15 January 2021

News Flash

खेडचे पश्चिमरंग

या गावातीलच जोशी घराण्यातील लाडुबाई यांचा विवाह थोरल्या बाजीरावांशी झाला.

(संग्रहित छायाचित्र)

ओंकार वर्तले

सरत्या पावसाळ्यात जर तुम्ही आडवाटेवरची ठिकाणे शोधत असाल तर पुणे जिल्ह्य़ातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागात जायलाच हवे. निसर्गाने अगदी भरभरून दान दिलेल्या या तालुक्यात भटकंतीच्या ठिकाणांची अगदी मनसोक्त उधळण आहे. काहीशा आडवाटेवरच्या परंतु तेवढय़ाच तोलामापाच्या आणि काही अल्पपरिचित ठिकाणांनी समृद्ध असलेल्या या भागात फिरण्याची मजा काही औरच आहे.

खेड म्हणजेच राजगुरूनगर पुणे-नाशिक रस्त्यावर वसलेले तालुक्याचे ठिकाण. येथून वाडा गावाकडे जाणारा रस्ता पकडायचा. महामार्गापासून जसजसे पश्चिमेला जाऊ तसे निसर्गाचे बदलेले स्वरूप डोळ्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. गर्द होत गेलेली व डोळ्यांना सुखवणारी वनराई, ग्रामीण बाजाचं जनजीवन, चहुबाजूंनी वेढलेल्या डोंगररांगा यामध्ये चाललेली आपली वाटचाल ही स्वप्नवत असते. हा सारा भाग सह्य़ाद्रीच्या कुशीत वसला असल्यामुळे या भागाला इतिहासाचीदेखील झालर लाभली आहे.

या रस्त्यावरून आपल्याला पहिल्यांदा लागते ते चास गाव. ऐतिहासिक आणि भौगोलिक अशा दोन्ही बाबींनी समृद्ध असलेले. कौटुंबिक भटकंतीसाठी सुरेख ठिकाण. भीमा नदीच्या तीरावर वसलेले हे गाव म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांची सासुरवाडी. या गावातीलच जोशी घराण्यातील लाडुबाई यांचा विवाह थोरल्या बाजीरावांशी झाला. विवाहानंतर त्यांचे नाव काशीबाई असे झाले. त्यांचे वडील महादजी कृष्ण जोशी हे पेशव्यांचे सावकार होते. चास गावात आजही त्यांचा वाडा पाहावयास मिळतो. याशिवाय पेशव्यांनी भीमा नदीवर बांधलेला घाटदेखील पाहता येतो. जुनी मंदिरे, प्राचीन वाडे हे चासचे वैशिष्टय़. येथील शंकराचे प्राचीन मंदिर सोमेश्वर हे आणखी वेगळे आकर्षण! मंदिर स्थापत्यातील उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिराची दीपमाळ आवर्जून पाहण्यासारखी आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट दीपमाळेत तिची गणना होते. एकूण २५६ दिवे लावता येतील अशी ही दीपमाळ एरवीदेखील सुरेख दिसतेच, पण त्रिपुरारी पौर्णिमेला तिचे सौंदर्य आणखीनच खुलून येते. तो सोहळा अत्यंत नयनरम्य असतो. मात्र त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेला तेथे हजर असायला हवे.

चासनंतर लागतो तो चासकमान जलाशय. या भागातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरलेला हा जलप्रकल्प म्हणजे आधुनिक मंदिरच होय. त्याच्या काठावर उभे राहून लांबवर पसरलेले निळेशार जलसौंदर्य पाहात राहण्यात काही औरच मजा आहे. चहुबाजूंनी डोंगरांच्या कोंदणात वसलेला हा जलाशय मनाला आनंद देऊन जाते. या धरणाच्या कडेकडेने आपला रस्ता पुढे जात राहतो. हळूहळू डोंगर आपल्या भोवतीचा विळखा अधिकच घट्ट करत जातात. पावसाळ्यात तर हे दृश्य आणखीनच रम्य असते. हिरवेगार डोंगर व या डोंगरांना लगडलेल्या धबधब्यांच्या पांढऱ्याशुभ्र माळा हे चित्र आवर्जून अनुभवावे असेच आहे.

मजल दरमजल करत आपण एका फाटय़ापाशी येऊन थांबतो. येथून डावीकडचा रस्ता भोरगिरीला जातो, तर उजव्या बाजूचा रस्ता भीमाशंकरला. भीमाशंकरचा रस्ता खडय़ा चढाचा आहे. या वाटेवर असणाऱ्या मंदोशी गावात आपल्याला जायचं आहे. हे गाव म्हणजे गाव कमी आणि निसर्गचित्रच अधिक आहे. येथील धबधबा प्रसिद्ध आहे. डोंगरमाथ्यावरून कोसळणारा जलप्रवाह येथील मूळ सौंदर्यात भर घालतो. हा धबधबा देखणा तर आहेच, शिवाय मनसोक्त भिजवणारा आहे. अगदी रस्त्यावरूनच त्याचे दर्शन होते. कडेला गाडी लावून चालत दहा मिनिटांत आपण हा धबधबा गाठू शकतो. अर्थातच सर्वच धबधब्यांवर जाताना जी काळजी घ्यायची तीच येथे देखील घ्यावी लागेल.

मंदोशीवरून पुन्हा मागे येऊन भोरगिरीकडे जाणारी वाट पकडायची. सात-आठ किलोमीटरवर असलेले भोरगिरी म्हणजे येथील भटकंतीचा उत्कर्षबिंदूच म्हणायला हवा.

भोरगिरी किल्ल्याशेजारून एक वाट भीमाशंकरला जाते. पावसाळी भटकंतीत ही वाट एकदा तरी अनुभवावी अशीच आहे. निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो हे या वाटेशिवाय तुम्हाला कळणार नाही. तीन-साडेतीन तासांच्या डोंगरभटकंतीत निसर्गाचे जे काही रूप दिसते ते आयुष्यभर पुरून उरेल, असे असते. असे हे खेड तालुक्याचे पश्चिमरंग! येथला कोपरा न् कोपरा देखणा आहे. कॅलिडोस्कोपमधल्या रंगसंगतीसारखा.

 

भोरगिरी

या ठिकाणाला धार्मिक संदर्भ तर आहेतच, पण निसर्गानेही भरभरून दिले आहे. गावाजवळच भोरगिरी नावाचा प्राचीन किल्ला आहे. राजा भोज याने निर्मिलेला हा किल्ला पावसाळ्यात खुलून येतो. किल्ल्यावर लेणीवजा गुहा असून त्यामध्ये एक शंकराची पिंड आहे. विशेष म्हणजे यावर बारा ज्योतिर्लिगांच्या पिंडी आहेत. याबद्दल गावातील लोक अनेक आख्यायिका सांगतात.

ovartale@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 1:58 am

Web Title: trip to western part of khed taluka in pune district
Next Stories
1 दोन दिवस भटकंतीचे : गडहिंग्लज-चंदगड
2 खाद्यवारसा : नारळी भात
3 शहरशेती : घरातील प्रकाशाचे प्रकार
Just Now!
X