आत्माराम परब atmparab2004@yahoo.com 

या अफ्रिकन देशांमध्ये वन्यजीव आणि पुरातत्त्वाच्या दृष्टीने अनेक स्थळे पाहण्यासारखी आहेत. ‘द ग्रेट मायग्रेशन’ म्हणून ओळखली जाणारी घटना येथे अनुभवता येते. त्याचबरोबर ‘बिग फाइव्ह’ म्हणून ज्यांना वन्यजीव पर्यटनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे असे प्राणी पाहता येतात. या दोन्ही देशांची एकत्रित सफर सोयीस्कर आणि आर्थिकदृष्टय़ा परवडणारी आहे. सवाना गवताळ कुरणांमध्ये भटकणारे प्राणी पाहणे भन्नाट असते. जून-जुलैमध्ये टांझानियातील झेब्रा आणि वाईल्ड बीस्ट लाखोंच्या संख्येने मारा आणि तिलक नद्या ओलांडून केनियात येतात. मेअखेरीस टांझानियाच्या बाजूस नदीच्या तीरावर या प्राण्यांचे कळप गर्दी करू लागतात. जून-जुलैमध्ये ते नदी पार करून ते केनियामध्ये येतात. हे स्थलांतर रोमांचक असते. मे महिन्यात येथील गवताळ कुरणांत भटकणेही वेगळा अनुभव ठरतो. मुंबई ते नैरोबी विमान-प्रवास करून किमान आठ-नऊ  दिवसांत ही भटकंती शक्य होते. नैरोबीत अनेक खासगी राष्ट्रीय उद्याने आहेत. ओल पजेटा हे विषुववृत्तावरचे असेच महत्त्वाचे खासगी अभयारण्य. रिफ्ट व्हॅली ही सर्वात मोठी दरी आहे. त्यातील तलाव, पक्षी पाहायला मिळतात. मसाई मारा हे येथील महत्त्वाचे आकर्षण. सेरेंगिटी पठार हे टांझानिया आणि केनियामध्ये विभागले आहे. गोरोंगरो, सेरेंगिटी, मसाई मारासाठी प्रत्येकी दोन दिवस ठेवावेत. अभयारण्यांच्या आत राहणे तुलनेने खर्चीक आहे. आत कॅम्पिंग साइट्स आहेत. त्यांचा वापर केल्यास खर्चात तीस-चाळीस हजारांची कपात होते. मात्र या कॅम्पिंग साइट्सना कुंपण नसते.