शहरशेती : राजेंद्र भट

गाजर

गाजर वीतभर रुंद व फूटभर खोल जागेत वाढू शकते. त्याचे दोन प्रकार आहेत.

१) देशीलाल गाजर – फक्त हिवाळय़ात तयार होते. २) युरोपियन – केशरी रंगाचे, काही ठिकाणी हे वर्षभर होऊ शकते. गाजराला थंड व कोरडे हवामान मानवते. महाराष्ट्रात बहुधा ते नसतेच. गाजराचा कालावधी ७० ते ९० दिवस असतो. पाणी जास्त दिल्यास पाल्याची वाढ जास्त होऊन गाजर लहान राहते. पावसाळा संपल्यावर गाजराचे बी लावावे. पाला वाढवण्यासाठी उष्णता लागते, तर कंद पोसण्यासाठी थंडी आवश्यक असते. म्हणून सप्टेंबर-ऑक्टोबरपासून गाजराचे बी लावण्यास सुरुवात करून दर १५-२० दिवसांनी थोडे थोडे बी लावत जावे. त्यामुळे सातत्याने गाजरे मिळत राहू शकतात. युरोपियन गाजरे उन्हाळय़ातसुद्धा येतात.

रताळी

याचा जमिनीवर पसरणारा वेल असतो. रताळय़ाच्या दोन्ही टोकाच्या भागापासून रोपे करता येतात. कोवळय़ा पानांची भाजी करता येते. वाफ्यावर वेल वाढल्यास वेलीच्या प्रत्येकी पेरातून मुळे येतात. त्यामुळे मूळच्या मुळांची वाढ होत नाही व रताळी तयार होत नाहीत. वेल वाढल्यावर गुंडाळून मागे ठेवावा. वेलाला फुले आली म्हणजे रताळी लागण्यास सुरुवात झाली असे समजावे. एखादे रताळे खोदून त्याची साल खरवडून बघावी. जर त्यातून चीक आला तर रताळे अजून तयार नाही. रताळय़ाचे वेल ३-४ पेरांचे तुकडे नवीन लागवडीसाठी वापरता येतात.