वैभव भाकरे

१९व्या शतकाच्या सुरुवातीला मोटार ही केवळ श्रीमंतांसाठी असलेली चैनीची वस्तू समजली जात होती. परंतु जेव्हा हेन्री फोर्ड यांनी १९०८ मध्ये मॉडेल टी तयार केली तेव्हा मोटार बाजारात मोठय़ा प्रमाणात बदल झाले आणि मोटारी या सर्वसामान्यांना परवडू लागल्या. या गाडय़ा तुलनेने कमी ताकदीच्या होत्या. केवळ २२ हॉर्सपॉवर निर्माण करणाऱ्या या गाडय़ा प्रतितास ६४ किलोमीटर एवढा अधिकतम वेग गाठू शकत होत्या. दोन हजार डॉलरहून कमी किमतीची कोणत्याही गाडीत याहून अधिक त्या वेळी मिळत नव्हते.

१९११ मध्ये मोटार उत्पादनाच्या या मैदानात एक नवा खेळाडू उतरला. विल्यिम डुरॅण्ट यांनी कारनिर्मितीला सुरुवात केली. त्याचे भागीदार लुईस शेव्हर्ले यांच्या नावावरून कंपनीला शेव्हर्ले नाव देण्यात आले. डुरॅण्ट हे एक प्रतिभावंत अभियंते होते आणि त्यांनी तयार केलेल्या या नव्या मोटारींना लोकांनी पसंती दिली. शेव्हर्लेमधून होणाऱ्या नफ्यामुळे डुरॅण्ट यांनी १९१७ मध्ये जनरल मोटर्स ही कंपनी विकत घेतली. शेव्हर्लेने परवडणाऱ्या वाहन बाजारात उतरून फोर्डला आव्हान देण्यास सुरुवात केली. शेव्हर्ले यांच्या गाडय़ा कमी किमतीच्या असूनदेखील चांगल्या बनावटीच्या होत्या आणि ग्राहकांमध्ये या गाडय़ांचे वेड वाढत होते. शेव्हर्लेच्या रूपाने प्रथमच फोर्डसमोर एक गंभीर आव्हान उभे राहिले. १९२० दशकाच्या मध्यात मॉडेल टीला मिळणारा प्रतिसाद कमी होत असल्याचे फोर्डेला जाणवले. या गाडीला वीस वर्षे पूर्ण होत असून स्टाइलच्याबाबतीत कोणतेही मोठे बदल करण्यात आले नव्हते. म्हणून १९२७ मध्ये फोर्डने या गाडीचे उत्पादन सहा महिन्यांसाठी थांबवले. आणि १९२८ मध्ये मॉडेल ए ही मोटार बाजारात आणली. मॉडेल ए ने लोकांना वेड लावले. मॉडेल टीच्या २० हॉर्सपॉवरच्या तुलनेत या गाडीत ४० हॉर्सपॉवरची क्षमता होती. आणि ही गाडी चार वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होती. दरम्यान, १९२९ मध्ये शेव्हर्लेचे सहा सिलिंडरचे प्रसिद्ध ओएचव्ही इंजिन बाजारात दाखल झाले. याची क्षमता ५० हॉर्सपॉवर एवढी होती. पुढील काही वर्षे या गाडीने विक्रीच्या आकडय़ांमध्ये फोर्डला मागे टाकले.

१९३० दरम्यान मोठय़ा आकाराच्या आणि इंजिन क्षमतेच्या शेव्हर्लेच्या गाडय़ांची विक्री जास्त होऊ  लागली. गाडीची किंमत कमी करण्यासाठी फोर्डने सुधारणा करण्यास सुरुवात केली. यातूनच फोर्ड फ्लॅटहेड व्ही-८ इंजिन जन्माला आले. १९३२ मध्ये जेव्हा हे इंजिन गाडय़ांमध्ये वापरण्यात आले तेव्हा हॉर्सपॉवरच्या दृष्टीने फोर्डचे वर्चस्व पुन्हा निर्माण झाले. आणि विक्रीमध्ये फोर्डने शेव्हर्लेला मागे टाकले. परंतु हे यश जास्त काळ टिकले नाही. १९३०च्या सुरुवातीला फोर्डने गाडी सोबत देण्यात येणाऱ्या एककेसरीएसला कात्री लावली. त्याचप्रमाणे शेव्हर्लेच्या तुलनेने गाडीसोबत देण्यात येणाऱ्या सुविधाही कमी झाल्या. तर शेव्हर्ले आपल्या गाडय़ांमध्ये सतत सुधारणा करत राहिले. मोटार बाजारातील पहिल्यांदा हायड्रॉलिक ब्रेक, स्वतंत्र फ्रंट सस्पेन्शन, कॉलम गियर शिफ्ट अशा प्रकारच्या सुविधा दिल्या. यामुळे १९३०च्या दशकात शेव्हर्लेची विक्री अधिक होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या दोन्ही कंपन्यांच्या वैराला विराम लागला. फोर्ड आणि जनरल मोटर्सने युद्धाच्या काळात मोठय़ा प्रमाणात सहकार्य केले. १९४४ मध्ये फोर्डने बी-२४ चार इंजिनचे बॉम्बर हे विमान तयार केले.

जनरल मोटर्सने विमाने आणि इतर लष्करी वाहने निर्माण केली. १९४५ नंतर या दोन्ही कंपन्यांनी पुन्हा प्रवासी वाहने तयार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांच्या स्पर्धेचा नवीन अध्याय सुरू झाला.