विजय बर्वे, (मराठी विज्ञान परिषद अंबरनाथ.)

विशिष्ट गतीने पुढे जात राहणाऱ्या काळाला कुणी रोखू शकत नाही. मात्र अगदी प्राचीन काळापासून काळाचे मापन करण्याचा प्रयत्न मानव करीत आला आहे. घडय़ाळ हे त्याचे आधुनिक रूप. आपल्या जीवनातील कोणताही व्यवहार घडय़ाळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पूर्वी कोंबडय़ाच्या आरवण्याने पहाट व्हायची. आकाशातील ग्रहताऱ्यांवर ऋतू, काल आणि प्रहरांचा हिशेब ठेवला जाई.  पुढे औद्योगिक क्रांतीचे वारे वाहायला लागले आणि ही परिमाणे हळूहळू बदलायला लागली. सकाळ, दुपार, संध्याकाळ या परिभाषेतून ती तास, मिनिट, सेकंद, त्याचाही हजारावा भाग अशी अचूक होत गेली. ‘गरज ही शोधाची जननी’ असते. त्यानुसार कालगणनेत सुधारणा होत गेली. या आधुनिक कालगणनेची सुरुवात साधारण १६०० पासून झाली. गॅलिलिओने दाखवलं की एक विशिष्ट लांबीचा लंबक ठरावीक वेळेतच आपलं आवर्तन पूर्ण करतो. झालं. मग आली लंबकाची घडय़ाळं. लंबकाचं आवर्तन सुरू राहण्यासाठी आली गुंडाळली जाणारी स्प्रिंग. साधारणपणे २५ सें.मी. लांबलंबक आपलं आवर्तन एका सेकंदात पूर्ण करतो. व्यवस्थित तेलपाणी करून ही घडय़ाळं वर्षांनुवर्षे टिकत असत. कालांतराने याविषयी नवनवे शोध लागून टेबलावरची गजराची घडय़ाळं आली. त्यानंतर लंबकाची जागा उलट सुलट फिरणाऱ्या तोल साधणाऱ्या चक्राने घेतली. मनगटाच्या हालचालीवर चालणारी स्वयंचलित (अ‍ॅटोमॅटिक) घडय़ाळे आली. या सर्वच घडाळ्यांना नियमित दुरुस्ती लागते. त्यातून हजारो कामगारांना रोजगार मिळाला. पुढची पायरी आहे क्वार्टझ घडय़ाळांची. अचूकता, किंमत, टिकाऊपणा यामुळे या तंत्रज्ञानाने घडय़ाळाच्या दुनियेचा चेहरामोहरा बदलून टाकला. आता तर मूलकण आणि त्याची कंपने यावर आधारित स्वयंचलित घडय़ाळे निर्माण झाली. इस्रोसारख्या संस्थांना तितक्या अचूक वेळेची गरज असते.

पूर्वी दिवाणखान्यात घरातील एकमेव टोलाचे घडय़ाळ असायचे. मनगटावर बांधायचे घडय़ाळ हे बहुधा फक्त घरातील कर्त्यां व्यक्तीच्या मालकीचे असायचे. मुलगा दहावीच्या परीक्षेला निघाला की वडील त्यांच्या मनगटावरील घडय़ाळ मुलाला देत. हळूहळू घडय़ाळ्याचा संचार वाढला. ऐंशी-नव्वदच्या दशकात घडय़ाळ अगदीच स्वस्त आणि सर्वसंचारी झालं. दुरुस्त करण्याची भानगड नसणारी ‘वापरा आणि फेकून द्या’ प्रवृत्तीच्या घडाळ्यांचं फॅड बोकाळलं. वेळ दाखविणाऱ्या या छोटय़ा यंत्राला फॅशनच्या दुनियेतील दागिन्याचं वलय लाभलं. त्याला सोन्यामोत्यांनी मढवलं जाऊ लागलं. दूरसंचार क्षेत्रातील सध्या प्रचलित असणाऱ्या भ्रमणध्वनीने इतर अनेक सोयींप्रमाणे वेळ दाखविण्याचीही जबाबदारीही चोखपणे सांभाळली. सकाळचा अलार्मही मोबाइलवर लावण्यात येऊ लागला. वडिलांनी दिलेलं घडय़ाळ अभिमानाने मनगटावर मिरविणारी पिढी केव्हाच कालबाह्य़ झाली. आता दिवाणखान्यातील भिंतीवरील घडय़ाळाची निवड इंटीरिअर डिझायनर करतो. असं असलं तरी अजूनही विशिष्ट घडाळ्याविषयी ममत्व बाळगून असणारी अनेकजण अवतीभोवती दिसतात. सासरी नांदणाऱ्या नववधूंकडे माहेरहून आणलेल्या खास आठवणींच्या वस्तूंमध्ये घडय़ाळ असते. अनेक ज्येष्ठ नागरिकही वेळेसाठी नाही, पण त्याभोवतीच्या आठवणींसाठी जुनी घडय़ाळे जपतात..

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !