राज्यभरात मकरसंक्रांतीला पतंग आकाशी जायचे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ‘ऐ ढील दे, बदव बदव, कंची काप, पेच लढव, लपेट, झोल टाक’ या अशा शब्दांनी कधी काळी आसमंत भरून जायचा. तो आता शांत झाला आहे. एका अर्थाने पतंगबाजीची परंपरा मुंबई आणि मुंबईबाहेरही ‘कट’ली  आहे.. त्याविषयी आमच्या ‘युवा टीम’ने  मांडलेला लेखाजोखा.

गिरगाव, ठाणे, कल्याण आणि बोरिवलीत त्या सरलेल्या दिवसांची केवळ आठवणच उरली आहे. वाऱ्याशी स्पर्धा करत पतंग उडवण्याची मौज आणि ते कापण्यासाठी लागणारी चढाओढ ‘मिस’ करीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पतंग उडवणे ही तर खरी एक कला आहे. ती लोप पावत चालली आहे. भविष्यात कदाचित त्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू होतील, असेही काही जण गमतीने म्हणतात. हे असे निराशेचे वारे वाहत असतानाही काही जण पतंगबाजीत रमले आहेत.

वातावरणात लालबाग, परळ आणि चिंचपोकळी भागांत चाळींमध्ये तिळाचे लाडू वाटले जायचे. हळदीकुंकू समारंभ आणि इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांत पतंगबाजीला ऊत आलेला असायचा. मात्र चाळसंस्कृती जशी लोप पावत गेली, तशी येथील तरुणाईचा उत्साहही कमी झाला. संक्रांतीच्या काळात सूत गिरण्यांमधील मोकळ्या जागांमध्ये पतंग उडविले जायचे. गिरण्या बंद झाल्या आणि पतंग जमिनीवरच राहिले, असे गिरणी कामगार विनायक जोगळे सांगतात.

गिरगावमधील खेतवाडी येथे राहणारा उमेश चिकणे सध्या कांदिवली येथे एका टॉवरमध्ये राहतो. तो लहाणपणी पतंग उडवायचा. त्यासाठी तो मित्रांसहित शाळेला मग पुढे कॉलेजला दांडी मारून पतंग उडवायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी कंपनीत कामाला लागल्यावर संक्रांतीची साधी सुट्टीही गेली. आता केवळ त्यासाठी वेळ काढून गिरगावला जाणे होत नाही आणि मित्रांचा गोतावळाही नाही. मग कसला उत्साह? उमेश खंत व्यक्त करतो.

मुंबईतील मोकळी जागा ही पतंगबाजीसाठी पोषकच होती. मैदानात पतंग उडविणे यासारखा आनंद नव्हता. मात्र येथील जागांच्या विकासाने आनंदही बुडवला, असे लालबागमधील विकास जाधव याने सांगितले.

परळ-भोईवाडा परिसरातील नरे पार्क, कामगार मैदान या ठिकाणी पतंगोत्सव साजरा करण्यासाठी प्रसिद्ध होते. आता येथील उत्साह मावळला आहे, असे सिद्धेश मोरे याने नमूद केले.

टोलेजंग इमारतीतील गच्चीवर अनेकदा परवानगी नसते. मग अशा वेळी इच्छा असली तरी मोकळ्या जागा शोधत फिरावे लागते. असे ठाण्यातील आर्यन बोडके म्हणाला. आज बहुतांश चिमुकल्यांना पतंगबाजी माहीतही नाही. आता काही जण पतंगबाजीच्या तीव्र इच्छेपोटी शहरापासून लांब अंतरावर असलेल्या एखाद्या मोकळ्या जागेत जातात, असे यश चव्हाणने सांगितले. पतंग आणा, मांजा आणा, मोकळी जागा शोधा. त्यातही तसे उत्साही मित्र शोधा. एवढी तयारी सध्यातरी कुणाकडे नाही. त्यात आजची तरुणाई इंटरनेट वा स्मार्ट फोनमध्ये रमलेली आहे. त्यामुळे पतंगबाजी बंद झालीय.

माझ्यावर भरोसा नाय काय?

* ‘सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाय काय’ या टॅगलाइनने पतंग बाजारात

* सलमान खान, बाहुबलीच्या छायाचित्रांचे गोंडा, बादशहा, छत्री अशा विविध नावांनी पतंग बाजारात दाखल झाले आहेत.

* याशिवाय बेटी पढाओ, बेटी बचाओ, स्वच्छ भारत, सुंदर भारत असे संदेश देणारे पतंगांनीही वेगळेपण सिद्ध केले आहे.

शोभेचे पतंग

*  यंदा विविध रंगांतील हाताच्या बोटाएवढे पतंग आणि छोटीशी फिरकी आणि तिरंग्याच्या आकारातील पतंग.

* छोटे पतंग कोडीवरही विकण्यास ठेवले आहेत. कोडी म्हणजे २० पतंगांचा संच. खासगी कंपन्या तसेच घरांमध्ये शोभेसाठी हे पतंग वापरले जातात.

समाजमाध्यमांवरची ‘पतंगबाजी’

बोरिवली, कांदिवली आणि मालाड या भागांत गुजराती आणि मराठी वस्ती जास्त असल्याने पतंगबाजी सुरू असल्याचे येथील निसर्ग शहा यांनी सांगितले. त्यांनी ‘फ्लाय ३६०’ नावाचे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्या नावानेच ‘फेसबुक ग्रुप’ही बनविण्यात आले आहेत. या ग्रुपमध्ये २५ तरुणांचा सहभाग आहे. हे सर्व जण पतंग शिबिरे, महोत्सव आयोजित करतात. त्यांच्या शिबिरात पतंग बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यात तरुणींचा सहभाग जास्त आहे. कल्याण आणि अंबरनाथमधील पतंग महोत्सवांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी पालिकेच्या परवानगीने फलक लावले जातात. पतंगबाजीसाठी समाजमाध्यमांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो.

तरुण व्यावसायिकांचीही पाठ

गेली ७० वर्ष मुंबईतील डोंगरी भागातील इमामवाडय़ात एस. एस. बरेली काइट सेंटरचे मालक मुकिम अहमद खान पतंगवाला यांच्या मुलाने पतंग व्यवसायात फारशी मिळकत नसल्याने मार्केटिंग क्षेत्रात पाय रोवण्यासाठी एमबीए पूर्ण केले आहे. वडिलोपार्जित व्यवसायात पुढच्या पिढीला रस उरलेला नाही, असे शेख नमूद करतात.

पतंग असे..तसे!

* एका काडीचा आणि तीन काडीचा पतंग

* छत्रीच्या आकाराचा पतंग

* प्लास्टिकआणि कागदी पतंग

* पाच ते ९० रुपयांपर्यंत किमतीचे पतंग

* १० फुटी पतंग

* डोरेमॉन, भीम, मोटू-पतलू या कार्टून आकारातील पतंग.

* सिंथेटिक कापडाचे चिनी बनावटीचे पतंग. पतंगाची मधली काडी काढून त्याची घडी घालून ठेवता येते.