स्वच्छंदपणे भटकता यावं, कोणतीही बंधनं नसावीत, वेळापत्रक पाळावं लागू नये म्हणून मित्रपरिवार किंवा कुटुंबकबिल्यासोबत फिरण्याऐवजी एकटेच फिरणारे अनेक आहेत. पण या अशाप्रकारे फिरणाऱ्यांना काही गोष्टींच भान ठेवावं लागतं, का आणि कसं ते यापुढील काही भागांतून जाणून घेऊ या..

  • आपण ज्या जागी जाणार आहोत त्या जागेबाबत अद्ययावत अ‍ॅप्सच्या साहाय्याने पूर्ण माहिती मिळवावी. बाइक किंवा कारने प्रवास करणार असाल तर गुगल मॅप्सवरून पेट्रोल पंप कुठल्या जागेवर आहेत याची नोंद करून ठेवावी. कधी कधी प्रवासात नेटवर्क मिळत नाही आणि त्वरित माहिती मिळू शकत नाही.
  • आपला मोबाइल हाच आपला मार्गदर्शक व प्रसंगी मदतीला धावून येणारा मित्र असतो. तेव्हा प्रवासादरम्यान त्याची बॅटरी उत्तमरीत्या चार्ज असावी. १०० टक्के चार्ज असलेला पोर्टेबल चार्जर नेहमी सोबत ठेवावा.
  • आपली बॅग अशारीतीने पॅक करावी की कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हे पक्कं लक्षात राहील. त्या कप्प्यात हात घातल्यावर ती वस्तू ताबडतोब हाती लागली पाहिजे. मग ती कात्री असो किंवा हॅण्डवॉश. बॅगेचा प्रत्येक कप्पा आणि त्यातील वस्तू आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.
  • एकटय़ाने प्रवास करताना शक्यतो अनोळखी व्यक्तीने दिलेले खाद्यपदार्थ अथवा पेय घेऊ नये व आपल्या प्रवासाचा संपूर्ण प्लॅनही त्यांना सांगू नये.
  • हॉटेलमध्ये गेल्यावर रुममध्ये चेक इन केल्यावर रुमची सर्वसाधारण तपासणी करावी. पडदे बंद केलेल्या खिडक्या खास तपासून घ्यावात. अनेकदा मोठाले पडदे बंद असतात व त्यापाठच्या खिडक्या उघडय़ा असतात.
  • रुममधील टीव्ही चालू आहे का हे पाहण्याआधी फोन, गिजर, एसी चालू आहेत का याची तपासणी आधी करावी.

(क्रमश:)

writersmruti@gmail.com