लाख मोलाचे वाहन घेताना त्याच्या संरक्षणासाठी विमा कवच घेतले जाते. पण, प्रीमियम जास्त पडतो म्हणून काहीवेळा त्याचे नूतनीकरण करण्याबाबत चालढकल केली जाऊ  शकते. पण, वाहनाच्या इन्शुरन्सबाबत असे करणे हे महागातच पडू शकते. त्यामुळे तो का करावा, कसा करावा याचा घेतलेला आढावा.

कोणतेही वाहन घ्यावे मग ते दुचाकी असो वा चारचाकी यावर बहुतेक कुटुंबात चर्चा होत असते. त्याविषयी सर्व जण मत नोंदवीत नसले तरी कोणते वाहन घरात येणार याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. आपण मोठय़ा उत्साहाने वाहन खरेदी करण्यासाठी सर्वप्रकारच्या गोष्टी करतो. आजकाल दुचाकींच्या किमतीही लाख रुपयांच्या आसपास आहेत, तर काही दुचाकी लाख रुपयांच्या पुढेही आहेत. तसेच, कारचा विचार केल्यास ती लाख मोलाची आहे. आर्थिक गोष्टींची पूर्तता करून आपण मुहूर्त वा विशेष दिवशी वाहन घरी आणतो. तसेच, काही वेळा आपले वाहन अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्याच्या अ‍ॅक्सेसरीजवरही हजारो रुपये खर्च करतो. दुरुस्ती-देखभालही वेळेवर करतो (अर्थात, ही गोष्ट महत्त्वाची आहे). तसेच, वाहन स्वच्छ दिसण्यासाठी ते पुसतो. आजकाल महानगरांतून वा शहरांतून दुचाकी व चारचाकी पुसण्यासाठी मासिक शुल्क दिले जाते. पण, हे करताना एक महत्त्वाची गोष्ट करण्याचे काही वेळा राहून जाते. पण ती गोष्ट न करणे महागात नक्की पडू शकते. वाहनाचा (दुचाकी, चारचाकी वा अन्य मोठे स्वयंचलित वाहन) इन्शुरन्स अर्थात विमा उतरविणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन खरेदी केल्यानंतर वर्षभराने विम्याने नूतनीकरण करण्याचा विसर पडतो. विशेषत: दुचाकींच्या बाबतीत. पण, वाहनाचा विमा करणे आवश्यक आहे. कायद्यानुसार वाहनाचा थर्ड पार्टी विमा उतरविणे बंधनकारक आहे. पण, अनेक वेळा याकडे कानाडोळा केला जाऊ  शकतो. तसेच, वाहनाचा संपूर्ण विमा असल्यास नुकसान भरपाई विम्याच्या दाव्यातून मिळत असते. त्यामुळे वाहनाचा विमा करताना काही गोष्टी आपण जाणून घेणे आवश्यक आहे.

वाहन खरेदी करताना काहीवेळा डीलर (वितरक) विचारतो की इन्शुरन्स तुम्ही करणार की आम्ही करायचा? त्यावेळी आपला नेहमीचा इन्शुरन्स एजंट असल्यास त्याच्यामार्फत इन्शुरन्स करावा आणि नसल्यास डीलरकडून तो करून घ्यावा. आपण एखादे वाहन विकल्यास व त्याचा इन्शुरन्स घेणाऱ्याच्या नावावर हस्तांतर (टान्सफर) केल्यास इन्शुरन्स कंपनी आपणास एक नो क्लेम बोनस सर्टिफिकेटही देते. हे आपण त्या तारखेपासून तीन वर्षे पुढे वापरू शकतो आणि या आधारे नवीन इन्शुरन्स करताना आपल्याला सर्टिफिकेटवर नमूद केलेल्या टक्केवारीप्रमाणे वजावट मिळते. मात्र, हे सर्टिफिकेट तीन वर्षे ग्राह्य़ राहते.

नो क्लेम बोनस

इन्शुरन्स कंपन्या इन्शुरन्स हप्त्यावर (मूळ) घसघशीत डिस्काऊंट देऊ  शकतात. यासंदर्भात इन्शुरन्स कंपनी वा इन्शुरन्स एजंटशी बोलून घेणे आवश्यक असते. दुचाकीसाठी  अशी डिस्काऊंटची रक्कम मोठी नसली तरी कारसाठी विशेषत: सेदान, एसयूव्ही या सेगमेंटमधील व परदेशी बनावटींच्या गाडय़ांच्या प्रीमियममधून अशा डिस्काऊंटमधून घसघशीत बचत करता येते. नो क्लेम बोनसचे सर्टिफिकेट आणि डिस्काऊंट हे इन्शुरन्स प्रीमियम कमी करणारे दोन महत्त्वाचे घटक आहेत.

कॅशलेस सेवा

आजकाल वाहन वितरकाकडून काढलेल्या इन्शुरन्स पॉलिसीवर त्याच वितरकाकडे कार दुरुस्त करून घेतल्यास कॅशलेस सेवा मिळते. म्हणजे इन्शुरन्सधारकास वाहन दुरुस्तीची पूर्ण रक्कम न भरता विशिष्ट रक्कम (घसारा रक्कम, नामंजूर खर्च आदी) भरून वाहन घरी नेता येते. येथे क्लेम फॉर्म भरणे, सव्‍‌र्हेअरकडून कागदपत्रे छाननी, दुरुस्तीपूर्व व नंतरची तपासणी ही सर्व कामे वितरकाच्या दुरुस्ती वर्कशॉपच्या व्यक्तींमार्फत केली जातात. ग्राहकास फार धावपळ करावी लागत नाही व रोख रकमेची तजवीजही करावी लागत नाही.

