यशोधन जोशी

युरोपात अनेक ठिकाणी वायनरी आणि वाइन टेस्टिंग हे प्रकार सर्रास आढळतात. ऑस्ट्रियातदेखील आहेत. पण लोकप्रिय पर्यटन ठिकाणच्या पलीकडे स्टायरियामधील वाइन स्ट्रीटचा आनंद घेणे हे विशेषच आहे. ऑस्ट्रियाच्या स्टायरिया प्रांतातील ग्राझ शहराच्या दक्षिणेस तीन वाइन स्ट्रीट एका ठिकाणी एकत्र येतात. डोंगरातून द्राक्षांच्या मळ्याच्या बाजूने जाणारे हे छोटे रस्ते. फार फार तर दोन चारचाकी वाहनं जाऊ  शकतील इतकेच. मध्यम उंचीच्या निसर्गरम्य डोंगरातून हे तीन रस्ते जातात. तीनही ठिकाणच्या वाइनची चव वेगळी.

स्टायरियामध्ये मुख्यत: व्हाइट वाइन मिळते, पण या तीन वाइन स्ट्रीटपैकी शिल्शर वाइन स्ट्रीटची वाइन एकदम वेगळी आहे. शिल्शर हे त्या द्राक्षाचे नाव. ही वाइन नेहमीच्या व्हाइट आणि रेड प्रकारची नाही तर ‘रोझ’ आहे. रंग बराचसा कांद्याच्या सालीसारखा. चवीला बऱ्यापैकी आंबट. त्या चवीची सवयच व्हावी लागते. एरवी वाइनमध्ये पाणी घातले तर तुम्ही वेडय़ातच निघाल, पण या वाइनमध्ये स्थानिकदेखील आंबटपणा कमी करण्यासाठी कधी कधी पाणी घालताना दिसतात.

या द्राक्षाची प्रजाती फारशी विकसित केलेली नाही. शिल्शर खूप जुनी असली तरी तिला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चौकटीत आणण्याचे प्रयत्न अलीकडचेच. त्यामुळे आता शिल्शर चोखंदळ वाइन रसिकांची आवडती झाली आहे. पण या तिन्ही वाइन स्ट्रीटवरील वाइन या बहुतांशपणे स्थानिकच आहेत. अनेक बाटल्यांवर लेबलदेखील नसते.  पर्यटनदृष्टय़ा फारसा विकसित न झालेला आणि पाहिला न जाणारा हा प्रदेश. या रस्त्यांवरून वाहनाने भटकणे, वाइन टेस्टिंग करणे आणि तेथील रेस्टॉरंटमध्ये स्थानिक पदार्थाचा आस्वाद घेणे हे नक्कीच आनंददायी आहे.  येथे वाइनबरोबर कोल्ड कट आणि अत्यंत तिखट हॉर्स रॅडिश म्हणजे मुळा कसा तिखट असतो तसा हा प्रकार दिला जातो. अगदी डोळ्यात पाणी आणणारा. मात्र तेथील मस्त थंडीत भाजलेले चेस्टनट शिल्चर वाइनबरोबर खाण्यास मजा येते. व्हिएन्नाला गेल्यावर थोडीशी वाट वाकडी करून स्टायरिया प्रांतात जायला काहीच हरकत नाही.