला आहे. मात्र हिप्पी आयलंडला राहायची इच्छा असेल, तर तिथे मोठी रिसॉर्ट्सही आहेत.

हम्पी ते हिप्पी आयलंड प्रवासासाठी बोटीची सोय आहे. मात्र संध्याकाळी साडेपाचला शेवटची फेरी असल्यामुळे तिची वेळ सांभाळूनच फिरणं योग्य. टोपलीवजा बोटीतून प्रवास करणं हादेखील हम्पीमधला एक अविस्मरणीय अनुभव असतो.

थोडक्यात पुरातत्त्व अवशेषांनी समृद्ध असलेलं ऐतिहासिक साम्राज्य, प्रभू रामाचं पौराणिक तीर्थक्षेत्र, तेनालीरामाच्या चातुर्यकथा अनुभवलेलं लोककथांचं आगर आणि गोव्याचा मोकळाढाकळा ूं१स्र्ी ्िरीे फील देणारं शहर अशा विविध स्वरूपात हम्पी आपल्याला दिसतं आणि विजयनगराचा अवाका समजून घेणं किती रोमहर्षक आहे, याची जाणीव करून देतं.

खादाडी आणि खरेदी

  • हम्पीला परदेशी पर्यटकांची वर्दळ वाढल्यामुळे इथल्या हॉटेलांमध्ये इस्रायली, रशियन, कॉन्टिनेन्टल खाद्यपदार्थ मिळतात. इडली, मेदूवडा, नारळपाणी या स्थानिक पदार्थाची चव घेतली नाही तरी चालेल, मात्र ‘बनाना फ्लॉवर करी’ ही केळ्याची ‘तिखट-गोड ग्रेव्ही’ मात्र खाऊन पाहायलाच हवी.
  • तंत्रा स्टाइलचे कुर्ते, धोती पॅण्ट्स, अ‍ॅक्सेसरीज, आकर्षक ज्वेलरी, टॅटू पार्लर्स तुम्हाला खिसा रिकामी करण्यास भाग पाडू शकतात. ‘बनाना फायबर्स’पासून बनवलेले कपडे इथलं वैशिष्टय़ म्हणून खरेदी करू शकता. मात्र घासाघीस करण्याचं कौशल्य पणाला लावायला हवं.

First Published on February 9, 2018 12:50 am

Web Title: tour hampi hampi city