18 November 2019

News Flash

व्हिंटेज वॉर : बलाढय़ ‘मारुती’

मारुती या स्वदेशी कंपनीने भारतीयांना लहान आणि सक्षम गाडय़ांचा पर्याय उपलब्ध करून दिला.   

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

काही कंपन्या मोटार क्षेत्राची समीकरणे बदलून देतात. मारुती सुझुकी या कंपनीची गणनादेखील त्यात होते. छोटे इंजिन असलेल्या मारुतीच्या गाडय़ांनी भारतीय मोटार बाजार बदलला. स्वदेशी गाडय़ांमध्ये असणारे मर्यादित पर्याय आणि विदेशी गाडय़ांच्या न परवडणाऱ्या किमती यामुळे भारतातील ‘ग्राहक राजा’ला गाडी खरेदी करताना अनेक तडजोडी कराव्या लागत होत्या. मारुती या स्वदेशी कंपनीने भारतीयांना लहान आणि सक्षम गाडय़ांचा पर्याय उपलब्ध करून दिला.

भारतातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीचा भारतीय बाजारातील हिस्सा जुलै २०१८ च्या आकडेवारीनुसार हा ५३ टक्के एवढा होता. मारुती उद्योग लिमिटेड म्हणजेच मारुती कंपनीची स्थापना फेब्रुवारी १९८१ मध्ये झाली. आणि १९८३ मध्ये पूर्णपणे भारतीय बनावटीच्या असलेल्या मारुती ७०० चे उत्पादन सुरू झाले. या कंपनीची दुसरी गाडी होती मारुती ८०० डीएक्स, ही जपानी मोटार उत्पादक कंपनी सुझुकीच्या एसएस ८० वर आधारित होती. २००७ मध्ये भारत सरकारच्या विनिमिती मंत्रालयाने या कंपनीतील सर्व समभाग विकले असून या कंपनीत आता भारत सरकारचा कोणताही मालकी हक्क नाही.

सूर्य राम मारुती टेक्निकल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, या खासगी कंपनीची स्थापना १९७० मध्ये झाली. संपूर्णत: स्वदेशी गाडी निर्माण करण्याचा या कंपनीचा उद्देश होता. जून १९७१ मध्ये कंपनी अधिनियमनुसार ही कंपनी मारुती लिमिटेड म्हणून ओळखली जाऊ  लागली. पुढे १९७७ मध्ये कंपनी अवसायनात निघाली. तरी डॉ. व्ही कृष्णमूर्ती यांच्या प्रयत्नाने या कंपनीची पुढे वाटचाल सुरू राहिली. १९८२ मध्ये मारुती उद्योग लिमिटेड आणि जपानच्या सुझुकी कंपनी यांच्यात एक परवाना आणि संयुक्त उद्यम करार झाला. बाहेरील देशांसाठी बंद असलेल्या भारतीय बाजरपेठेत सुरुवातीला मारुती गाडय़ांची आयात करीत होती. सुझुकीच्या ४०, ००० तयार गाडय़ांची आयात करण्याचे हक्क पहिल्या दोन वर्षांत मारुतीने मिळवले. त्यानंतरही सुरुवातीला गाडय़ांमध्ये केवळ ३३ टक्केच स्वदेशी भाग वापरण्याचे लक्ष्य होते. यामुळे स्थानिक उत्पादकांमध्ये मोठी नाराजी होती. मारुती उद्योगाकडून नियोजित असलेल्या मोठय़ा प्रमाणावरील उत्पादनासाठी भारतीय बाजारपेठ लहान आहे की काय अशी शंका त्यावेळी होती. त्याचप्रमाणे उत्पादनाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क कमी करणे आणि पेट्रोल कर समायोजित करण्याचा सरकारचा विचार होता. स्वदेशी उत्पादनाला १९८३ मध्ये सुरुवात झाली आणि १९८४ मध्ये ८०० प्रमाणेच तीन सिलेंडरची मारुती व्हॅन बाजारात दाखल करण्यात आली. १९८५ मध्ये सुझुकी एसजे ४१० आधारित जिप्सी ९७० सीसी क्षमतेच्या इंजिनासह भारतीय बाजारात दाखल झाली. १९८६ मध्ये ८०० ची जागा ७९६ सीसीच्या अल्टो या हॅचबॅकने घेतली. १९८७ मध्ये या कंपनीने निर्यातीस सुरुवात केली. ५०० गाडय़ा हंगेरीला पाठवण्यात आल्या. १९८९ मध्ये मारुती १००० ही भारतीय बाजारात दाखल झाली. १९९१ पर्यंत या सर्व गाडय़ांसाठी लागणाऱ्या ६५ टक्के भागांचे उत्पादन हे भारतात होत होते. १९९१ मध्ये सुझुकीने कंपनीतील आपला हक्क वाढवून ५० टक्कय़ांपर्यंत केला आणि सुझुकी व भारतीय सरकार या कंपनीच्या ५० -५० टक्के मालक झाले. १९९३ मध्ये झेन ही ९९३ सीसीची हॅचबॅक भारतात दाखल करण्यात आली. आणि १९९४ मध्ये १२९८ सीसीची इस्टिम भारतात दाखल झाली. १९९८ मध्ये मारुतीने नवी ८०० बाजारात दाखल केली. डिझाइनमध्ये बदल केलेल्या ओमनीच्या विक्रीला देखील या वर्षी सुरुवात झाली. १९९९ मध्ये १.६ लिटरची मारुती बलेनो आणि ‘वॅगन आर’ने बाजारात पदार्पण केले. नव्या शतकात मारुती सुझुकीच्या प्रगतीला नवी चालना मिळाली. २०००मध्ये ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कॉल सेंटर उभारणारी मारुती सुझुकी ही भारतातील पहिली कंपनी ठरली. मागील १८ वर्षांत मारुतीने अनेक यशस्वी गाडय़ा बाजारात दाखल केल्या आहेत. नव्या वाहन कायदयाच्या निकषांची पूर्तता करू न शकणाऱ्या काही अत्यंत यशस्वी गाडय़ा बंद करण्याचा कठीण निर्णय देखील कंपनीने घेतला. पुढील वर्षांपासून डिझेल गाडय़ांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णयही मारुतीने नुकताच जाहिर केला. आपल्या कार्यात काळानुरुप बदल करुन ग्राहकांच्या गरजा अचूक हेरणारी ही कंपनी आजही मोटार क्षेत्रात आपले स्थान राखून आहे. त्यांच्या विक्रीचा आकडा पाहता काही दशकांपूर्वी सुरु झालेली त्यांची यशोगाथा अशीच सुरू राहणार हे निश्चित.

First Published on July 6, 2019 12:06 am

Web Title: vintage car maruti suzuki abn 97
Just Now!
X