18 November 2019

News Flash

घरातलं विज्ञान : जलशुद्धीकरण

सेडीमेंट फिल्टरमध्ये ५, १०, १५, २० मायक्रॉन एवढय़ा विविध क्षमतांच्या जाळय़ा उपलब्ध असतात

मनीषा बायस-पुरभे

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

पावसाळा सुरू झाला की विविध आजारांची लागणदेखील सुरू होते. बहुतेक साथीचे आजार हे दूषित अन्न व पाण्यामुळे होतात. डोळय़ांना नितळ, शुद्ध दिसणारे पाणी हे स्वच्छ असेलच असे नाही. कारण डोळय़ांना न दिसणारे अनेक सूक्ष्म जीव व घातक मूलद्रव्ये (उदा. आर्सेनिक, शिसे) व इतर क्षार पाण्यात विरघळलेले असतात. ज्यामुळे आपल्याला कॉलरा, अतिसार, मूतखडा असे आजार होण्याची शक्यता असते.

शुद्ध पाणी म्हणजे ज्यात आवश्यक प्रमाणात उपयोगी क्षार (कॅल्शियम, मॅग्नेशिअम इ.) व ऑक्सिजन मिसळलेले असतात. पाण्यात विरघळलेले क्षार हे ‘टीडीएस’ (Total Dissolved Solid) या मापनाद्वारे मोजले जातात. १००-३०० मि. ग्रॅम/लिटर ‘टीडीएस’ हे पाणी पिण्यासाठी उत्कृष्ट समजले जाते. तर १२०० मि. ग्रॅम/लिटर ‘टीडीएस’ हे पाणी आरोग्यास घातक ठरू शकते. १०० ‘टीडीएस’पेक्षा कमी असलेले पाणी शुद्ध असते. पण पिण्यास उपयोगी असेलच असे नाही. (Pure but not healthy) पाणी शुद्ध करण्याचा घरगुती उपाय म्हणजे त्याला उकळून घेणे पाणी ८५ अंश सेल्सिअसला काही मिनिटे उकळले असता पाण्यातील सूक्ष्म जीव मरण पावतात. म्हणून १०० अंश सेल्सिअसला १ मिनीट पाणी उकळले की त्यावर झाकण ठेवून गॅस बंद करावा. पाणी उकळले असता त्यातील शिसासारखे प्रदूषक वेगळे निघत नाहीत. त्यासाठी पाणी शुद्धीकरणाच्या वेगवेगळय़ा पद्धती अवलंबवाव्या लागतात. उदा. क्लोरिनेशन व फिल्टरचा वापर, क्लोरिनेशन करण्यासाठी बाजारात औषधे उपलब्ध आहेत. त्याचे दोन-तीन थेंब टाकले असता पाण्यातील सूक्ष्म जीव नष्ट होतात.

पाणी शुद्धीकरणाच्या पद्धतीनुसार जलशुद्धीकरण-यंत्राचे पुढील प्रकार पडतात. – आरओ, यूव्ही, यूएफ, अ‍ॅक्टिव्हेटेड कार्बन, सेडिमेंट फिल्टर आरओ (फी५ी१२ी ड२२्र२) या फिल्टरमध्ये पाणी ०.०००१ मायक्रॉन एवढय़ा सूक्ष्म छिद्र असणाऱ्या पटलातून दबावाखाली पाठवले जाते. त्यामुळे कीटकनाशक, सूक्ष्मजीव, आर्सेनिकसारखी जड मूलद्रव्ये गाळली जातात. ‘आरओ’मुळे बोअरवेलचे दुश्फेन पाणी सुफेन होऊ शकते. (hardwater changes to softwater) व पाण्याला गोड चवदेखील प्राप्त होते. पण त्यात पाण्याचा अपव्यय जास्त होतो. १ ग्लास पाणी मिळविण्यासाठी ३ ग्लास पाणी वाया जाते. मुंबईसारख्या शहरात जेथे नळाला तुलनेने स्वच्छ पाणी येते, तेथे फ ची आवश्यकता कमी असू शकते.

यूव्ही (Ultraviolet Filter) यात २५४ नॅनोमीटर तरंग लांबी असणाऱ्या किरणांच्या माऱ्यामुळे रोग फैलावणाऱ्या सूक्ष्म जीवांचा ‘डीएनए’ नष्ट केला जातो व सूक्ष्म जीवांच्या घातक परिणामापासून पाणी सुरक्षित राहते व पाण्याच्या चवीतदेखील कोणताच बदल होत नाही. पण जड मूलद्रव्ये गाळण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होत नाही. म्हणून सहसा ‘आरओ’ला कार्बन ब्लॉक फिल्टर किंवा यूव्ही फिल्टरची जोड दिली जाते. त्यासाठी विजेची आवश्यकता असते व यूव्ही बल्ब दरवर्षी बदलावा लागतो.

यूएफ (अल्ट्राफिल्टरेशन) या प्रकारात पोकळ धाग्यासारख्या पटलातून ०.००१ मायक्रॉन एवढय़ा सूक्ष्म छिद्रांतून पाणी गाळले जाते. सूक्ष्म जीव यातून गाळले जातात व क्षारांचे योग्य ते संतुलन साधले जाते.

अ‍ॅक्टिव्हेटेड कार्बन (सक्रिय कार्बन) या पद्धतीत कार्बनच्या व्यापक पृष्ठभागावरील रंध्राद्वारे पाण्यातील अशुद्धी शोषली जाते. ०.५ ते ५० मायक्रॉन आकाराचे कण या पद्धतीद्वारे गाळले जातात.

सेडिमेंट फिल्टरमध्ये अतिशय लहान जाळी असते. ज्यातून पाणी गाळले जाते. पण जड मूलद्रव्ये व रसायने त्यातून गाळली जात नाहीत. सेडीमेंट फिल्टरमध्ये ५, १०, १५, २० मायक्रॉन एवढय़ा विविध क्षमतांच्या जाळय़ा उपलब्ध असतात. तर मंडळी, पाणी शुद्ध करण्याच्या आवश्यकतेनुसार योग्य ती पद्धत वापरून आपले आरोग्य सांभाळूयात.

First Published on July 11, 2019 12:57 am

Web Title: water purification zws 70
Just Now!
X