17 January 2021

News Flash

पावसाळ्यात वाहन घसरते  म्हणजे काय?

उन्हाळ्यानंतर रस्ते अपघातांसाठी सर्वाधिक धोकादायक ऋतू म्हणजे पावसाळा.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

उन्हाळ्यानंतर रस्ते अपघातांसाठी सर्वाधिक धोकादायक ऋतू म्हणजे पावसाळा. उन्हाळ्यात टायर फुटून भीषण अपघात होतात, तर पावसाळ्यात टायर घसरून. परदेशात प्रत्येक ऋतूसाठी वेगवेगळे टायर वापरले जातात. मात्र, भारतामध्ये ही जीवापेक्षा खर्चिक बाब अधिक असल्याने ऑल सिझन टायर वापरले जातात. यामुळे पावसाळ्यात टायरला ग्रीप नसेल तर धोक्याचे ठरतेच, परंतू ग्रीप असूनही अतिरेकी वाहन चालविल्यास अधिक धोक्याचे ठरू शकते. कसे ते आपण पाहू..

ओंकार भिडे

आपल्याकडे बऱ्याच रस्त्यांची बांधणी ही अशास्त्रिय करण्यात आलेली असते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उतार न ठेवणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी किंवा इतर भूभागापेक्षा रस्ता सखल असणे असे प्रकार सर्रास दिसतात. यामुळे रस्त्यावर पाणी साचते. गढूळ पाण्याचा चिखल साचतो. पाऊस सुरु असतानाही पाण्याचा एक थर जमा होतच असतो. या पाण्यावरून जोरात वाहन हाकल्यास ते रस्त्यावर तरंगल्याचा भास होतो आणि नियंत्रण सुटल्यानंतर काय होते हे सांगायला नकोच. ही प्रक्रिया म्हणजे हायड्रोपोलिंग.

वाहनाचा टायर आणि रस्ता यांच्यामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी आल्यास टायर व रस्ता यांच्यात अंतर पडते. परिणामी, रस्त्यावरील टायरची ग्रिप कमी होते आणि वाहन घसरू लागते. विशेषत: पुढील टायरच्या खाली मोठय़ा प्रमाणात पाणी आल्याने दोन्ही दबावांमुळे टायरची रस्त्यावरील पकड कमी होते अन् ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटतो. यालाच हायड्रोप्लेनिंग म्हणतात. पावसाळ्यात कार चालविताना रस्त्यावर टायरची ग्रिप कमी होत असते. त्यामुळेच पाऊस सुरू झाल्यावर पहिली काही मिनिटे ही धोकादायक असतात. पहिल्या काही मिनिटांमध्ये रस्त्यावर सांडलेले ऑइल आणि वाळलेले घटत त्यात मिसळण्यास सुरुवात होते. अन्य घटक वा ऑइल आणि पाणी यामुळे रस्त्यावर एक थर तयार होतो. त्यामुळे रस्ता निसरडा होतो. आपण नियंत्रित वेगानेच वाहन चालविले पाहिजे.

सावध पहा पुढील वाहनाचे पट्टे

पावसाळ्यात वाहन चालविताना रस्ता चांगला धुपलेला आहे की अद्याप त्यावर निसरडेपणा आहे हे ओळखता आले पाहिजे. यासाठी फार काही नाही, पुढील वाहनाचे चाक गेल्यानंतर रस्त्यावर उमटणारे पट्टे खूप काही सांगून जातात. रस्ता निसरडा असेल तर हीच चाके मागे फेसाळ पट्टे सोडतात. तर चांगला असेल तर रस्त्यावरील पाणी बाजुला जाऊन रस्त्याची ग्रीपही स्पष्ट दिसू लागते. ही धोक्याची घंटा फारच कमी वाहनचालकांना माहिती असते.

क्रूझ कंट्रोल टाळावे

क्रूझ कंट्रोलमध्ये कार एक विशिष्ट स्पीडला सेट केल्यावर तो स्पीड कायम राहतो. यामुळे ड्रायव्हरला अ‍ॅक्सिलेटरवर पाय देण्याची गरज नसते. हायवेवर क्रूझ कंट्रोलचा वापर केला जातो. पावसाळ्यात ड्रायव्हिंग करताना क्रूझ कंट्रोल वापरू नये. यामुळे आपल्याला रस्त्यावरील ग्रिपचा अंदाज लावता येतो. तसेच, वेग कमी करण्याची गरज आहे, हे कळते.

तज्ज्ञ काय म्हणतात?

