13 July 2020

News Flash

घराणेशाही नको, चळवळीतला नेता हवा..

राजकारणात यायचे असेल तर राजकीय वारसा असायला हवा किंवा तुमच्याकडे बक्कळ पैसे तरी असायला हवेत,

राजकारणात यायचे असेल तर राजकीय वारसा असायला हवा किंवा तुमच्याकडे बक्कळ पैसे तरी असायला हवेत, असे विविध मतप्रवाह राजकारण या क्षेत्राविषयी समाजात पहायला मिळतात. मात्र, असे असले तरी भारतीय राजकारणात आजही अनेक अशी राजकीय नेते मंडळी आहेत जे पाठीशी कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारण या क्षेत्रात मोठय़ा पदावर कार्यरत होते आणि आहेत. त्याचबरोबर त्यांनी या क्षेत्रात आपला नावलौकिक  मिळवला आहे. यातील अनेक नेते कोणत्या ना कोणत्या राजकीय आणि सामाजिक चळवळीशी जोडले गेले आहेत. महाविद्यालयाच्या काळापासूनच या नेत्यांची राजकीय-सामाजिक चळवळीत जडणघडण झाली आहे. त्यामुळेच या चळवळीची शिकवण त्यांच्या कामातून दिसून येते. विविध चळवळीतून पुढे आलेली ही मंडळी पुढे राजकीय क्षेत्रात मोठे नेतृत्वदेखील करताना दिसून येतात. कोणत्याही प्रकारची राजकीय पाश्र्वभूमी नसताना केवळ वेगवेगळ्या चळवळीतून पुढे येऊन राजकारणात स्थिरावलेले राजकीय नेते किंवा विविध संघटना आणि चळवळींद्वारे राजकारणात येण्यासाठी धडपड करत असलेल्या व्यक्तींविषयी आजच्या तरुणाईला काय वाटते याचा घेतलेला हा आढावा..

पाश्र्वभूमी नसताना राजकारणात येणे हाच लोकशाहीचा विजय..

कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना राजकारणात येणे हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे. विविध विद्यार्थी चळवळींशी जोडले गेलेले तरुण हे विद्यार्थिदशेत असताना त्यांना सामाजिक प्रश्नांची जाण होत असते. त्याच प्रश्नांमुळे त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. त्यामुळे त्यांची स्वत:ची विचारसरणी विकसित होत असते. याचबरोबर प्रश्न सोडविण्यासाठी नेमके काय गरजेचे आहे, याचे ज्ञानही याच चळवळींमधून मिळते. त्यामुळे एक उत्तम राजकीय नेता घडण्याबरोबरच एक उत्तम माणूस होण्यासाठी विविध चळवळी महत्त्वाच्या ठरतात. त्यासाठी राजकीय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येक  तरुणाने विविध सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये सहभागी व्हायला हवे – सिद्धी पाटील, विद्यार्थिनी, वाडा.

चळवळींमधून येणाऱ्या राजकारण्यांची देशाला गरज

भारतीय राजकारणात हल्ली मोठय़ा प्रमाणात घराणेशाही दिसून येते. तसेच राजकीय वारसा असल्याने राजकारण्यांच्या मुलांना निवडूण येण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे अशा नेत्यांना जनतेचे प्रश्न कधी कळतच नाहीत. परंतू सामाजिक चळवळीतून राजकारणात येणाऱ्या तरूणांना स्वतचे अस्तीत्व निर्माण करावे लागते. हे करत असताना त्यांना समाजातील विविध समस्यांची जाणिव होत असते. याच कारणाने राजकारणात येण्यापूर्वी चळवळींमधून पुढे येणारे नेते हे इतरांपेक्षा वेगळी विकासकामे करतात. त्यामुळे भारतीय राजकारणाला चळवळींमधून आलेल्या आणि येवू पाहणाऱ्या राजकारण्यांची गरज आहे. – सौरभ कानडे,  विद्यार्थी, लांजा, रत्नागिरी

