|| अनिल पंतोजी

हॉर्न वाजवाच

हे चिन्ह दिसताक्षणी हॉर्न वाजविणे बंधनकारक आहे. घाट रस्त्यावरील आंधळे वळण (ब्लाईंड कॉर्नर) किंवा पुढील रस्ता दिसत नसेल तर हॉर्न वाजविणे सक्तीचे आहे. ज्यायोगे इतर वाहनचालकांना आपल्या अस्तित्वाची जाणीव होईल.

प्रतिबंध समाप्त

हे चिन्ह असे दर्शवते की आपण करीत असलेल्या प्रवासात काही चिन्हांद्वारे जे प्रतिबंध लादण्यात आलेले दिसत होते त्याची समाप्ती झालेली आहे. परंतु कायद्याद्वारे बंधनकारक असलेल्या वेगमर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर चिन्ह जरी दर्शवलेले असले तरीही चालकाने बेफिकीर न राहता सावधानतेने वाहन चालवावे.

सक्तीचे डावे वळण

हे चिन्ह असे दर्शवते की, सदर ठिकाणी चालकाला सरळ किंवा उजवीकडे वळणे सोयीचे असले तरीदेखील त्याला तसे करता येणार नाही. डावीकडे वळणेच बंधनकारक आहे.

सक्तीची किमान वेगमर्यादा

सदर चिन्ह पुढील प्रवासात वाहनाची गती, वेगमर्यादा किती असावी याबाबत मार्गदर्शन करते. रस्ता सुरक्षेकरिता निर्धारित गतीचे पालन करणे बंधनकारक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.