06 April 2020

News Flash

मनोमनी : प्रेमाची (आभासी) भावना!

तरुणांना प्रेम आणि आकर्षण यातला फरक अनेकदा करता येत नाही.

डॉ.अमोल देशमुख

प्रेम ही एक सुखद आणि चिरकाल टिकणारी भावना आहे. प्रेमाच्या नात्याचे प्रतीक म्हणून तरुणाई व्हॅलेंटाइन डे, फ्रेडशिप डे साजरी करते. आजकाल तरुणांमध्ये प्रेमप्रकरणं वाढताना दिसत आहेत. याचे कारण संपर्क करणे सुलभ झाले आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांमुळे एकमेकांसोबत आकर्षण निर्माण होत असते. मात्र समाजमाध्यामांच्या अतिवापरामुळे नात्यांमध्ये भावनिक अस्थिरता तयार होत आहे. अनेकदा ही ओळख आभासी असते.

तरुणांना प्रेम आणि आकर्षण यातला फरक अनेकदा करता येत नाही. प्रेम या भावनेला आवड, तीव्रता, उत्तेजना, एकमेकांची गरज, ओढ, आदर, एकनिष्ठता, आकर्षण, विश्वास, स्वीकार, जबाबदारी, तडजोड असे बरेचसे पैलू आहेत. आजकाल अनेकदा प्रेमाची नात्यांमध्ये असुरक्षितता, अविश्वास, मतभेद होताना दिसत आहे. तरुणाईमध्ये ब्रेकअप (प्रेमभंग) होताना जरा जास्तच दिसत आहे. ब्रेकअपची कारणे अनेकदा क्षुल्लक असतात. प्रेमभंग झाल्याने काही जण भावनिकदृष्टय़ा सावरतात, पण अनेक जण असह्य भावनांमध्ये वाहत जातात. प्रेमाच्या नात्यात दोघांचा तेवढाच सहभाग असणे गरजेचे आहे, अन्यथा एकाच बाजूने असलेल्या प्रेमाला ‘एकतर्फी प्रेम’ म्हणता येईल.

प्रेमाचे नाते आपल्याला सुरक्षितता, जिव्हाळा आणि असा व्यक्ती देते, ज्याच्या सोबत आपण आयुष्यभर राहू शकतो. प्रेमाच्या नात्यात वादविवाद, मतभेद तर होणारच. वादविवादातून राग, चिंता, उदासीनता, खंत यांसारख्या असह्य भावना निर्माण होतात. मनात निर्माण होणाऱ्या असह्य भावना या स्वनिर्मित असतात, जोडीदारामुळे नाही, हे समजून घेणे गरजेच आहे. उलटपक्षी स्वत:ला किंवा जोडीदाराला दोषी ठरवणे हे उत्तर नसून स्वत:मध्ये निर्माण झालेल्या असह्य भावनांची जबाबदारी घेऊन त्या भावना स्वीकारणे गरजेचे आहे. खरंतर जोडीदाराबाबत आणि नातेसंबंधांबाबत असलेले स्वत:चे दुराग्रह, अविवेकी दृष्टिकोन हे आपल्यामध्ये असह्य भावना निर्माण करतात. परिणामरूपी प्रेमाच्या नात्यांमध्ये तफावत निर्माण होते.

स्वत:विषयी, जोडीदाराविषयी आणि नात्याविषयी असलेले दुराग्रह, मागण्या प्रेमसंबंधांमध्ये बरीच वैचारिक, भावनिक आणि वर्तनविषयीची तफावत निर्माण करते. त्यापैकी काही मागण्या म्हणजे माझे प्रेमाचे नाते एकदम उच्च दर्जाचे आणि परफेक्ट असले पाहिजे, नाहीतर ते ठेवण्यात काही अर्थ नाही, माझ्या जोडीदाराने माझे सर्वच ऐकले पाहिजे, माझ्या जोडीदाराने माझ्या सर्व गरजा पूर्ण केल्याच पाहिजेत, माझ्या जोडीदाराने माझ्यावर १०० टक्के प्रेम केले पाहिजे, माझ्या जोडीदाराने मला नकार द्यायलाच नको.

नात्यामध्ये केवळ माझाच दृष्टिकोन योग्य आहे हा दुराग्रह सोडून दिला तरच तुम्ही जोडीदाराच्या भूमिकेतून विचार करण्यासाठी सज्ज होता. प्रेमाच्या नात्यात आपण जेव्हा ‘च’ची भाषा वापरून अविवेकी आणि बालिश हट्ट करतो, तेव्हा स्वत:चे आणि नात्याचे नुकसान करून घेतो.

आपल्याला आवडत असलेल्या व्यक्तीकडून आलेल्या नकाराला योग्य पद्धतीने सामोरे जाणे हा भावनिक नियंत्रणाचा महत्त्वाचा भाग आहे. नातेसंबंधांमध्ये आपल्याला नकार येऊ  नये असे जरी वाटत असले तरीही आपल्याला नकार यायलाच नको, असा दुराग्रह धरणे अयोग्य आहे.  तरीही मला दिलेला नकार हा माझ्या प्रयत्नांना होता, संपूर्ण व्यक्तीला नव्हता तसेच जोडीदाराला नकार देण्याचे पूर्णपणे व्यक्तिस्वातंत्र्य आहे हे लक्षात घेतल्यास स्वत:ला असह्य भावनांवरून सह्य भावनांपर्यंत घेऊन जाता येते जेणेकरून निर्माण झालेल्या भावनिक कलहातून स्वत:ला वेळेत सावरणे शक्य होते.

प्रेमाच्या नात्यामध्ये जोडीदाराचा ‘सशर्त स्वीकार’ (अटी घालून) करणे टाळणे गरजेचे असते. जोडीदारात एखादी गोष्ट कमी असली तरी ती वाढवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. पण ती कमी आहे म्हणून तू माझा नावडता किंवा तुझ्यावरच प्रेम कमी झाले असे नाही. अर्थात जोडीदाराचा ‘बिनशर्त स्वीकार’ (विनाअट) केल्यास नाते अधिक समृद्ध बनते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 1:42 am

Web Title: valentines day virtual feeling of love zws 70
Next Stories
1 आयुर्उपचार : स्नेहन
2 उपचारपद्धती : सिद्ध
3 पूर्णब्रह्म : सासम
Just Now!
X