ऋषिकेश बामणे

फेब्रुवारी महिना म्हटला की सगळ्यांनाच वेध लागतात ते प्रेमाचे अन् ‘व्हॅलेंटाइन डे’चे. शाळा-कॉलेजातल्या मुला-मुलींपासून ते तिशितल्या तरुण-तरुणींपर्यंत सर्वानाच या गोड-गुलाबी दिवसाचे अप्रूप वाटते. अशा वेळी वलयांकित व्यक्तींच्या प्रेमाच्या चर्चाही सुरू होतात. क्रीडा विश्वही त्याला अपवाद नाही. मैदानातील कामगिरीतून कारकीर्दीत मैलाचे दगड गाठणाऱ्या अनेक खेळाडूंची जन्मगाठही मैदानातच बांधली गेली. आज ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने अशाच काही जोडय़ांची गोष्ट..

दिनेश कार्तिक – दीपिका पल्लीकल

प्रेमात प्रत्येकालाच एकदा तरी अपयश किंवा धोका मिळतोच, असे म्हणतात. भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या बाबतीत ही बाब अगदी चपखल बसते. पहिल्या पत्नीने संघातीलच दुसऱ्या खेळाडूशी लग्न केल्यानंतर कार्तिकने हा मानसिक धक्का दूर करून शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी त्याने बसू यांच्या फिटनेस शिबिराकडे मोर्चा वळवला. भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल त्याला याच शिबिरात भेटली. ‘क्रिकेटमुळे भारतात इतर खेळांची प्रगती होत नाही’ असं एकेकाळी सांगणाऱ्या दीपिकाला वैयक्तिक आयुष्यात मात्र क्रिकेटपटूच जोडीदार म्हणून पसंत पडला. दिनेश कार्तिकच्या साध्या सरळ स्वभावाने तिला भुरळ घातली आणि २०१५ मध्ये आधी ख्रिश्चन आणि नंतर तमिळ रीतिरिवाजानुसार हे दोघेही विवाहबंधनात अडकले.

पारुपल्ली कश्यप-सायना नेहवाल

खेळाच्या मैदानातून विवाहाच्या बंधनात अडकण्याच्या मालिकेतील ताजे उदाहरण म्हणजे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पारुपल्ली कश्यप यांची जोडी. १५ डिसेंबर २०१८ रोजी विवाह करणाऱ्या या जोडीचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या प्रेमप्रकरणाची पुसटशी चर्चा बॅडमिंटनच्या वर्तुळातही नव्हती. बालपणापासून एकत्र खेळत असलेल्या या गुणी बॅडमिंटनपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ला सिद्ध केल्यानंतरच एकमेकांच्या गळ्यात माळ घातली.

 

अन्य काही जोडय़ा

हीना सिधू व रोनक पंडित (नेमबाजी), गीता फोगट व पवन कुमार (कुस्ती) यांनीसुद्धा खेळाच्या मार्फत प्रेमप्रकरण फुलवले. याव्यतिरिक्त, विदेशातील ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मिचेल स्टार्क व महिला क्रिकेटपटू अ‍ॅलीसा हिली, गोल्फपटू टायगर वूड्स व धावपटू लिंडेसी विन्से, मारिया शारापोव्हा व ग्रिगोर दिमित्रोव्ह (टेनिस) यांसारख्या काही जागितक जोडय़ासुद्धा खेळातूनच उदयास आले आहेत. स्टेफी ग्राफ -आंद्रे आगासी यांची जोडी आजही लोकप्रिय आहे. त्यामुळे एकूणच सध्या या प्रेमाच्या महिन्यात येणाऱ्या काळात आणखी अशा काही खेळ-जोडप्यांची नावे समोर आल्यास कोणालाच आश्यर्च वाटणार नाही.

शोएब मलिक-सानिया मिर्झा

भारत-पाकिस्तानातील संबंधांविषयी तसे फारसे न बोललेलेच बरे. खेळाच्या मैदानापासून ते राजकीय क्षेत्रात या दोघांमध्ये चढाओढ सुरूच असते. मात्र भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या प्रेमप्रकरणाने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. १२ एप्रिल २०१० मध्ये लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत दोघांची भेट झाली. त्या वेळी पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या दोघांच्या लग्नानंतर समाजमाध्यमांवर मात्र चांगलेच वादळ निर्माण झाले. आजही भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्याचा उल्लेख निघतो, तेव्हा सानिया आणि शोएब यांच्याकडे जल्पकांचा मोर्चा वळतोच.