उत्सवाचे पर्यटन

स्वच्छ सूर्यप्रकाश, अथांग पसरलेला जलाशय, उत्तम प्रतीच्या आलिशान टेंटमध्ये राहण्याची सुविधा आणि त्यासोबत साहसी पर्यटनाची रेलचेल. असे सारे एकाच ठिकाणी मिळणारे ठिकाण म्हणजे मध्य प्रदेशमध्ये होणारा ‘जल महोत्सव’.

इंदिरा सागर धरणाच्या अथांग पसरलेल्या जलाशयाच्या शेजारी असलेल्या हनुवंतीया या टापूवर हा महोत्सव सध्या सुरू आहे. मध्य प्रदेश पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून हा महोत्सव आयोजित केला जातो. खांडवा जिल्ह्यतील या टापूचे भौगोलिक स्थान इतके अप्रतिम आहे की सारा थकवा केवळ तेथे पोहोचल्यावर लगेच दूर होतो. महोत्सवाच्या काळात या ठिकाणी टेंटचे शहरच वसवले जाते. मध्य प्रदेशच्या पारंपरिक कला-संस्कृतीचे दर्शन विविध कार्यक्रमांत होतेच, पण खास खाद्य पदार्थाचा आस्वाददेखील घेता येतो. विशेष म्हणजे या ठिकाणी जमीन, पाणी आणि आकाशातील अशा सर्व साहसी खेळांचा अनुभव घेण्याची सुविधा आहे.  फेब्रुवारी महिना संपेपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. खांडवापासून केवळ ५० कि.मी.वर हनुवंतीया वसलेले आहे.