|| राजेंद्र श्रीकृष्ण भट

साधारणपणे सर्वच परदेशी म्हणजेच एक्झॉटिक भाज्या आपण गच्ची, बाल्कनी किंवा ग्रिलमधील कुंडय़ांमध्ये वाढवू शकतो. त्यासाठी फक्त लागवडीची पद्धत, काळजी, रोगांचे स्वरूप, ते झाल्यास करायच्या उपाययोजना यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. केवळ ४५-६० दिवसांचे आयुष्य असलेल्या आणि वर्षभर येणाऱ्या दोन्ही भाज्या एकत्र लावाव्यात. त्यामुळे क्रमाक्रमाने भाज्या मिळत राहतात.

या भाज्यांचे विविध रंग, त्यांच्या पानांचा सुगंध आणि त्यांची चव यामुळे त्यांना कीड लागण्याची शक्यता फारच कमी असते. तरीही अधूनमधून काळजी घेणे उत्तम. बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी एक चमचा ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनस पावडर पाण्यात मिसळून हे पाणी कुंडय़ांत घालावे. त्यामुळे बहुतेक रोग नियंत्रित राहतात.

या सर्व भाज्या परदेशी असल्यामुळे त्यांपैकी बहुतेक भाज्यांचे बी आपल्याकडे तयार होत नाही. त्यामुळे या बिया किंवा तयार रोपांचे ट्रे दरवेळी रोपवाटिकेतून विकत आणावे लागतात. जेवढय़ा बिया पेरल्या जातात तेवढय़ा सर्वच उगवतात असे नाही. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी बी ऐवजी शहराजवळच्या रोपवाटिकेत तयार रोपांचे ट्रे मिळाल्यास तेच आणणे उत्तम. अशा भाज्या घरातच उपलब्ध असल्यामुळे रोजच्या आहारात अगदी सहजपणे वैविध्य आणता येते आणि विविध पोषक घटकांचाही समावेश करता येतो.