|| अमित सामंत

हॉलस्टॅट या छोटय़ाशा गावातून फेरफटका मारण्यासाठी एकमेव रस्ता आहे. रस्त्याच्या एका  बाजूला नितळ पाण्याचे सरोवर आणि दुसरय़ा बाजूला डोंगर आहे.  या डोंगरउतारावर बांधलेली सुबक सुंदर रंगीबेरंगी घर. प्रत्येक घराच्या बाल्कनीत,  फ्लॉवर बेडमध्ये फुललेले फुलांचे ताटवे त्या घराना अजून सुंदर बनवतात..

ऑस्ट्रीयाला फिरायला जाणारे पर्यटक व्हिएन्ना आणि साल्झबर्ग ही मोठी शहरे पाहतात. आल्पसच्या पर्वतराजीत असलेली छोटी छोटी खेडी आणि निसर्गरम्य परिसर पाहणे हीसुध्दा एक पर्वणी आहे. ऑस्ट्रीयातील साल्झबर्ग या मोझार्टसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरापासून ८० किलोमीटरवर आल्पसच्या कुशीत वसलेले हॉलस्टॅट नावाचे निसर्गरम्य गाव आहे. हॉलस्टॅट सी या सरोवराला चारही बाजूंनी उंचच उंच डोंगरांनी वेढलेले आहे. या डोंगरांपैकी एका डोंगराच्या उतारावर हॉलस्टॅट हे परीकथेत शोभावे असे प्राचीन गाव वसलेले आहे.

ऑस्ट्रीया, स्लोव्हाकिया, जर्मनी हे ‘लँडलॉक’ देश आहेत, म्हणजे या देशांना समुद्रकिनारा नाही. त्यामुळे या सागरी किनारा नसलेल्या देशांचा मिठाचा व्यापार याच मार्गावरुन होत होता. हॉलस्टॅट येथील डोंगररांगांमध्ये मीठ मोठय़ा प्रमाणावर सापडत होते. त्यामुळे या भागाची भरभराट झाली.

हॉलस्टॅटची मिठाची खाण ७००० वर्षे जुनी आहे. जगातली सगळ्यात जुनी मिठाची खाण म्हणून ही ओळखली जाते. ज्या वेळी रोम नव्हते तेव्हाही ही खाण अस्तित्वात होती. या ठिकाणी झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननात ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातील सांबार शिंग सापडले. त्याचा खाणीतून मीठ काढण्यासाठी कुदळीसारखा वापर केला जात होता. या प्राचीन खाणीची सफर करण्यासाठी ३० युरोचे तिकीट काढावे लागते. तिकीट घराजवळ खाणीची माहिती देणारे प्रदर्शन आहे. या ठिकाणी खाणीतून काढलेले मिठाचे गुलाबी रंगाचे दगड विकत मिळतात. खाण असलेल्या डोंगरावर जाण्यासाठी फेनिक्युलर ट्रेन आहे. ८० अंशात चढणाऱ्या या ट्रेनमधून सरोवराचे आणि डोंगर उतारावर वसलेल्या गावाचे विहंगम दृश्य दिसते. ट्रेनमधून उतरल्यावर जंगलातून रस्ता खाणीकडे जातो. या रस्त्यावर खाणीची माहिती देणारे फलक आणि छायाचित्रे दिसतात. खाणीत शिरल्यावर एक लाकडी घसरगुंडी आहे. खाणीत उतरण्यासाठी कामगार याचा वापर करीत. पुढे कामगारांना खाणीत खोलवर नेणाऱ्या ट्रेनमधून एक तासाची सफर चालू होते. यात खाणीचा इतिहास, भौगोलिक वैशिष्टय़, कामगारांची त्या काळातली जोखीम, त्यांची अवस्था याची माहिती दिली जाते.  खाणीतून बाहेर पडल्यावर फेनिक्युलर ट्रेनने परत न जाता पायवाटेने खाली उतरावे. आल्पस घनदाट जंगलातून जाणाऱ्या या पायवाटेवर अनेक ओहोळ, धबधबे आहेत. वेगवेगळ्या काळात खोदलेली मिठाच्या खाणींची तोंडे (बोगदे) या वाटेवर दिसतात. पायवाटेने उतरताना भोवतालच्या डोंगररांगा आणि सरोवर वेगवेगळ्या कोनांतून दिसते. या पावाटेने तासभरात आपण हॉलस्टॅटच्या मुख्य चौकात पोहोचतो.  हॉलस्टॅट या छोटय़ाशा गावातून फेरफटका मारण्यासाठी एकमेव रस्ता आहे. रस्त्याच्या एका बाजूला नितळ पाण्याचे सरोवर आणि दुसऱ्या बाजूला डोंगर आहे. या डोंगरउतारावर बांधलेली सुबक सुंदर रंगीबेरंगी घरे. प्रत्येक घराच्या बाल्कनीत, फ्लॉवर बेडमध्ये फुललेले फुलांचे ताटवे त्या घराना अजून सुंदर बनवत होते. या घरांचे आणि गावाच्या टोकाला असलेल्या चर्चच्या टॉवरचे सरोवराच्या संथ पाण्यात पडणारे प्रतिबिंब म्हणजे सत्याहून आभास सुंदर ..

