22 October 2019

News Flash

कशी ठरते रिसेल व्हॅल्यू?

गाडी विकताना गाडीची स्थिती; गाडीने किती प्रवास केला आहे; गाडी कधी विकत घेतली आहे

नवी गाडी घेताना गाडीची किंमत, मायलेज, त्यात दिल्या जाणाऱ्या सुविधा या पहिल्या जातात. हे निकष महत्त्वपूर्ण आहेतच. यासह गाडीची रिसेल व्हॅल्यू काय हेदेखील विचारात घेतले जाते. नवीन गाडी घेताना ती किती वर्षे वापरायची याचे गणित आधीच झालेले असते. त्यामुळे आपण घेत असलेल्या मॉडेलला सेकंड हॅण्ड कार बाजारात काय ‘किंमत’ आहे? हे एकदा तपासून घेणे योग्य ठरते.

भारतात जवळपास ८० टक्के गाडय़ा या कर्ज काढून विकत घेतल्या जातात. अशा परिस्थितीत तुमची जुनी गाडी विकून जी रक्कम मिळते ती नवीन गाडी विकत घेण्यासाठी वापरता येते. म्हणजे एका अर्थाने तुमची जुनी गाडी नव्या गाडीसाठी पैसे उभे करते. त्यामुळे एका चांगल्या कंपनीचे विश्वसनीय मॉडेल घेतल्यास ते विकल्यावर तुम्हाला चांगली रिसेल व्हॅल्यू मिळेल आणि यामुळे तुमच्या कर्जाचा हप्तादेखील कमी होईल. इथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे आणि तो म्हणजे रिसेल व्हॅल्यू ही गाडीच्या मॉडेलला असते, ठरावीक कंपनीला नाही. जर एखाद्या कारला चांगली रिसेल व्हॅल्यू असेल तर याचा अर्थ असा नाही की त्या कंपनीच्या सर्वच मॉडेल्सना चांगली रिसेल व्हॅल्यू मिळत असेल. काही लोकप्रिय कंपन्यांच्या गाडय़ा रिसेल व्हॅल्यूमध्ये निराश करतात, तर काही तितक्याशा लोकप्रिय नसणाऱ्या कार कंपन्यांचे ठरावीक मॉडेल चांगल्या किमतीला विकत घेण्यासाठी ग्राहक तयार होतात.

गाडी विकताना गाडीची स्थिती; गाडीने किती प्रवास केला आहे; गाडी कधी विकत घेतली आहे; गाडी पेट्रोल आहे, डिझेल आहे का सीएनजी; गाडीचा पूर्वी कधी अपघात झाला आहे का; या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात. मात्र गाडीचे मॉडेल आणि कंपनी हे त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. थोडक्यात काय तर कार बाजारात एखाद्या गाडीची असलेली प्रतिमा तिची किंमत ठरवण्यात जास्त प्रभावी ठरते. कार बाजारात भारतात मिळणाऱ्या गाडय़ांची विभागणी त्यांच्या कंपन्यांनुसार तीन प्रकारांत होते. जर्मन आणि अमेरिकन गाडय़ा या इंधनाचा वापर अधिक करतात. तर जपानी गाडय़ा या तांत्रिकदृष्टय़ा प्रगत असतात आणि भारतीय गाडय़ा या चांगल्या मायलेज देतात. अशी एक ढोबळ विभागणी करण्यात आली आहे. सेकंड हॅण्ड बाजारात ग्राहक कमी मेंटेनन्स असणाऱ्या गाडय़ांना पसंती देतात.  कमी मेंटेनन्स म्हणजे ज्या गाडीची देखभाल करण्यासाठी जास्त खर्च करावा लागत नाही अशा गाडय़ा. या गाडय़ांना चांगली रिसेल व्हॅल्यू मिळते. म्हणजे सेकंड हॅण्ड कार बाजारात अमेरिकी आणि जपानी गाडय़ांहून भारतीय आणि जपानी गाडय़ांना ग्राहकांची अधिक पसंती असते.

