लातूर

शनिवार

ऐन पावसाळ्यात मराठवाडय़ात जावे. सर्वत्र हिरवेगार झालेले असते. लातूर या व्यापारी गावी जावे. राष्ट्रकुट राजा दंतीदुर्गच्या काळात याचे नाव लत्तलूर असे होते. इथून दक्षिणेला २० कि.मी. वरच्या औसाला जावे. तिथला किल्ला पाहण्यासारखा आहे. त्याचे बुरुज, त्यातील विहिरी आणि किल्लय़ातील तोफा पाहाव्यात. किल्लय़ाच्या भिंतीत बसवलेला सप्तमातृकापट्ट अवश्य पाहावा. तिथून खरोसा लेणीला जावे. इ.स. ६ व्या शतकात खोदलेली ही लेणी. त्यातली नरसिंह, रावण, महाभारत युद्धप्रसंग पाहण्याजोगे आहेत. बसलेल्या जैन र्तीथकराचे शिल्प सुंदर आहे. तिथून १० किमी वर असलेल्या निलंग्याला जावे. तिथले नीलकंठेश्वर मंदिर पाहावे. मंदिरातली हरगौरीची मूर्ती महाराष्ट्रात इतरत्र कुठेही नाही. शिव-पार्वतीच्या पायाशी असलेली घोरपड मुद्दाम पाहावी.

रविवार

लातूरवरून उत्तरेला ३२ किमी पानगावला जावे. तिथले विठ्ठल मंदिर पाहावे. त्यावरील सुडौल सुरसुंदरी फारच देखण्या आहेत. तिथून ३२ किमी परळी वैजनाथला जावे. ते १२ ज्योतिर्लिगांपैकी एक आहे. ते पाहून ३० किमीवर अंबाजोगाईला जावे. योगेश्वरीचे मंदिर सुंदर आहे. तेथील गणेशमूर्ती अप्रतिम आहे. विष्णुमूर्ती न चुकता पाहावी. मंदिराच्या मागची लेणी पाहावीत. गावात खोलेश्वराचे मंदिर आहे. तिथे असलेला देवनागरीतील शिलालेख पाहावा. आद्यकवी मुकुंदराज समाधीला जावे. ते रम्य ठिकाण आहे. खूप मोर असतात. पासोडीकार दासोपंतांचे मंदिर पाहावे. गावात चौबारा इथेही एक शिलालेख आहे तो पाहावा. पुन्हा लातूरला परतावे.

ashutosh.treks@gmail.com