वैभव भाकरे

मोटारीच्या जन्मापासून त्यात सुधारणा होत आहेत. मोटारींच्या इंजिनची क्षमता, प्रवासी संख्या आणि त्यातील सुविधा यानुसार त्यांचे वर्गीकरण होत गेले. मग त्यात प्रवासी वाहने आणि उद्योगांसाठी वापरली जाणारी वाहने हे गट पडले. मोटारीच्या शंभरहून अधिक वर्षांच्या इतिहासात अनेक कार कंपन्या जन्माला आल्या आणि काळाच्या ओघात विलुप्तदेखील झाल्या. मात्र यातील काही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढय़ा कंपन्या आहेत ज्यांची प्रतिष्ठा आणि रुबाब हा अद्याप अबाधित आहे. आणि त्यांपैकी दोन कंपन्या म्हणजे रोल्स रॉयस आणि बेंटले.

हेन्री रॉयस यांना इलेक्ट्रिक इंजिनीरिंगमध्येमध्ये नैपुण्य प्राप्त होते. त्या बळावर एक यशस्वी उद्योजक म्हणून ते नावारूपाला आले. त्यांनी १९०३ मध्ये एक सेकंड हॅण्ड गाडी विकत घेतली. त्या गाडीच्या नि:कृष्ट कामगिरीमुळे ते निराश झाले. यातूनच त्यांनी स्वत:हून दोन सिलिंडरची मोटार कार तयार करण्याचे ठरवले. १९०४ पर्यंत त्यांना ही मोटार पूर्ण करण्यात यश आले. या गाडीची कामगिरी चांगली होती. आणि म्हणूनच त्यांच्या या गाडीची ख्याती ब्रिटनमधील तत्कालीन सर्वश्रेष्ठ ड्राइव्हरपैकी एक असणाऱ्या चार्ल्स स्टुअर्ट रोल्स यांच्यापर्यंत पोहोचली.

१९०४ मध्ये रोल्स आणि रॉयस यांची मँचेस्टर येथे भेट झाली. दोघांनी मिळून कार कंपनी सुरू करण्याचे ठरवले आणि रोल्स रॉयस कार कंपनी जन्माला आली. कंपनीच्या सुरुवातीच्या तीन वर्षांतच त्यांच्या ‘सिल्व्हरघोस्ट’ या गाडीलाच जगातील सर्वोत्कृष्ट गाडी म्हणून संबोधण्यास सुरुवात झाली. मोटार उद्योगाची ही केवळ सुरुवातच होती आणि तरीही रोल्स रॉयसने या नावाने त्यांचे वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली.

रोल्स रॉयस ही कंपनी जेव्हा प्रगतीची शिखरे गाठत होती, त्याचदरम्यान अजून एका मोटार कंपनीने आपली वाटचाल सुरू केली. आणि त्या काळातील एक यशस्वी मोटार उत्पादक कंपनी आणि रेसकार टीम म्हणून उदयास आली. डब्ल्यू. ओ. बेंटले यांना शर्यतींसाठी गाडी तयार करण्यात अधिक रस होता. पहिल्या महायुद्धानंतर रॉयल नेव्हीसाठी त्यांनी इंजिन तयार केले. त्यानंतर बेंटले मोटार निर्मितीकडे वळले आणि रेसिंगमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. बेंटले यांच्या तीन लिटर इंजिनच्या मोटारकारने टुरिस्ट मोटरवेजचा खिताब जिंकला. अशा अनेक शर्यतींत त्यांनी चांगली कामगिरी केली. मात्र ले मान्स या २४ तासांच्या शर्यतीत त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे बेंटले हे नाव मोठे झाले. १९२७ ते १९३० बेंटलेने चार वेळा पहिला क्रमांक पटकावला. हा विक्रम पुढील ४० वर्षे कुणाला मोडता आला नाही. ‘ब्लोबर बेंटले’ ही त्या काळातील सर्वात लोकप्रिय बेंटले होती. इयान फ्लॅमिंग यांच्या जेम्स बॉण्ड कादंबऱ्यांमध्ये या गाडीचा उल्लेख होता. त्यामुळे ही गाडी अधिकच लोकप्रिय झाली.

आर्थिक मंदीच्या काळात बेंटलेच्या महागडय़ा गाडय़ांची मागणी कमी झाली आणि १९३१ मध्ये बेंटलेला रोल्स रॉयसने विकत घेतले. रोल्स रॉयसच्या काळात अत्यंत महत्त्वाची ठरलेली बेंटलेची गाडी म्हणजे बेंटले काँटिनेंटल या गाडीची अनेक संस्करणे १९५२ ते १९६५ या कालावधीत तयार करण्यात आली. बेंटलेची ओळख ही कमी किंमत आणि वेगळे ग्रिल असलेल्या रोल्स रॉयस म्हणून होऊ  लागली. आज रोल्स रॉयस आणि बेंटले पुन्हा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. तरीही रोल्स रॉयस त्याच दिमाखात आपला राजेशाही थाट राखून आहे. तर शर्यतीच्या वेडाने जन्माला आलेली बेंटले आजही रेसट्रॅकवर स्पर्धामध्ये भाग घेत आहे. जून २००३ मध्ये त्यांनी पुन्हा ले मान्स शर्यत जिंकली. रोल्स रॉयस आणि बेंटले आजही प्रतिष्ठा, ऐश्वर्य आणि दिमाखाचे प्रतीक आहे. काही काळापूर्वी रोल्स रॉयसचे १९१२ चे सिल्वरघोस्ट मॉडेल सध्याच्या फँटमहून दुप्पट किमतीला विकले गेले. सर्वोत्कृष्ट वाहन तयार करण्याची जिद्द आणि गुणवत्तेशी तडजोड न करण्याची वृत्ती यामुळेच आजही रोल्स रॉयस आणि बेंटले यांचे मानाचे स्थान आहे.