|| अनिल पंतोजी

सावधान करणारी चिन्हे

सावधान करणारी चिन्हे वाहनचालकास पुढील प्रवासातील रस्त्यांची स्थिती किंवा संभाव्य धोक्याची जाणीव करून देतात. आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेकरिता वाहन योग्य आणि काळजीपूर्वक चालवावे. या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्याही कारवाईस तोंड द्यावे लागत नाही, परंतु स्वत:च्या किंवा रस्त्यावरील इतरांच्या सुरक्षिततेस धोका पोहचू शकतो. सदर चिन्हेवरील आकाराची असून त्याला लाल रंगाची किनार असते.

पादचारी सडकपार मार्ग

पादचारी हा रस्त्यावरील वाहतुकीचा राजा आहे. झेब्रा क्रॉसिंगवर पादचाऱ्यांचा पहिला अधिकार असतो. हे चिन्ह दिसताच वाहनचालकाने वाहनाचा वेग कमी करून वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडेच थांबविणे अपेक्षित आहे.

पुढे शाळा आहे

वाहनचलकास समजण्यासाठी नजिकच्या क्षेत्रात शाळा असल्यास सदर चिन्ह रस्त्यावर दर्शविले जाते. शाळकरी मुले बऱ्याच वेळा पळत रस्ता पार करतात किंवा त्यांच्याच विश्वात मग्न असतात. त्यामुळे चालकाने विशेष सावधानता बाळगणे गरजेचे आहे. हे चिन्ह दिसताच वाहनाचा वेग कमी करत सावधानपूर्वक वाहन चालविले पाहिजे.

वर्तुळ मार्ग

वर्तुळ मार्गाचा वापर काटरस्त्यास पर्याय म्हणून केला जातो.  आधीच वर्तुळ मार्गात असलेल्या वाहनांना प्रधान्य देण्यात यावे. ज्या दिशेला वळायचे असेल त्याच मार्गिकेमध्ये वाहन ठेवावे व वळताना योग्य त्या दिशा दर्शकाचा वापर करावा.