ओंकार भिडे

वाहनातून प्रवास सुरक्षित होण्यासाठी पाश्चिमात्य देशांमधूनच संशोधन अधिक झाले आणि त्यामुळेच वाहन दुचाकी असो वा चारचाकी त्यामध्ये सुरक्षेची प्रणाली तिथेच बसवली जाऊ  लागली. अर्थात नव्या तंत्रज्ञानाप्रमाणे नवी सुरक्षा प्रणालीही पटकन आत्मसात झाली. पण स्टॅण्डर्ड फिटमेंट होण्यासाठी काहीसा कालावधी जायला लागला, मात्र आपल्याएवढा नक्कीच नाही. कारण भारतात अ‍ॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस), एअर बॅग्स, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम (सीबीसी) आता नव्या गाडय़ांना सक्तीचे झाले आहे.

Declaration of self-reliance and policy of import dependence
घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..
Transport system plays a vital role in strengthening the economy
पहिली बाजू: दळणवळणातून विकासाला ‘गतिशक्ती’

सीट बेल्ट

सीट बेल्टचा शोध जागतिक पातळीवर १९व्या शतकाच्या सुरुवातीस लागला आणि पुढे जाऊन कारमध्ये वापर सुरू झाला. सुरुवातीस पाश्चिमात्य देशांत सीट बेल्ट हा पर्यायी म्हणून दिला जात होता. मात्र चारचाकी वाहनांना होणाऱ्या अपघातांमुळे जीवावर बेतले जात होते. त्यामुळे निवडक देशांमध्ये साठ ते ऐंशीच्या दशकात सीट बेल्ट चारचाकीमध्ये स्टॅण्डर्ड फीचर झाले आणि त्याचा वापर अनिवार्य करण्यात आला. भारतातही कारचा सीटबेल्ट लावण्यासाठी कायदा करावा लागला. पण, स्वयंशिस्तीपेक्षा स्वत:ची सुरक्षितता म्हणून तरी त्याचे पालन शहरात असो वा ग्रामीण भागात वा कोणत्याही रस्त्यावर नक्कीच केले पाहिजे. कारण वेगात असताना अचानक ब्रेक दाबल्यामुळे सीटवरील व्यक्ती पुढे फेकली जाते आणि त्यातून दुखापत होण्याची वा जिवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळेच यापासून संरक्षण होण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सीटबेल्ट लावला पाहिजे. अर्थात, सीट बेल्ट लावूनही जिवावर बेतण्याच्या घटना घडल्या नाहीत, असे नाही. त्यातूनच चारचाकी वाहनामध्ये एअर बॅग्स हा सुरक्षिततेच्या नव्या पर्यायाचा शोध लागला.

एअर बॅग्स

एअर बॅग्सचा शोधही जागतिक पातळीवर साठच्या दशकातच लागला, पण कारमध्ये याचा वापर होण्यासाठी बराच कालावधी गेला. एअर बॅग्सचा शोध लावल्यानंतर त्यावर आणखी संशोधन करण्यास कार कंपन्या फारशा उत्सुक नव्हत्या. पण यामुळे अपघातात जिवावर आलेले संकट टळण्याची शक्यता वाढते, हे लक्षात आल्यावर त्याचा वापर प्रत्यक्षात करण्यासाठी वेगवान हालचाली झाल्या. पुढे जाऊन इलेक्ट्रोमॅग्नेटिक चिपमुळे चारचाकी वाहनामध्ये याचा वापर सुरू झाला, तर आता इलेक्ट्रॉनिक सेन्सरमुळे एअर बॅग्सचे योग्य इन्स्टॉलेशन करणे सोपे झाले. चारचाकीमध्ये विशेषत: कारमध्ये ड्रायव्हर, को ड्रायव्हर, पॅसेंजर साइड एअर बॅग्स असतात. भारतात निवडक कारमध्येच सहा एअरबॅग्स येतात. आता सक्तीचे झाल्याने कारमध्ये ड्रायव्हर व को ड्रायव्हर एअर बॅग सक्तीची झाली आहे. ड्रायव्हर एअरबॅग ही स्टिअरिंगमध्ये म्हणजेच हॉर्नच्या जागी बसविलेली असते, तर को पॅसेंजर एअर बॅग डॅशबोर्डवर असते. उरलेल्या म्हणजे साइड एअर बॅग्स या दाराच्या वर आतील बाजूने कडेला बसविण्यात आलेल्या असतात. विशिष्ट वेगाने गाडी पुढून वा बाजून धडकल्यास वा त्यावर अपेक्षित दबाव पडल्यास सेन्सर सेकंदाच्या कितीतरी कमी भागात कार्यान्वित होतात व एअर बॅग्स या फुगून बाहेर येतात.

