ओंकार भिडे

फॉच्र्युनर भारतात सादर होऊन बरीच वर्षे झाली असली तरी गाडीचा रस्त्यावर रुबाब नक्कीच जाणवतो. अर्थात, या सेगमेंटमधील गाडय़ा या शोफर ड्रिव्हनच असाव्यात. एकूण गाडी मोठी असल्याने बम्पर टू बम्पर ट्रॅफिकमध्ये नक्कीच बोजड वाटू शकते. पण, गाडी ऑटोमॅटिक असल्यास गिअर बदलण्याच्या त्रासापासून नक्कीच सुटका मिळते.

फुल साइझ एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल)ना भारतात गेल्या काही वर्षांपासून चांगली मागणी आहे. खरंतर एसयूव्ही या टफ टरेन म्हणजे ओबडधोबड रस्त्यांवर चालविण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आलेल्या असतात. तसेच, यांची पुलिंग पावर अधिक असल्याने वेळप्रसंगी एखादी गाडी ओढण्याचेही तितक्यात लीलया एसयूव्हीमुळे करता येते. एसयूव्ही आकाराने मोठय़ा असल्याने रस्त्यावर या गाडीची शान काही वेगळीच असते. एसयूव्हीकडे स्टेटस सिम्बॉल म्हणजे सुबत्तेचे एक संकेत मानले जाते. त्यामुळे अशा रांगडय़ा एसयूव्हीची मागणी सातत्याने वाढती राहिली आहे. भारतातही आर्थिक येऊ सुबत्ता येऊ लागल्यावर टोयोटा, फोर्ड, जनरल मोटर्स या कंपन्यांनी त्यांच्या हाय परफॉर्मन्स व्हेईलक भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात सुरुवात केली. सुरुवातीला फोर्ट मोटरने आपल्याकडे एंडेव्हर ही जागतिक पातळीवर एव्हरेस्ट नावाने ओळखली जाणारी एसयूव्ही लाँच केली, तर जनरल मोटर्सने कॅप्टिव्हा, ट्रेलब्लेझर या एसयूव्ही बाजारात आणल्या. हुंदाईने टूसॉन एसयूव्ही लाँच केली. पण, टोयोटाने लाँच केलेली फॉच्र्युनर ही एसयूव्ही या सगळ्यात वेगळी ठरली.

भारतात २००९ मध्ये लाँच झालेल्या फॉच्र्युनर एसयूव्हीमध्ये थोडेफार बदल कंपनीने काळानुरूप व स्पर्धा लक्षात घेऊन केले. पण, या सेगमेंटमधील आपले स्थान बळकट करण्यासाठी फॉच्र्युनरचे पूर्णपणे नवे मॉडेलही बाजारात लाँच केले. पेट्रोल व डिझेल इंजिन या दोन्ही पर्यायांत उपलब्ध असलेल्या या गाडीचे ऑटोमॅटिक व्हर्जनही आहे. अर्थात, पेट्रोल मॉडेल फ्यूएल गॅझिलग म्हणजे पेट्रोल पिणारे, असेच आहे. त्यामुळे डिझेल मॉडेल घेण्याकडेच सर्वाधिक कल आहे. आपण गाडीच्या स्टाइलकडे पुढे पाहू. कारण, एसयूव्हीसाठी दमदार इंजिन महत्त्वाचे असते.

लुक्स व फीचर्सविषयी

पहिल्या तुलनेत गाडीच्या इंटीरिअरमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत. गाडी सुरू करण्यासाठी बटन स्टार्ट पर्याय दिला आहे. दार उघडल्यावर इन्स्ट्रमेंट क्लस्टरच्या मधल्या स्क्रीनवर ब्रेकपॅडल दाबून गाडी सुरू करा असा संदेश येतो. तत्पूर्वी फॉच्र्युनरचे डिझाइन त्यावर ब्लिंक होऊन जाते. कूल ग्लोव्ह बॉक्स असून, एलईडी लायटिंग दिले आहे. तसेच, रिअर एसी व्हेंट्स कंट्रोलसह आहेत. कारला नॅव्हिगेशन सिस्टिम, दिशादर्शक दिला आहे. तसेच, सर्व कन्ट्रोल स्टिअिरगवर दिले आहे. टेलगेट ऑटोमॅटिक उघडणारे आहे. हिलहोल्ड असिस्टसह एबीएस ईबीडीसह सहा एअरबॅग्ज दिल्या आहेत. ऑटो हॅडलॅम्प फीचर दिले आहे. अलॉयव्हील्स, पॅडल गिअरशिफ्टही देण्यात आले आहे. इन्फोटेन्मेंट सिस्टिम अद्ययावत आहे. मात्र, साउंडचा अनुभव अपेक्षेइतका नक्की नाही. फॉच्र्युनरच्या पहिल्या मॉडेलच्या तुलनेत नवी फॉच्र्युनर डिझाइन करताना ती देखणी होण्याबरोबर भारदस्तपणा कायम राहील, याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच, पहिल्या तुलनेत ती अधिक रुंद, लांब व उंचीला अधिक आहे. डेटाइम रिनग लाइट आणि स्माइली फ्रंट डिझाइनमुळे सोर्ट्स लुक आला आहे. तसेच, क्रोमचाही पुरेपूर वापर केला असल्याने आकर्षकता वाढली आहे. मागील बाजूस टेललॅम्पची नवी रचना सुंदर असून, एलईडी लाइटमुळे त्याची नजाकत वाढते. मागील बाजूसही क्रोमचा वापर चांगला केला आहे.

