ऑटो एक्स्पोत चारचाकी व दुचाकी हे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळेच याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. २०२० पर्यंत काही कंपन्यांकडून बॅटरीवर चालणारी वाहने लाँच होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील दोन ते चार वर्षांत होणाऱ्या बदलांची नांदी या ठिकाणी दिसणार आहे.

क्यू ५०१ : ही टाटा मोटर्सची सर्वात प्रीमियम एसयूव्ही असण्याची शक्यता आहे. टोयोटा फॉच्र्युनर, फोर्ड एंडेव्हर यांनाही स्पर्धक असू शकते. क्यू ५०१ ही ४.४ पर्यायामध्ये असू शकेल व यास २.२ लिटरचे मल्टिजेट डिझेल इंजिनचा पर्याय मिळू शकतो.

नवी सेदान कार : अ‍ॅडव्हान्स मॉडय़ुलर प्लॅटफॉर्मवर आधारित नवी सेदान कार टाटा मोटर्स ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्याची शक्यता आहे. पण ही कार २०१८ मध्येच लाँच होऊ  शकेल का नाही, याबाबत अजून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. ही कार सियाझ, सिटी, व्हर्ना या सेगमेंटमधील असणार असून, यास १.५ लिटरचे डिझेल व १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन असेल.

टीयूव्ही ३०० प्लस : सध्याच्या टीयूव्ही ३००चे एक्स्टेंडेड व्हर्जन म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ही मागील बाजूने अधिक स्पेशियस असणार असून, यामुळे आसन क्षमता वाढणार आहे.

रेनॉ : क्विड व डस्टर या दोन गाडय़ा सोडल्या तर अन्य मॉडेलना बाजारपेठेत फारसे ग्राहक मिळालेले नाहीत. स्कालाला मिळाले नसले तरी सेदान सेगमेंटमध्ये नवी कार लाँच होण्याची शक्यता आहे. डस्टरचे नवे मॉडेल ऑटो एक्स्पोत सादर होणार आहे. पाच व सात आसनी, असा पर्याय यामध्ये असू शकतो. क्विडला मिळालेला प्रतिसाद पाहता क्विडचा पोर्टफोलियो आणखी शक्तिशाली करण्याच्या तयारीत आहे. क्विड रेसर लाँच होऊ  शकतो. अधिक स्पोर्टियल लुक याला दिला जाणार आहे.

होंडा : नव्याने लाँच केलेल्या सिटीमुळे पुन्हा होंडाने भरारी घेतली आहे. पण अजून काही सेगमेंटमध्ये होंडाला आपला जम बसविता आलेला नाही. त्यामुळेच प्रीमियम हॅचबॅकमध्ये जॅझचे नवे मॉडेल लाँच होऊ  शकते. हॅचबॅकमध्ये लाँच झालेल्या ब्रिओला ग्राहकांनी नाकारले होते. परंतु कंपनी काही नवे बदल करून ब्रिओला उभारी देण्याचा विचार करीत आहे. तसेच, कॉम्पॅक्ट सेदानमध्ये नवी अमेझ लाँच होणार आहे. एसयूव्ही सेगमेंटमध्ये सीआर व्ही, एचआर व्ही लाँच होऊ  शकते. पण या दोन्ही गाडय़ा या प्रीमियम श्रेणीतील आहेत.

कॉम्पॅक्ट एसयूव्ही : क्रेटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र वाढत्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ह्य़ुंदाईची एसयूव्ही नाही. या सेगमेंटमध्ये ह्य़ुंदाई प्रवेश करण्याची अपेक्षा असून, ऑटो एक्स्पोत कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे प्रोटोटाई मॉडेल सादर होऊ शकते.

ह्य़ुंदाई : ह्य़ुंदाईची एक्सेंट, ग्रँड आय १०, व्हर्ना यांना चांगली मागणी आहे. आपला हिस्सा वाढविण्यासाठी कंपनी तीन ते चार नवी मॉडेल भारतात लाँच करण्याच्या विचारात आहे. यातील प्रमुख आकर्षक नवी स्टँट्रो असणार आहे. आय २० व क्रेटा या वाहनांचे पूर्णपणे नवे मॉडेल वा कॉस्मोटिक अपग्रेड असणारे व्हर्जन लाँच होणार आहे.

एस २०१ : कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट सध्या जोरात असून, यामध्ये स्पर्धा तीव्र आहे. वाढती बाजारापेठ महिंद्रलाही खुणावत आहे. त्यामुळेच आगामी काळात कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच होण्याची शक्यता आहे. कोडनेम एस २०१ ही याच सेगमेंटमध्ये असेल. यास पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टियागो स्पोर्ट्स : टियागो या टाटा मोटर्सने सादर केलेल्या पहिल्या इम्पॅक्ट डिझाइनवर आधारित कारला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच आणखी एक पाऊल पुढे जाऊन टियागो कारचे शक्तिशाली मॉडेल बाजारात आणण्याच्या विचारात कंपनी आहे. टियागो स्पोर्ट्स मॉडेल लाँच होण्याची अपेक्षा असून, यास नेक्सॉनला बसविलेले ११० बीएचपीचे १.२ लिटरचे टबरे चाज्र्ड पेट्रोल इंजिन महिंद्र आगामी काळात अनेक नवी मॉडेल बाजारात आणणार आहे. यामध्ये पेट्रोल-डिझेलबरोबर बॅटरीवर चालणारी वाहनेही असतील.

फोर्ड : कंपनीने लाँच केलेल्या फिगो, फिगो अस्पायर या कारना बाजारपेठेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, स्पर्धक कंपन्यांकडून त्यांच्या कारमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच स्पर्धेत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी फोर्ड फिगो व अस्पायर या दोन्ही मॉडेलचे सुधारित व्हर्जन लाँच करणार आहे. त्यांचे टेस्टिंगही सुरू आहे. ऑटोएक्स्पोत ते प्रदर्शितही होऊ  शकते. तसेच, सध्या क्रॉसओव्हर कार आपल्या पोर्टफोलियोत असाव्यात अशा हेतूने या कारकडे पाहण्यात येत आहे. त्यामुळेच काही आवश्यक बदल करून अधिक पॉवरफुल अशी फिगो क्रॉस लाँच होणार आहे.

दुचाकींचेही अनेक मॉडेल : दुचाकींची नवी मॉडेल बाजारात आणण्यास काही कंपन्यांनी सुरुवातही केली आहे. बजाज ऑटोने डिस्कव्हरचे ११० व १२५ सीसीचे नवे मॉडेल ऑटो एक्स्पोपूर्वीच सादर केले आहे. आगामी काळात कंपनीकडून तीन नव्या दुचाकी बाजारात येणार असून, पल्सरचे नवे रूप असण्याची अपेक्षा आहे. हीरो मोटोकॉर्पही ऑफरोड, स्पोर्ट्स, कम्युटिंग, मोटोस्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. यातील सुपर स्प्लेंडर, पॅशन या मॉडेलची घोषणा करण्यात आली आहे. एक्सस्ट्रीम एनएक्सस्टी, एक्सप्लस, लीप हायब्रीड आदी एक्स्पोत सादर होऊ  शकतात. (उत्तरार्ध)