डॉ. अविनाश सुपे

बहुतांशी लोक रोज सूर्यप्रकाशात चालत नाहीत. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीमध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष होते आणि लोकांना ड जीवनसत्त्वाची कमतरता सतावते. आवश्यकतेपेक्षाही ड जीवनसत्त्वाचे सेवन शरीराला घातक ठरू शकते. वैद्यकीय सल्ल्यानेच ही औषधे घेणे योग्य आहे.

निसर्गातील कधीही न संपणारी ऊर्जा म्हणजे सौरऊर्जा. आपल्या सृष्टीचे अस्तित्वच सूर्यप्रकाशामुळे आहे. सूर्यप्रकाशामुळे वनसंपत्ती आणि जिवांचे पालनपोषण होते. याच सूर्यप्रकाशाचा आणखी एक फायदा म्हणजेच शरीरात ड जीवनसत्त्व तयार होणे. रुग्णालयात काम करणारे माझे एक जवळचे सहकारी काही दिवस आजारी होते. सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत रुग्णालयातील रुग्णांना मदत करणारे हे माझे सहकारी माझ्या बाजूच्याच खोलीमध्ये काम करत असत. गेले काही दिवस त्यांना अंगदुखी व सांधेदुखी झाल्याने चालायला व बसायला त्रास सुरू झाला. अस्थिव्यंग चिकित्सकाने बघून नेहमीच्या वेदनाशामक गोळ्या लिहून दिल्या. जेव्हा हे दुखणे थांबले नाही, तेव्हा पुढील तपास केले. चाचण्यांमधून कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्वाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे निष्पन्न झाले. दिवसभर एका बंद खोलीमध्ये काम करून अंगावर थोडाही सूर्यप्रकाश न पडल्यामुळे व आहारामध्येही त्याचे योग्य सेवन न केल्याने हा त्रास झाला. अशा प्रकारचा त्रास अनेकांना आज आढळून येतो.

आपली हाडे मजबूत राहण्यासाठी ड जीवनसत्त्वाची खूप गरज आहे. तसेच रक्तातील कॅल्शियम व फॉस्फरस यांची पातळी योग्य राखण्यासाठी पण ड जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेने मुलामध्ये मुडदूस हा आजार निर्माण होतो तर मोठय़ा व्यक्तीमध्ये ड जीवनसत्त्व कमी असल्यास हाडे ठिसूळ व मऊ  होतात. त्यामुळे त्यांना अस्थिभंग (फ्रॅक्चर) होण्याचा संभव असतो. ड जीवनसत्त्वाच्या अभावी हाडे, दात, केस यांचे आरोग्यही धोक्यात येते. याशिवाय मधुमेह, रक्तदाब, दमा, कर्करोगाचे काही प्रकार, मेंदूचे विकार इत्यादी आजारात देखील ड जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावत असते.

 कमतरता झाल्यास ..

* हृदयविकारामुळे मृत्यू येऊ शकतो.

*  वयस्क व्यक्तीमध्ये मेंदूतील कार्यप्रणाली बिघडू लागते.

*  लहान मुलांमधील दम्याची तीव्रता वाढते.

*  कर्करोग होण्याची शक्यता वाढते आणि

*  मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार लवकर आटोक्यात येत नाहीत.

कमतरता होण्याची कारणे

ड जीवनसत्त्व हे प्राणिजन्य पदार्थातच उपलब्ध असते. जसे की मासे, कॉडलिव्हर ऑइल, अंडय़ाचा पिवळा बलक, दूध, गुरांचे यकृत इत्यादी. ज्यांचा आहार पूर्ण शाकाहारी असेल तर त्यांना आहारातून पुरेसे ड जीवनसत्त्व मिळत नाही.

बहुतांशी शरीर कपडय़ाने झाकल्यामुळे उघडय़ा अंगावर सूर्यकिरण घेणे आणि कोवळ्या उन्हात फिरणे शक्य होत नाही. आवश्यक प्रमाणात सूर्यकिरणे त्वचेपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे ड जीवनसत्त्व निर्माण होत नाही.

भारतीयांची त्वचा गडद रंगाची असल्याने सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने ड जीवनसत्त्वे बनवण्याची प्रक्रिया संथ असते.

वाढत्या वयाबरोबर आपल्या मूत्रपिंडाचे काम कमी होत जाते. यामुळे जीवनसत्त्वाची कार्यक्षमता कमी होते आणि त्याची कमतरता जाणवते.

आतडय़ांच्या काही आजारात आतडय़ांची शोषणक्षमता कमी होते आणि त्यामुळे आहारातून घेतलेले ड जीवनसत्त्व शरीरात शोषले जात नाही.

अतिस्थूल व्यक्तीमध्ये चरबीच्या पेशी अतिजास्त प्रमाणात असतात आणि त्या रक्तातील  ड जीवनसत्त्व शोषून घेतात.

उपाययोजना

* आहारात दूध, दुधाचे पदार्थ, अंडे, मासे, कॉड लिव्हर ऑइल, अळिंबी, अक्रोड, बदाम व ऑलिव्हची फळे यांचा समावेश असावा.

*  कोवळ्या सूर्यप्रकाशात रोज २० मिनिटे तरी फिरावे किंवा बसावे. उघडय़ा त्वचेवर सूर्यप्रकाश पडणे आवश्यक आहे.

*  ड  जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास रोज ८०० ते ४००० युनिट्स घ्यावीत. पर्यायी ड जीवनसत्त्वाची सॅचेटस किंवा कॅप्सूल्स मिळतात. त्यामध्ये ६० हजार युनिट्स असतात. सुरुवातीला आठवडय़ातून एकदा असे ८ आठवडे ती घ्यावीत. नंतर महिन्यातून एक वेळा असे सहा महिने घ्यावे. आवश्यकतेपेक्षा जास्त ड जीवनसत्त्वाचे सेवन केल्यास मूत्रपिंड आणि हृदयाला अपायकारक ठरू शकते. त्यामुळे ड जीवनसत्त्वाचे सेवन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.