बाजारात नवीन काय?

टाटाने मागील आठवडय़ात अल्ट्रॉझ ही त्यांची नवी प्रीमियम हॅचबॅक बाजारात दाखल केली आहे. टाटाच्या नव्या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आलेली ही पहिली मोटर असून कंपनीला या मोटारीकडून अनेक अपेक्षा आहेत.

टाटाची नवी अल्ट्रॉझ ह्य़ुंदाईची आय २०, मारुती सुझुकी बलेनो या गाडय़ांना स्पर्धा देणार आहे. प्रीमियम हॅचबॅकची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन एक अत्यंत सुविधासंपन्न मोटार बनविण्याचा टाटाचा प्रयत्न अल्ट्रॉझमध्ये दिसून येतो. ही गाडी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

गाडीचे डिझाइन अत्यंत आक्रमक आणि नावीन्यपूर्ण ठेवण्यात आले आहे. तरीही यात टाटाची अभिजात शैली पाहायला मिळते. ही गाडी टाटाच्या ४५ एक्स या नव्या संकल्पनेवर आधारित आहे. गाडीला अधिकाधिक व्यवहार्य बनविण्यासाठी यात अत्यंत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. खिडक्यांना त्रिकोणात बसवणाऱ्या चौकटीत काळा रंग वापरण्यात आल्याने त्या अधिक उठावदार दिसतात. मागील दार उघडण्यासाठी खिडकीच्या मागे हॅण्डल दिले आहे. म्हणजे मागील दाराचे डिझाइन अत्यंत सोपे आणि सरळ आहे.

महत्त्वाचे म्हणजे गाडीच्या मागील भागाचे तळ सपाट आहे. त्यामुळे मध्ये बसलेल्या प्रवाशाला बसताना पायाला अडचण जाणवणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाडीची चारही दारे ही काटकोनात उघडतात. म्हणून गाडीत बसणे आणि उतरणे अगदी सोपे होऊन जाते.

गाडी १. ५ लिटर डिझेल इंजिन आणि १.२ लिटर पेट्रोल इंजिन या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. पेट्रोल इंजिनमध्ये ८५ पी एस/ ११३ एनएम टॉर्क निर्माण होतो तर डिझेल इंजिन ९० पी एस/ २०० एनएम टॉर्क निर्माण होतो. गाडी महामार्गावर आणि ग्रामीण रस्त्यांवरही उत्तम कामगिरी करण्यास सक्षम आहे. अल्ट्रॉझ ही नव्या बहुद्देशीय प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली असल्याने याच प्लॅटफॉर्मवर ऑटोमॅटिक किंवा इलेक्ट्रिक वाहने बनवली जाऊ  शकतात. यामुळे येत्या काळात अल्ट्रॉझ हे ऑटोमॅटिक पर्यायात उपलब्ध होऊ  शकते.

गाडी सिटी आणि इकॉनॉमी या दोन ड्रायव्हिंग मोडमध्ये उपलब्ध आहेत. गाडीच्या अंतर्गत रचनेत सौंदर्य आणि सोयींवर लक्ष देण्यात आले आहे. गाडीत अँबीयन्ट प्रकाश योजना देण्यात आली आहे. ७ इंची टचस्क्रीन देण्यात आली आहे. यात अँपल कार प्ले आणि अ‍ॅण्ड्रॉइड ऑटोची सुविधा देण्यात आली आहे. इन्स्ट्रमेंट क्लस्टर हे सेमी डिजिटल आहे. यात गाडीसंबंधी विविध माहिती दिसते. गाडीला डी आकाराचे स्टिअरिंग देण्यात आले असून गाडीतील यंत्रणा नियंत्रित करण्यासाठी यावर बटणे दिली आहेत. यासह क्रूझ कंट्रोल, स्वचलित वायपर आणि स्वचलित हेडलॅम्प्स, इंधन बचत यंत्रणा या गाडीत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अलॉय व्हील्स, डेटाईम रनिंग लाईट अशा अनेक

सुविधा गाडीत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गाडीच्या सर्व पर्यायांमध्ये दोन एअरबॅग आणि एबीएस देण्यात आले आहेत. या श्रेणीतील सर्वात सुरक्षित गाडी आम्ही तयार केली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अल्ट्रॉझच्या रूपाने

आम्ही केवळ भारतासाठी नाही तर एक

जागतिक दर्जाचे वाहन बाजारात आणले असल्याचे  टाटा मोटर्सचे अध्यक्ष मयंक परिक यांनी म्हटले आहे. तर टाटा मोटर्स नेहमीच ग्राहकांची गरजा लक्षात ठेवून वाहने निर्माण करीत असून अल्ट्रॉझ त्याला अपवाद नसल्याचे टाटाचे विपणन प्रमुख विवेक श्रीवात्सव यांनी म्हटले.

‘अल्ट्रॉझ’ची वैशिष्टय़े

  • अल्ट्रॉझ ही कंपनीच्या अल्फा या नव्या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे. यामुळे एका सामान प्लॅटफॉर्मवर विविध श्रेणीतील मोटारी बनवणे टाटाला शक्य झाले आहे.
  •   अल्ट्रॉझ ही हॅचबॅक असली तरी गाडी ऐसपैस असून सामान ठेवण्यासाठी या गाडीत मुबलक प्रमाणात जागा आहे.
  •  हॅचबॅक श्रेणीतील सर्वात मोठी बूट स्पेस अल्ट्रॉझमध्ये असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
  • गाडीत १५ लिटरचा ग्लोव्ह बॉक्स देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दरवाज्यामध्ये छत्री ठेवण्यासाठी जागादेखील देण्यात आली आहे.
  •   गाडीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसून प्रीमियम हॅचबॅकच्या श्रेणीत अल्ट्रॉझच्या रूपाने एक मजबूत दावेदार टाटाने बाजारात उतरवला आहे.