गावातल्या या रस्त्यावर अनेक रेस्टॉरंट्सनी टेबल-खुच्र्या मांडलेल्या होत्या. देश-विदेशातली मंडळी तिथे खात-पीत होती. सगळीकडे आनंदी आणि उत्साही वातावरण होते. गावातल्या गल्लीबोळातून चालत आम्ही गावातल्या सेंट्रल (मार्केट) स्क्वेअरमध्ये पोहोचलो. येथून एक रस्ता जेट्टीकडे जातो. एकेकाळी या ठिकाणी मिठाचा बाजार भरत असे. खरेदी-विक्रीचे व्यवहार चालत असत. माल भरलेल्या बोटी सरोवराच्या दुसऱ्या टोकाला जात असत. आज मात्र या ठिकाणी बाजार भरत नाही. येथे आता अनेक रेस्टॉरंट आहेत. जेट्टीवरून सरोवरात फेरफटका मारण्यासाठी बोटी मिळातात. चौकातून एक रस्ता चर्चकडे जातो. या चर्चला लागूनच एक स्मशानभूमी आहे. मुळात या गावात सपाट जागा कमी असल्यामुळे जुनी थडगी उकरून त्याच जागी नवीन मृतदेह पुरले जातात. अशा प्रकारे गेली अनेक शतके उकरलेल्या कवटय़ा आणि हाड इथे रंगवून ठेवलेली आहेत.

हे आगळेवेगळे चर्च पाहून ‘फाईव्ह फिंगर पॉइंट’ या ठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून १४३ क्रमांकाची बस मिळते. बसने आपण फेनिक्युलर ट्रेन स्टेशनपाशी पोहोचतो. ट्रेनने आपण फाईव्ह फिंगर पॉइंटला पोहोचतो. येथे हाताच्या पंजाच्या आकाराचा काचेचा प्लॅटफॉर्म आहेत. त्यावर उभे राहून संपूर्ण हॉलस्टॅटचे विहंगम दृश्य दिसते.

हॉलस्टॅटपासून १४ किलोमीटरवरील डॅचस्टाईन डोंगरात इसवी सन १९१० मध्ये मिळालेली बर्फाची गुहा हे एक आगळेवेगळे ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी ५४३ क्रमांकाची बस पकडून डॅचस्टाईन विझिटिंग सेंटपर्यंत जाता येते. तेथून केबल कारने डोंगरावर पोहोचून साधारणपणे २० मिनिटांचा ट्रेक केल्यावर आपण या बर्फाच्या गुहेत पोहोचतो. भर उन्हाळ्यातही या गुहेतला धबधबा गोठलेले असतो. गुहेतील तापमान शून्याखाली असल्याने उन्हाळ्यातही थंडीचे कपडे घालून या बर्फाच्या नैसर्गिक गुहेची एक तासाची सफर करावी लागते.  हॉलस्टॅटमधील ही सर्व ठिकाणे पाहून तुम्ही संध्याकाळ सरोवराच्या काठावर निवांतपणे घालवू शकता. दुपारनंतर या गावात फिरण्यासाठी आलेले पर्यटक निघून जातात. मग हे गावही मागच्या डोंगराची उशी करून सरोवरात पाय सोडून निवांत बसल्यासारखे दिसते. अशा वेळी या प्राचीन गावातील शांत गल्ल्यांमधून फिरताना वेगळीच मजा येते. डोंगरामागे अस्ताला जाणारा सूर्य जादूई रंगांची उधळण आकाशात आणि सरोवराच्या संथ पाण्यात एकाच वेळी करतो. अशा कातरवेळी तिथली ती शांतता, निसर्ग आपल्यात झिरपत जातो.