लक्झरी कारप्रमाणएच सामान्य कारमध्येदेखील एबीएस, ईबीडी, सीबीएस, एअर बॅग्स, डिस्क ब्रेक्स आदी सुरक्षाविषयक सुविधा येऊ  लागल्या आहेत. पण, वेगावर नियंत्रण अन् योग्य सावधगिरी हेच अपघात रोखण्याचे उत्तम साधन आहे. त्यामुळे इकोनॉमी वेगाने शक्यतो वाहन चालावे. वेळप्रसंगी त्यापेक्षाही कमी वेगाने वाहन चालविल्याने आपली सुरक्षा वाढते, हे विसरू नये. हायड्रोप्लेनिंगचा धोका पावसाळ्यात वाढतो. त्यामुळे मजेपेक्षा दक्षतेलाच प्राधान्य द्यावे, असे वाहनतज्ज्ञ विनायक भिडे यांनी सांगितले.

हे तपासा अन् करा

* साठलेल्या पाण्यातून ड्रायव्हिंग करणे टाळावे. कारण यामुळे हायड्रोप्लेनिंगची शक्यता वाढते. पाऊस पडायला लागल्यावर होणाऱ्या डबक्यांपासून सावधान राहावे.

* पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज पटकन येत नाही. त्यामुळेच वायपर्स रबर ब्लेड, वायपरचा स्पीड व्यवस्थित सुरू आहे ना, याची खातरजमा ड्रायव्हिंग करण्यापूर्वी करा.

* पावसाळ्यात टॉप गिअरवर वाहन चालविण्याऐवजी एक गिअर कमी करून वाहन चालवावे. यामुळे टायरची रस्त्यावरील ग्रिप कमी होणार नाही आणि वेगही नियंत्रणात राहू शकतो. विशेषत: उतारावर वा नागमोडी वळणावर टॉप गिअरवर न ठेवल्यास हायड्रोप्लेनिंगचा धोका कमी होतो.

* कारला अँटी ब्रेकिंग सिस्टीम व ईबीडी नसल्यास हळूहळू ब्रेकचा वापर करावा. करकचून ब्रेक लावल्यास वाहनाची चाके एकदम लॉक होतात आणि वाहन घसरू शकते. त्यामुळे एकदम वेग वाढविणे आणि एकदम ब्रेक दाबणे टाळावे.

* पावसात शार्प टर्न घेऊ  नये. यामुळे वाहन उलटू शकते.

* हायड्रोप्लेनिंग होत असल्याचे जाणवल्यास स्टिअरिंग सरळच ठेवावे. कारण स्टिअिरग वळविल्यास कार उलटण्याचा धोका वाढतो. स्टिअिरग सरळ ठेवल्याने मागील चाकांच्या तुलनेत पुढील चाकांची पकड परत मिळविता येऊ  शकते.

* टायरची ग्रिप व्यवस्थित आहे ना, तपासून घ्यावे. तसेच, उच्च दर्जाचे टायर वापरण्यावर भर द्या. टायर ट्रेडिंग वा रिमोल्डिंग टायर बसवू नयेत.

कोकणातील रस्ते निसरडे?

पावसाळ्यात कोकणात वर्षां पर्यटनासाठी जाणारेही बरेच असतात. कोकणात मुसळधार पाऊस असूनही व रस्ते स्वच्छ होऊनही निसरडे का होतात माहित आहे? आकेशियाच्या झाडांमुळे. कोकणात रस्त्यांच्या बाजुने मोठय़ा प्रमाणावर आकेशिया या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडाची चपटय़ा वेटोळ्यासारखी फळे रस्त्यावर पडतात. ती चाकांखाली येऊन त्यातील चिकटपणा रस्तावर पसरतो. या फळांचे वैशिष्टय़ म्हणजे त्याला येणारा साबणासारखा फेस. पूर्वीच्या काळी याचा वापर साबणासारखा केला जात असे. या सुकलेल्या रसावर पावसात पाणी पडले की त्यातून बुळबुळीत फेस तयार होतो व वाहने घसरतात. यामुळे आकेशियाची झाडे बाजुला असलेल्या रस्त्यावरून सावधपणे वाहन चालवावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 5:24 am

Web Title: vehicle sleep in monsoon meaning
Next Stories
1 सॅलड सदाबहार : राइस स्पाइस सॅलड
2 गुहांच्या साम्राज्यात
3 शहरशेती : सदासुखी मनीप्लांट
Just Now!
X