शहरशेती : राजेंद्र भट

हळद:- हे मध्यम आकाराचे थोडय़ा सावलीत वाढू शकणारे पीक आहे. हळदीच्या पिकाचा कालावधी ८-९ महिने असतो. त्यानंतर झाड मरते आणि कंद सुप्तावस्थेत जातो. ही सुप्तावस्था ३-४ महिने असते. त्यानंतर या कंदांना पावसाळ्याच्या आधी मोड येतात. हळदीत करक्युमीन नावाचा औषधी घटक असतो. त्याचे प्रमाण हळदीच्या जातीनुसार चार ते १५ टक्के असते.

हळदीच्या कंदांची वाढ पावसाळा संपल्यानंतर होते. या काळात कंद मातीच्या वर आले, तर त्यावर माती टाकून झाकावे. कंदांना सूर्यप्रकाश आवडत नाही. सूर्यप्रकाशात त्यांची वाढ होत नाही. मातीने झाकलेले असल्यास कंदांचे उत्पादन वाढते.  हळदीच्या पानांचा उपयोग लोणी कढवताना करतात. कंदांची भुकटी करून ती स्वयंपाकात वापरली जाते.हळदीच्या औषधी गुणधर्मामुळे शरीरांतर्गत जखमा बऱ्या होतात. यात वनस्पतीत कर्करोग प्रतिबंधक गुण असतात.

आंबेहळद

या हळदीच्या पानांची मधली शीर तांबडी असते. ही हळदीपेक्षा जास्त वाढणारी वनस्पती असून तिची वाढ हळदीप्रमाणेच होते. आंबेहळदीचा वापर लोणच्यासाठी होतो. तसेच मुक्या मारावर तुरटी आणि हळद उगाळून लावतात. पानग्या करण्यासाठी मात्र आंबे हळदीचे पान वापरू नये. त्यामुळे पानग्या कडू होण्याची शक्यता असते. हळद आणि आंबेहळदीची झाडे पूर्ण मरून आडवी पडली की अमावास्येच्या सुमारास कंद काढावेत.