देशाचे वास्तव जाणून घेण्यासाठी चळवळ महत्त्वाचीच

लोकशाही देशाच्या राजकारणात येणाऱ्या प्रत्येक नेत्याला देश कसा चालतो याचे धडे घ्यायला हवेत. राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी नेत्याला देशातील नागरिक त्यांच्या विविध समस्या, त्याची संस्कृती याची जाणीव असणे गरजेचे आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश असून या देशातील विविधतेमध्ये असलेली एकता जपण्याबरोबरच देशाच्या विकासासाठीचे प्रयत्न करण्यासाठीची जाणीव नेत्यामध्ये असणे गरजेचे आहे. त्यासाठी देशातील समस्या जाणून घेणे हे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सामाजिक आणि राजकीय चळवळींमधून देशाचे वास्तव जाणून घेणे गरजेचे आहे. हे करण्यासाठी किमान काही वर्षतरी त्या नेत्याचा चळवळींमध्ये सहभाग असायला हवा. त्यातूनच भविष्यात चांगले राजकारणी घडू शकतात. – भूषण शेंडकर, बा. ना. बांदोडकर महाविद्यालय, ठाणे.

राजकारणात येण्यापूर्वी चळवळींमध्येच घडावे

भारतीय राजकारणाचा इतिहास पाहिल्यास अनेक राजकीय नेते हे विविध उजव्या आणि डाव्या चळवळीतूनच पुढे आले आहेत. त्यामुळे अशा विविध चळवळींतून आलेल्या अनेक राजकीय नेत्यांनी केलेली विकासकामे ही नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताची राहिली आहेत. कोणत्याही व्यक्तीने राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी चळवळीत काम करणे गरजेचे आहे असे मला वाटते. चळवळीत काम करत असताना देशातील अनेक समस्या कळतात. देशाचे राजकारण आणि देशाची व्यवस्था ही कशापद्धतीने चालते, याचा अभ्यासही या चळवळींमधून होत असतो. त्यामुळे देशातील विविध समस्या, त्यांचे निराकरण आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे उपक्रम याविषयीची उत्तरेही या ठिकाणी मिळतात. त्यामुळे भविष्यात देशाला प्रगतीशिल करण्यासाठीचे संस्कार प्रत्येक राजकारण क्षेत्रात येणाऱ्या व्यक्तीवर होणे गरजेचे आहे. त्यामुळे राजकारण या क्षेत्रात येण्यापूर्वी तरुणांनी विद्यार्थी चळवळींमध्ये घडणे गरजेचे आहे. – राहुल शेलार, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ.

चळवळीसोबत व्यक्तिमत्त्व विकासाकडेही लक्ष द्यावे

भारतीय राजकारणात अनेक राजकारणी हे वारसा हक्काने पुढे येत असले तरी सामाजिक-राजकीय चळवळीतून पुढे येणाऱ्या राजकारण्यांची विचारशैली वेगळी असते.  आज पुण्यासारख्या शहरात शिकायला येणारे विद्यार्थी हे सामाजिक आणि राजकीय चळवळीसोबत जोडले जातात. मात्र, यातील अनेक विद्यार्थी हे त्या चळवळींच्या मोठय़ा नेत्यांच्या मागे भरकटून जातात आणि स्वतच्या राजकीय करिअरपासून दिशाहीन होतात. त्यामुळे यातील अनेक विद्यार्थ्यांची भविष्यातील वाटचालच खुंटते. अशा विद्यार्थ्यांनी भरकटण्यापेक्षा राजकारणात स्थिरावण्यासाठी स्वतचे विचार विकसित करणे गरजेचे आहेत. त्याचबरोबर त्यांनी स्वतचे व्यक्तिमत्त्व सुधारण्याकडे आणि क्षमता वाढविण्याकडे भर द्यायला हवा. असे राजकारणी हे भविष्यात देश घडवतील.   – दीपक शिंदे पाटीलसिंहगड महाविद्यालय, पुणे.

(संकलन : आशिष धनगर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 1:16 am

Web Title: vidhan sabha election politics money leaders akp 94
Next Stories
1 मुर्ग ए मखमल
2 ‘वैद्यकीय’मधील  सांस्कृतिक चळवळी
3 आत्महत्याग्रस्तांना वाचवा!
Just Now!
X