शहरशेती: राजेंद्र भट

बीट : हा पौष्टिक कंद आहे. तो तयार होण्यास ७० ते ९० दिवस लागतात. याचे बी आपल्याकडे तयार होत नाही. ते पालकच्या बीसारखे दिसते. फक्त थोडे मोठे असते. बीट वर्षभर लावता येतो. कोकणात ते पावसाळ्यात लावतात. त्याच्या लालसर रंगाच्या कोवळ्या पानांची भाजी चांगली होते. याची पाने पालकसारखीच, पण लालसर असतात.

अळू : अळूचे दोन प्रकार आहेत. एकाला कंद येतात आणि दुसऱ्याच्या मुळ्यांतून नवीन रोपे तयार होतात. काही अळूचे कंद आपण भाजीसाठी वापरतो. काहींचे सांडगे करतो. अळूच्या पानाच्या जाडीनुसार ते भाजी अथवा वडीसाठी वापरतात. जास्तीचे पाणी काढून घेणे हा अळूचा गुणधर्म आहे.

रताळी : यांचा वेल जमिनीवर पसरतो. रताळ्याच्या दोन्ही टोकांच्या भागांपासून वेल वाढवता येतो. कोवळ्या पानांची भाजी करता येते. वाफ्यावर वेल वाढल्यास त्याच्या प्रत्येक पेरातून मुळे येतात आणि मूळच्या मुळांची वाढ होत नाही आणि रताळी मिळत नाहीत. त्यामुळे वेल वाढल्यानंतर गुंडाळून मागे ठेवावा. वेलाला फुले आली की रताळी येण्यास सुरुवात झाली असे समजावे. माती उकरून एखादे रताळे बाहेर काढावे. साल खरवडून पाहावी. चीक आला तर रताळे अजून तयार नाही, असे समजावे. रताळ्याच्या वेलाचे ३-४ पेरांचे तुकडे नवीन लागवडीसाठी वापरता येतात.