05 August 2020

News Flash

घरचा आयुर्वेद : तळपायांच्या भेगा

सतत जागरण करण्याची सवय असणाऱ्यांनाही पायाला भेगा पडण्याचा त्रास होतो.

वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक ayurvijay7@gmail.com

तळपायांना ‘ भेगा पडणे’ ही तक्रार हिवाळ्यामध्ये हमखास अनेक जणांमध्ये आढळून येते. हा त्रास नेमका कशामुळे होतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. या तक्रारीला आयुर्वेदशास्त्राने ‘पाद्दारी’ असे संबोधलेले आहे. पायांच्या भेगांचा त्रास वाटतो लहान, पण तो सुरू झाल्यास असह्य़ होतो. म्हणून वेळीच त्याला आवर घालणे आवश्यक आहे.

नेहमी पायी प्रवास करणाऱ्या मनुष्याच्या दोन्ही पायातील वायू (वातदोष) प्रकोषित होऊन पायांना रुक्षपणा (कोरडेपणा) आणतो. त्यामुळे पायांच्या तळव्याला भेगा पडतात व त्या ठणकतात. अशा अर्थाचे वर्णन ‘योगरत्नकार’ या आयुर्वेदीय चिकित्सा ग्रंथामध्ये सापडते. यावरून दोन्ही गोष्टी स्पष्ट होतात, त्या म्हणजे या रोगामध्ये वातदोषाचा संबंध प्रामुख्याने आहे. आणि शरीरात कोरडेपणा निर्माण करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, त्यामुळे पायांतही कोरडेपणा वाढून भेगांचा त्रास अधिक होतो. या ठिकाणी ‘रुक्षता’ हा शब्द वापरलेला आहे. रुक्षता आणि स्निग्धता हे शरीरातील घटकांमधील गुण आहेत. आपण करीत असलेल्या आहार विहारावर या दोन्ही गुणांचे शरीरातील प्रमाण अवलंबून असते. यामधील संतुलन बिघडले की शरीरात काही तरी विकृती निर्माण होतात. या ठिकाणी भेगा पडण्याच्या संदर्भात रुक्षता वाढते, असे म्हटले आहे. याचा अर्थ शरीरात असलेला प्राकृत स्नेहांश कमी होतो. तो कमी होण्यासाठी आपण केलेला रुक्ष आहारविहार कारणीभूत ठरतो. थंडीच्या दिवसात मुळात बाहेरच्या वातावरणात गारवा असतो. या गारव्यामुळे काहींची कातडी (विशेषत: तळपायाची ) रुक्ष होते आणि भेगा पडतात. याला आहारातील काही घटक तसेच व्यक्तींची मूळ प्रकृतीही कारणीभूत ठरते. वातदोषप्रधान प्रकृतीच्या लोकांना या भेगांचा त्रास फार होतो. त्यांच्या शरीरात मुळातच रुक्षता असते. त्यांचा कोठा जड असतो. हात-पाय बारीक असतात. त्वचा कोरडी असते. त्यांना पायी फिरण्याची भारी हौस असते. अति श्रम करणाऱ्या व्यक्तींमध्येही कोरडेपणा वाढून भेगांचा त्रास अधिक होतो. पायात पादत्राणे न घालणे, कायम कोरडय़ा व थंड वातावरणात राहणे, या गोष्टीही यास कारणीभूत ठरतात.

सतत जागरण करण्याची सवय असणाऱ्यांनाही पायाला भेगा पडण्याचा त्रास होतो. रात्रीचे जागरण हे शरीरात रुक्षता निर्माण करत असल्याने हा त्रास होतो. आहारातील काही घटकही यास कारण ठरतात. त्यामध्ये विशेषत: अतिशय तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यात असल्यास शरीरातील प्राकृत स्निग्धता कमी होते आणि त्वचा कोरडी बनते. शेव, फरसाण तसेच ब्रेडसारखे रुक्ष पदार्थ खाण्यानेही शरीरात कोरडेपणा निर्माण होतो. साजूक तूप न खाणे हा प्रकार सध्या नवीनच सुरू झाला आहे .आपले ‘कोलेस्टरॉल’ वाढेल या भीतीपोटी अनेकजण गाईचेही शुद्ध तूप खाईनासे झाले आहेत. त्यामुळे शरीरात योग्य तेवढी स्निग्धता निर्माण होत नाही, कोरडेपणा वाढण्याचा संभव अधिक असतो आणि शिवाय तुपामध्ये असणाऱ्या अनेक गुणांपासून आपण आपल्या शरीरास वंचित ठेवतो.

दूध पिण्याचीही प्रवृत्ती कमी होत चाललेली आहे. त्याऐवजी मोठय़ा प्रमाणावर चहाचे सेवन वाढलेले आहे. यामुळेही शरीरातील रुक्ष, स्निग्ध गुणांचे संतुलन बिघडण्याचा संभव असतो. दिवसेंदिवस वाढत चाललेले तंबाखू सेवनाचे प्रमाणही शरीरात रुक्षता निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे.

आयुर्वेदिक उपचार

मुळात ही तक्रार शरीरातील कोरडेपणा आणि त्यामुळे वातदोष वाढून निर्माण होते. म्हणून यावर उपचार करणे हिताचे ठरते. त्या दृष्टीने साजूक तूप हे बाह्य़ व अंतर्गत उपयुक्त आहे. गायीचे तूप शंभर वेळा विशिष्ट पद्धतीने धुऊन तयार केलेले ‘ शतधौत ‘ हे या भेगांवर मलमाच्या स्वरूपात लावल्यास अतिशय उपयुक्त ठरते. तूप, राळ, मेण, गेरू अशा औषधी घटकांपासून तयार केलेले आयुर्वेदीय मलम या भेगांवर उपयुक्त ठरते. पोटामध्ये दूध, तूप यासारखे पदार्थ योग्य प्रमाणात घेतल्याने चांगला लाभ होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 3:02 am

Web Title: trench foot symptoms causes and treatment zws 70
Next Stories
1 आजारांचे कुतूहल : सिलिअ‍ॅक डिसीज
2 योगस्नेह : भस्रिका प्राणायाम
3 आरोग्यदायी आहार : तिळगूळ पोळी
Just Now!
X