27 May 2020

News Flash

व्हिंटेज वॉर : ही गाडी कुणाची?

हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत संख्या असणाऱ्या कंपन्या मोटार जगतावर राज्य करतात.

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

तुमची आवडती मोटार कोणती हा प्रश्न एखाद्यला विचारला, तर माझी आवडती मोटार बीएमडब्ल्यूची किंवा पोर्शची अशी पठडीतील उत्तरं मिळतात. पण मोटारींचा चाहता किंवा जाणता व्यक्ती असल्यास तो या प्रश्नाचे अधिक विस्तृत उत्तर देईल. आवडती गाडी कोणती हे विचारल्यावर ती व्यक्ती १९५८ची बीएमडब्ल्यू ५०७ असे उत्तर देईल. म्हणजे केवळ मोटार कंपनीचे नाव नाही, तर मोटारीचे मॉडेल आणि कोणत्या वर्षी तिचे उत्पादन झाले आहे. हा तपशीलदेखील त्यात दिला जाईल. पण सहसा गाडीची ओळख, प्रतिष्ठा, विश्वासार्हता ही कंपनीच्या नावावर अवलंबून असते. आणि मग या गाडय़ांचे कंपनीच्या नावाने वर्गीकरण झाल्यावर ही मोटार चांगली की ती चांगली अशा स्पर्धा रंगवल्या जातात. सध्या मोटार जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या बहुतांश परदेशी मोटार कंपन्या या ५० ते ६०च्या दशकाच्या पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. या कंपन्यांचे मालकी हक्क इतक्या वर्षांमध्ये मूळ संस्थापकांकडून हस्तांतरित झाले आहे. म्हणून ज्या दोन कंपन्यांमध्ये तुम्ही स्पर्धा लावताय त्या बहुधा एकाच मूळ कंपनीच्या (मूळ कंपनीच्या) मालकीच्या असतात. हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत संख्या असणाऱ्या कंपन्या मोटार जगतावर राज्य करतात.

टोयोटा

टोयोटा ही जपानी कंपनी जगातील सर्वाधिक मोटारनिर्मिती करणारी संस्था आहे. या कंपनीची स्थापना ८२ वर्षांपूर्वी १९३७ मध्ये किचिरो टोयोटा यांनी केली. कोरोला ही जगातील सर्वाधिक विक्री झालेली मोटार टोयोटाची आहे. विक्रीची आकडेवारी पाहता टोयोटा तिच्या प्रतिस्पर्धीच्या कित्येक पटींनी पुढे आहे. हायब्रीड इलेक्ट्रिक मोटार ‘प्रियस’ची कंपनी म्हणून टोयोटाचा पाश्चिमात्य देशांमध्ये लौकिक आहे. लॅक्सस, डैहत्सू आणि हीनो या कंपन्यांच्या नावाने जगभरात विकल्या जाणाऱ्या गाडय़ांची मूळ मालकीही टोयोटाकडे आहे. सायन ही कंपनीदेखील टोयोटाच्या मालकीची होती. या कंपनीच्या रूपाने अमेरिका आणि कॅनडाच्या बाजारावर आपली पकड अधिक मजबूत करण्याचा मानस टोयोटाचा होता. परंतु निराशाजनक विक्रीमुळे २०१६ मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली.

बीएमडब्ल्यू

जर्मन मोटार उत्पादक कंपनी असलेली बव्हेरिअन मोटर वर्क्‍स म्हणजे बीएमडब्ल्यू ही कंपनी जगभरात एक प्रीमियम ब्रॅण्ड म्हणून प्रसिद्ध आहे.  बीएमडब्ल्यूने १९९४ मध्ये ब्रिटिश मोटार उत्पादक रोव्हर ही कंपनी विकत घेतली होती. तेव्हापासून मिनी हा ब्रॅण्ड बीएमडब्ल्यूच्या मालकीचा आहे. त्याचप्रमाणे मोटार क्षेत्रातील सर्वोच्च स्थान असणारी रोल्स रॉयस हीदेखील बीएमडब्ल्यूच्या मालकीची आहे.