अनुभव कसा?

कारला फोर बाय फोरचा असणारा मोड हा एक नॉब वर दिला आहे आणि टफ टरेनमध्ये गाडी अडकल्यास याचा वापर करता येऊ शकतो. तसेच, ग्राउंड क्लिअरन्स दोनशे एमएमपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ओबधोबड ठिकाणी ही गाडी सहज नेता येऊ शकते. शहरी रस्त्यांपेक्षा खडबडीत वा लेव्हल नसलेल्या रस्त्यांवर गाडीचा खरा अनुभव कळतो. मर्यादित वेगाने गाडी चालविल्यास खड्डे जाणवत नाहीत. खडबडीत, चढ असणाऱ्या रस्त्यावर एसी सुरू असताना इकॉनॉमी मोडवर अपेक्षित ताकद मिळत नाही. त्यामुळे अशा रस्त्यावर सरळ पॉवर मोड वा स्पोर्ट्स मोडवर गाडी चालवावी म्हणजे अपेक्षित ताकद मिळेल आणि गाडीच्या इंजिनवर ताण येणार नाही. गाडीमध्ये सातजण बसले असल्यास सर्वात मागे बसणाऱ्या व्यक्तींना अडचणच होते. तसेच, मागील सीटची उंची फार नाही. त्यामुळे ही सात सीटर एसयूव्ही असली तरी ती खऱ्या अर्थाने मोठय़ा व्यक्तींसाठी फक्त फाइव्ह सीटर आहे. खडबडीत रस्त्यावर दीर्घ पल्ल्याचा प्रवास केला तरीही उत्तम सस्पेन्शन व कुशनच्या चांगल्या सीट्समुळे बसणाऱ्यांना आराम मिळतो. ड्रायव्हर सीटला आर्मरेस्ट दिलेला नाही.  तसेच, लेदर अपहोलेस्टी संपूर्ण केबिनला नाही. डॅशबोर्डवर केवळ स्टिअिरगच्या वरील बाजूस ते दिले आहे. पण, लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवास नक्कीच चांगला अनुभव देणारी अशी ही गाडी आहे.

इंजिन

टोयोटाची इंजिन तशी प्रूव्हन इंजिन म्हणजे क्वचितच मोठा खर्च काढणारी आहेत. नवी फॉच्र्युनर लाँच करताना तीन लिटर इंजिनच्या जागी २.८ लिटरचे (२८०० सीसी) टबरे इंजिन दिले आहे. इंजिन स्मूथ असले तरी ऑटोमॅटिक व्हर्जनमध्ये थोडासा लाउडनेस जाणवू शकतो. कारण, ताकद कमी पडते, असे जाणवू लागल्यावर आपण आणखी अ‍ॅक्सिलेट करतो. त्यामुळे इंजिनचा आवाज वाढतो. ऑटोमॅटिक व्हर्जनला सहा गिअर दिले आहेत. विशिष्ट आरपीएमला गिअर बदलल्याचे जाणवते. पण, गाडी कितव्या गिअरमध्ये आहे, (ऑटो गिअर शिफ्ट असणाऱ्या गाडय़ांना गिअर इंडिकेटरची सुविधा आहे) हे कळत नाही. केवळ ड्राइव्ह मोड डॅशबोर्डवर दिसतो. गाडीला इको व पॉवर मोड दिला आहे.

पेट्रोल की डिझेल?

खरंतर फॉच्र्युनर ही शहरातील प्रवासासाठी नाही. तिची मजा ही लांब पल्ल्याच्या, ओबडधोबड रस्त्यावर अधिक आहे. पण, आपल्याकडे अशा गाडय़ा असणे, हे एक स्टेटस सिम्बॉल आहे. त्यामुळे अशा वेळी अन्य गोष्टी या गौण वाटू शकतात. गाडी ऑटोमॅटिक असली तर डिझेल व्हर्जनचे शहरात मायलेज प्रति लिटर ११ किमी मिळू शकते. हायवेवर साधारण १४ किमी मिळू शकते. पण, अशी गाडी घेणाऱ्याकडून ती एक लिटर इंधनावर किती किलोमीटर जाते, याचा विचार फारसा होत नाही. अर्थात, सिंगल डिजिटमध्ये असल्यास नक्कीच धोक्याची घंटा असते. परंतू पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीसाठी जात असाल तर नक्की विचार करावा. फॉच्र्युनरच्या टॉपएंड डिझेल ऑटोमॅटिकची किंमत पस्तीस लाखांच्या पुढे जाते. किमतीच्या या सेगमेंटमध्ये बीएमडब्ल्यू, ऑडीच्या लक्झरी कारदेखील येतात. पण, त्यांच्या फुल साझ एसयूव्ही नाहीत. त्यामुळेच एकूण फुल साइझ एसयूव्ही म्हणून फॉच्र्युनर नक्कीच चांगली आहे. प्रतिस्पर्धी म्हणून फोर्डची एंडोव्हरही आहेच.