थर्ड पार्टी इन्शुरन्स

वाहन चालविताना समोरील वाहन, व्यक्ती वा मालमत्तेचे नुकसान पोहोचल्यास त्याचे मालक, वारस याकरिता भरलेल्या इन्शुरन्स हप्त्यातून भरपाई मागतात. ही भरपाई सर्वसाधारण अमर्यादित असू शकते व ती न्यायालयीन आदेशाप्रमाणे दिली जाते. वाहनाच्या इंजिन क्षमतेप्रमाणे, वजन वाहन किंवा प्रवासी वाहन क्षमतेवर तृतीय पक्ष दायित्व इन्शुरन्स हप्ता (थर्ड पार्टी इन्शुरन्स) अवलंबून असतो. देशभर त्या प्रकारच्या वाहनासाठी समान थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम आकारला जातो. या भागात वरील संरक्षणाव्यतिरिक्त इन्शुरन्स कंपनी मालक-चालक, पगारी चालक, वाहनातील प्रवासी, क्लीनर, हमाल भाडे न देता प्रवास करणारे प्रवासी यांना इन्शुरन्स संरक्षण (कव्हर) देते. मालक चालकाला अपघात इन्शुरन्सचे मर्यादित तर पगारी चालकास अमर्यादित कायदेशीर भरपाई संरक्षण मिळते. प्रवाशांना ठरविलेल्या रकमेएवढे तर क्लीनर, हमाल, भाडे न देता प्रवास करणारे प्रवासी यांना न्यायालयीन आदेशाप्रमाणे भरपाई मिळू शकते. वर नमूद केलेली सर्व भरपाई ही अपघातामुळे आलेले अपंगत्व, मृत्यू व नुकसान यांनाच लागू होते. वाहनात बसविलेल्या गॅसवर चालणाऱ्या यंत्रणेची किंमत नमूद करून त्यावर तसेच त्यामुळे संभाव्य नुकसानीसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स वेगळा भरावा लागतो. अपघातामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे होणारे नुकसान भरून देण्यासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स महत्त्वाचा ठरतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या इन्शुरन्स प्रीमिअममध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कशाला इन्शुरन्स काढायचा, असा विचार करून याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, तो काढण्याचे टाळणे महागात पडू शकते.

झिरो डेप्रिसिएशन पॉलिसी

नवीन सुविधांनुसार सध्या झिरो डेप्रिसिएशन पॉलिसी नवीन वाहनांना दिली जाते. यामध्ये अपघातग्रस्त वाहनाचा इन्शुरन्स दावा (क्लेम) करून दुरुस्ती करताना बदलले जाणारे सुटे भाग यावर आकारला जाणारा घसारा (डेप्रिसिएशन) ग्राहकाकडून कापला जात नाही. म्हणजे वाहनाच्या वयोमानानुसार अपघातामुळे बदलाव्या लगणाऱ्या सुटय़ा भागाचे वय लक्षात घेऊन त्यातून घसारा वजा केला जातो व अशा निरनिराळ्या भागांच्या घसाऱ्याची रक्कम टॅक्ससह एकत्रित ग्राहकाकडून वसूल केली जाते. कंपनी दर कंपनी याच्या वेगवेगळ्या ऑफर्स असतात. वर नमूद केलेले डिस्काऊंट व अन्य बाबींचे मुद्दे हे वाहनाच्या किमतीनुसार ठरतात. नवीन वाहन विकत घेतल्यापासून पाच वर्षांपर्यंत वाहनाच्या मूळ किमतीवर ठरलेला घसारा (डेप्रिसिएशन) आकारून किंमत इन्शुरन्स कंपनी घेते. इन्शुरन्स हप्ता कमी करण्याच्या नादात वाहनाच्या किमतीत तडजोड होत नाही ना याकडे जरूर लक्ष ठेवावे. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

नुकसान भरपाईचे गणित कसे?

अपघातात बळी वा जखमी झालेल्याच्या वारसदारांकडून मागण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईस मर्यादा नाही. वय, उत्पन्न, अवलंबून व्यक्ती आणि झालेल्या अपघाताचे स्वरूप यावर नुकसान भरपाई अवलंबून आहे.

वाहनाचे रजिस्ट्रेशन झाल्यापासून जशी वर्षे पुढे जातात तसे वाहनाचे मूल्य कमी होत जाते आणि काही वर्षांनंतर वाहनाचा इन्शुरन्स होत नाही. पण, थर्ड पार्टी इन्शुरन्स होतो. त्यामुळेच आर्थिक नुकसानापासून संरक्षण हवे असल्यास थर्ड पार्टी इन्शुरन्स काढणे का आवश्यक आहे, हे आपल्याला समजले असेलच. त्यामुळेच सजग वाहनचालक म्हणून आपण तो करालाच, असे वाटते.

obhide@gmail.com