ईबीडी

गाडीचे वजन, वेग, रस्त्याची स्थिती, यांच्या आधारावर इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन (ईबीडी वा इलेट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन-ईबीएफडी) हे ऑटोमोबाइल ब्रेक तंत्रज्ञान गाडीच्या प्रत्येक चाकावर ब्रेकचा दाब निश्चित करण्याचे काम करते. अ‍ॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीमबरोबर ईबीडीचे काम उत्तम होते. तसेच, वाहनावर नियंत्रण राखत वेग उत्तमपणे नियंत्रणात आणणे यामुळे शक्य होते. वाहनाच्या पुढील चाकावर सर्वाधिक दाब असतो आणि त्यामुळे ईबीडी मागील चाकावर ब्रेकचा दाब कमी टाकते. परिणामी, चाक वा ब्रेक लॉक होत नाही आणि गाडी घसरत नाही. काही वेळा गरजेनुसार मागील चाकावरही ईबीडी ब्रेकचा दाब पोचविते. एबीएसबरोबर कारला ईबीडी असल्यास सुरक्षितता आणखी वाढते. सध्या फार कमी वाहनांत दोन्ही सिस्टीम आहेत.

एबीएस म्हणजे..

अ‍ॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस) ही वाहनांना बसविण्यात येणारी ब्रेक संदर्भातील सुरक्षा प्रणाली आहे. पारंपरिक ब्रेकिंग सिस्टीममध्ये अचानक ब्रेक दाबल्यामुळे चाके लॉक होतात व गाडी घसरते. पण एबीएसमुळे पुढील आणि मागील चाकाच्या ब्रेकमध्ये समन्वय साधला जातो. तसेच या सिस्टीममुळे चाके लॉक न होता एका सेकंदामध्ये कितितरी वेळा ब्रेक लागला जातो. परिणामी गाडी घसरत नाही. यामुळे ओल्या रस्त्यावरही एबीएस उत्तमपणे कार्य करते, असा अनुभव आहे. जागतिक पातळीवर १९२९ मध्ये पहिल्यांदा विमानासाठी ही प्रणाली विकसित झाली. त्यानंतर पुढे साठच्या दशकात सर्वप्रथम दुचाकीसाठी व नंतर सत्तरच्या दशकात कारमध्ये वापरली गेली. या सिस्टीममध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मोडय़ूल असते आणि याच्या आधारेच ब्रेकचा दाब निश्चित होत असतो.

सीबीएस म्हणजे..

अनेक तज्ज्ञ वा जुणे जाणकार दुचाकीला ब्रेक लावताना मागील व पुढील ब्रेक एक समान दाबाने लावायला सांगतात, हे आपण कदाचित ऐकले असेल. यामुळे अचानक ब्रेक दाबवल्यावर गाडी घसरण्याची शक्यता कमी होते. पण, प्रत्येकाला असा ब्रेक लावणे शक्य होईल की नाही, हे सांगता येत नाही. जागतिक पातळीवर एकाचवेळी दोन्ही चाकांना ब्रेक लावण्याची सिस्टीम फार पूर्वीच विकसित झालेली आहे. त्याला कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टीम म्हणतात. एका इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या माध्यमातून दुचाकीचा पुढील व मागील ब्रेक नियंत्रित होत असतो. होंडाने २००९ मध्ये भारतात सर्वप्रथम हे तंत्रज्ञान आणले. कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम पुढील वा मागील ब्रेकचा लिव्हर दाबल्यावर दोन्हीही ब्रेक समान दबावाने लागतात. यामुळे दुचाकीवर नियंत्रण (दुचाकीचा नियंत्रित वेग असल्यास) मिळविता येऊ  शकते. कोणत्या ब्रेक लिव्हरवर दोन्ही ब्रेकचे नियंत्रण द्यायचे, हे कंपनीनुसार बदलू शकते. पण एबीएसच्या तुलनेत कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम ही किमतीमध्ये रास्त ब्रेकिंग प्रणाली आहे.

सीबीसी

कॉर्नरिंग ब्रेकिंग कंट्रोल (सीबीसी) सिस्टीमचा वापर सर्वप्रथम लक्झरी कार उत्पादक कंपन्यांनी सुरू केला. अ‍ॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीमच्या पुढील श्रेणीची सिस्टीम आहे. कार वळत असताना चाकावरील दाब बदलत असताना ही सिस्टीम कार्यरत होते. यामुळे वाहनचालकाला गाडीवर नियंत्रण राखता येते. भारतात निवडक कारमध्येच सीबीसी उपलब्ध आहे. केवळ हायएंड मोटरसायकलमध्येच ब्रेकिंगचे हे सुरक्षा फीचर आहे.