त्यानंतरचा मुद्दा येतो तो आफ्टर सेल सव्‍‌र्हिसचा. यावरूनच तुमच्या गाडीची खरी किंमत ठरते. ज्या कंपनीचे देशभरात सव्‍‌र्हिस सेंटर आहेत, अगदी ग्रामीण भागात देखील ते सेवा देतात अशा कंपनीच्या गाडीची पुनर्विक्री किंमत निश्चितच अधिक असते. गाडीचे भाग बाजारात उपलब्ध असणे हे गाडीच्या रिसेल व्हॅल्यूसाठी महत्त्वपूर्ण असते.

चांगल्या रिसेल व्हॅल्यू असणाऱ्या गाडय़ा

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा

सगळ्यात चांगली रिसेल व्हॅल्यू मिळवणाऱ्या गाडय़ांपैकी इनोव्हा एक आहे. ज्या काळात इनोव्हाने बाजारात धुमाकूळ घातला होता. तेव्हा या गाडीची रिसेल किंमत जवळपास नवीन गाडी इतकीच होती. आजही जुनी इनोव्हा चांगली किमतीला विकली जाऊ  शकते.

होंडा सिटी

सेडान बाजारात होंडा सिटीच्या रिसेल व्हॅल्यूला तोड नाही. चांगले इंजिन आणि मायलेज, गाडीचे सुरेख डिझाइन या गाडीच्या रिसेल व्हॅल्यूमध्ये भर घालतात. १९९८ मध्ये या गाडीने भारतात पदार्पण केले तेव्हापासून या गाडीच्या लोकप्रियतेत खंड पडला नाही.

२२२मारुती सुझुकी डिझायर

सुरुवातीला स्विफ्ट डिझायर नावाने विकली जाणारी ही गाडी सध्या केवळ डिझायर या ब्रॅण्डिंगखाली बाजारात विकली जात आहे. विकण्यास सर्वाधिक सोपी गाडी म्हणून डिझायरकडे पाहिले जाते. यामुळे या गाडीला चांगली रिसेल व्हॅल्यू मिळते.

टोयोटा फॉच्र्युनर : टोयोटाच्या विश्वासार्हतेमुळे या गाडीला चांगली रिसेल व्हॅल्यू मिळते. ऑफ रोडवरदेखील चांगली कामगिरी, अधिकाधिक लोड घेण्याची क्षमता यामुळे ही गाडी चांगलीच लोकप्रिय आहे.

हुंदाई ग्रँड आय१०

एण्ट्री लेवल हॅचबॅकमध्ये अजूनही आय १०ची जादू कमी झाली नाही. गाडीत असणारे विविध फीचर्स, राइड क्वॉलिटी यामुळे ही गाडी लोकप्रिय आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट

भारतीय बाजारात स्विफ्टला पर्याय नाही. कार डीलरदेखील स्विफ्ट खरेदी करताना जास्त विचार करत नाहीत, कारण ही गाडी लगेच विकली जाते. सेकंड हॅण्ड बाजारात स्विफ्ट तुमचा तोटा करणार नाही अशी धारणा आहे.

मारुती सुझुकी अर्टिगा

मारुतीची ही सात सीटर कार शहरी आणि ग्रामीण भागातही चांगलीच लोकप्रिय आहे. सेकंड हॅण्ड कार बाजारात या गाडीला मोठी मागणी आहे. सात सीटरमध्ये एक चांगला परवडणारा पर्याय म्हणून ही गाडी ग्राहकांच्या पसंतीची आहे.

मारुती सुझुकी वॅगन आर

वॅगन आर विकत घेण्यासाठी लोक नेहमी तयार असतात. गाडीची विश्वासार्हता जास्त असल्याने सेकंड हॅण्ड कार बाजारात ही गाडी चांगल्या किमतीत विकली जाते.

First Published on January 12, 2019 2:01 am

Web Title: used car valuation resale car valuation car resale value