शहरशेती – राजेंद्र भट

मांडवावर वेल दोन पद्धतींनी वाढवता येतात. उभा मांडव आणि आडवा मांडव. उभा मांडव पद्धतीत ९० अंशांत वेलाची लागवड केली जाते. या पद्धतीने कमी जागेत जास्त भाजी घेता येते. ज्या वेलींची वाढ तुलनेने कमी असते, अशा वेली उभ्या मांडवावर वाढवता येतात. काकडी, चवळी, कारले इत्यादी पिके घेण्यासाठी हा मांडव योग्य ठरतो. आडव्या मांडवावर दुधी, शिराळी, पडवळ, घोसाळी इत्यादी भाज्यांची लागवड केली जाते.

मांडवाखाली केलेल्या वाफ्यांमध्ये ३० दिवसांची पालेभाजी, ६०-७० दिवसांचे कडधान्य, ४५ दिवसांचा मुळा, २ महिन्यांची काकडी आणि अडीच महिन्यांमध्ये उत्पादन देणाऱ्या वेलभाज्यांची लागवड करता येते. या बहुस्तरीय, बहुपीक पद्धतीत जागेचा पुरेपूर वापर करून घेता येतो आणि विविध गरजा भागवता येतात. मातीच्या खोलीपासून मांडवाच्या उंचीपर्यंत विविध पिके घेता येतात. घरासमोरील जागा, सोसायटीचे आवार, गच्ची किंवा गॅलरी अशा कोणत्याही मोकळ्या आणि पुरेसा सूर्यप्रकाश येणाऱ्या जागेत वेलभाज्यांची लागवड करता येते.