टाटा मोटर्स

टाटा ही भारतीय मोटार कंपनी ट्रक, बस, आणि लष्करी वाहनेदेखील उत्पादित करते. फोर्डला हाताळता न आलेले जॅग्वार आणि लॅण्ड रोव्हर हे दोन्ही ब्रॅण्ड टाटाने २००८ मध्ये विकत घेतले. एवढेच नाही, तर या मोटार ब्रॅण्डना फायद्यात आणायचे कामदेखील टाटाने केले. देऊ हा दक्षिण कोरियन मोटार ब्रॅण्डदेखील टाटाच्या मालकीचा आहे.

जनरल मोटर्स

जनरल मोटर्स कंपनी किंवा जीएम अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ३७ देशांमध्ये जनरल मोटर्सच्या वाहनांची विक्री होते. कॅडिलॅक आणि शेव्हर्ले या नावाने या कंपनीच्या गाडय़ा जगभरात विकल्या जातात. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलॅण्ड येथे हॉल्डेन या स्थानिक ब्रॅण्डखाली जीएमच्या गाडय़ांची विक्री केली जाते. त्याचप्रमाणे बाओजून, जिफांग या ब्रॅण्डच्या नावाखाली चीनमध्ये जीएमची वाहने विकली जातात. हमर आणि साब हे ब्रॅण्डदेखील जीएमच्या अखत्यारीत होते.

फियाट

फियाट ही कंपनी भारतीयांना प्रीमिअर आणि पद्मिनी या गाडय़ांमुळे परिचित आहे. फियाट ही इटलीतील सर्वात मोठी मोटार उत्पादक कंपनी आहे. फियाट कंपनी ही फियाट क्राइस्टलर ऑटोमोबाइल्स (एफसीए)चा भाग आहे. अल्फा रोमिओ, डोज, जीप आणि मॅसेराटी या मोठय़ा कंपन्यांची मूळ मालकी एफसीएकडे आहे.

फॉक्सवॅगन 

फॉक्सवॅगन या कंपनीची स्थापना जर्मन कामगार आघाडीने १९३७ मध्ये जर्मनीत केली. बीटल ही या कंपनीची सर्वात लोकप्रिय मोटार. जगातील सर्वाधिक वेगवान मोटार म्हणून मान्यताप्राप्त असलेली व्हेरॉन ही बुगाटीच्या नावाखाली उत्पादित करण्यात येते. पोर्श ही प्रसिद्ध स्पोर्ट्स कार उत्पादक कंपनीच्या गाडय़ांची बऱ्याचदा लॅम्बॉर्गिनीच्या गाडय़ांशी स्पर्धा केली जाते. पण बुगाटी, पोर्श आणि लॅम्बॉर्गिनी या तगडय़ा स्पोर्ट्सकार कंपन्या, पिटुकल्या बीटलच्या मालकीच्या म्हणजे फॉक्सवॅगनच्या मालकीच्या आहेत. रोल्स रॉयसच्या दिमाखाशी आणि ऐश्वर्यसंपन्नतेला आव्हान देणारी बेंटले हीदेखील फॉक्सवॅगनच्या छत्राखालीच आहे. याशिवाय स्कोडा, सियाट या कंपन्यांची मूळ मालकीदेखील फॉक्सवॅगनकडे आहे. युरोप आणि जगातील कार बाजाराचा मोठा वाटा या कंपनीने काबीज करून ठेवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 12:03 am

Web Title: vintage war car article abn 97
Next Stories
1 प्राचीन जलव्यवस्थापन सप्तेश्वर
2 स्टायरियाचे वाइन स्ट्रीट
3 टेस्टी टिफिन : पॅटीस
Just Now!
X