ओंकार वर्तले

पर्यटनाची आवड आहे परंतु जुन्नर माहीत नाही, असा माणूस महाराष्ट्रात सापडणे कठीणच आहे. अगदी प्राचीन काळापासून जुन्नर विविध कारणांसाठी प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक गड-किल्ले लेणी आणि घाटवाटांनी समृद्ध असलेला जुन्नर सर्वानाच माहीत आहे. पण याच जुन्नरची आणखी एक बाजू आहे. ती आहे भक्तिभावाने रसरसलेल्या धार्मिक स्थळांची!

ग्रामीण संस्कृतीशी एकरूप झालेली आणि लोकांच्या श्रद्धेशी जोडलेली काही सुंदर मंदिरे जुन्नरच्या परिघात मोठय़ा दिमाखात उभी आहेत. या ठिकाणांना भेट देणं, त्यामागचा इतिहास, परंपरा जाणून घेणं हा एक समृद्ध करणारा अनुभव ठरतो.

बेल्हे गावचा गुप्त विठोबा

आळेफाटय़ापासून साधारण १२ किलोमीटर अंतरावर बेल्हे नावाचे गाव लागते. हे गाव तसे ऐतिहासिक आहे. तसे संदर्भ आपल्याला विविध ऐतिहासिक कागदपत्रांतून मिळतात. या गावाची बांगरवाडी डोंगराच्या कुशीत वसलेली आहे. या वाडीत विठोबाचे फारच सुंदर मंदिर गर्द झाडीत उभे आहे. या विठोबाला गुप्त विठोबा या नावाने ओळखले जाते. या विषयीची एक आख्यायिका येथे ऐकवली जाते. ती म्हणजे गावातीलच एका गुराख्याला डोंगराच्या पोटात एक भुयार असल्याचे दिसले. जेव्हा या भुयारात खोदकाम केले तेव्हा तिथे विठोबाची मूर्ती सापडली. विठोबाचे गुप्त ठिकाण म्हणून हे मंदिर गुप्त विठोबा या नावाने ओळखले जाते. आजमितीला येथे देखणे मंदिर आहे. या भुयारात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आत गेलो की खूप प्रसन्न वाटते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी येथे फार मोठी यात्रा भरते.

म्हैसोबा समाधी मंदिर

भागवत धर्मामधील अत्यंत महत्त्वाचा आणि संत ज्ञानदेवांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग म्हणजे रेडय़ाच्या मुखातून वदवून घेतलेला वेद. पैठणमधील विद्वानसभेत माउलींनी घडवलेला हा प्रसंग अजरामर झाला. हा शब्दरूपी चमत्कार घडल्यानंतर माउली आणि त्यांची भावंडे म्हैसोबासहित आळंदीकडे निघाली. चालत, मजल-दरमजल करत डोंगरदऱ्या-घाट पार करताना म्हैसोबा थकले. झाडाच्या आळ्याच्या आकाराचा डोंगर आणि त्याच्याभोवतीच्या पठारी भागातच म्हैसोबा समाधिस्त झाले. ते ठिकाण म्हणजेच आळेगाव. याच ठिकाणी ज्ञानदेवांनी म्हैसोबाला मूठमाती दिली. येथे आता एक सुंदर मंदिर बांधले आहे. त्याच्या गर्भगृहात असलेला समाधीचा दगड हा रेडय़ाच्या तोंडासारखा आहे. त्याच्या शेजारीच ज्ञानदेवांचा मुखवटा आहे. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे तिथे कित्येक वर्षांपासून अहोरात्र वीणा पहारा चालू आहे. आळेफाटय़ापासून कल्याण-नगर महामार्गावर नगरच्या दिशेने साधारण एक किलोमीटरवर हे मंदिर आहे.

पूरचा कुकडेश्वर

जुन्नरहून आपटाळेमार्गे नाणेघाटाकडे जाताना पूर या नावाचे गाव लागते. गाव अगदी डोंगराच्या कुशीत वसले आहे. कुकडी नदीचा उगम येथूनच होतो असे ग्रामस्थ मोठय़ा अभिमानाने सांगतात. याच नदीच्या उगमावर कुकडेश्वर नावाचे देखणे प्राचीन शिवमंदिर आहे. नवव्या शतकात शिलाहार राजा झंज याने महाराष्ट्रात एकूण १२ शिवमंदिरे विविध नद्यांच्या उगमस्थानी बांधली. त्यापैकीच एक मंदिर म्हणजे कुकडेश्वर असे इतिहासकार सांगतात. कालौघात या मंदिराची बरीच पडझड झाली आहे. परंतु स्थानिक रहिवाशांनी संवर्धनाच्या दृष्टीने बरेच प्रयत्न केल्याचे दिसते. पश्चिमाभिमुख असलेलं हे शिवालय दगडातील कोरीव कामांनी सजलेलं आहे. गणेशपट्टी, कीर्तिमुखे, वराह अवतार, शिवतांडव शिल्प, कोरीव खांब यामुळे हे मंदिर संस्मरणीय ठरते. ऐन पावसाळ्यात जर तुम्ही या परिसरात आलात तर निसर्गाच्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेता येईल. या मंदिराच्या जवळच नाणेघाट, दाऱ्या घाट, शिवनेरी, चावंड, जीवधन अशी ठिकाणेही पाहता येतात.

नळावणे गावचा खंडोबा

बेल्हे गावच्याच पुढे नळावणे गावातील खंडोबाचे मंदिर डोळ्यांचे पारणेच फेडते. बेल्हेवरून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात आलो की आपले दूर डोंगरावर असलेल्या या मंदिराकडे चटकन लक्ष जाते. गाडीने डोंगरावर आलो की आपण क्षणभर स्तंभितच होतो. डोंगरावर पसरलेल्या प्रचंड पठारावर असलेलं हे खंडोबाचं मंदिर खरोखरच पाहण्यासारखं आहे. नैसर्गिक स्थानामुळे या मंदिराला पठारावरचा खंडोबा असेही म्हटले जाते. गावकऱ्यांनी या मंदिराचा उत्तम पद्धतीने जीर्णोद्धार केला आहे. मंदिराच्या भोवताली उद्यान आहे. सुंदर सभागृहही आहे. त्यामुळे येथे सहकुटुंब सहलीचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.

कोरठणचा खंडोबा

नळावणे मंदिरासारखेच खंडोबाचे दुसरे मंदिर कोरठण येथे आहे. हे मंदिर पारनेर तालुक्यात मात्र जुन्नरला खेटूनच आहे. जुन्नर भेटीत आवर्जून पाहावे असे हे मंदिर आहे. हे मंदिरही प्रशस्त असून त्याचा अतिशय सुंदर पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे पितळेची मल्हारमूर्ती. आवर्जून पाहावी अशीच ही मूर्ती आहे. खरतर नळावणे आणि कोरठण ही दोन्ही खंडोबाची मंदिरे ही या पट्टय़ातील नागरिकांची श्रद्धास्थाने आहेत.