|| आशुतोष बापट

यंदा अगदी कंटाळा येईपर्यंत पाऊस झाला. त्यामुळे आता छान थंडी पडायला सुरुवात झाली आहे. सकाळी धुक्याची दुलई आणि दिवसभर छान गार हवा! भटकंतीसाठी उत्तम वेळ. त्यामुळे आता महाबळेश्वर, भीमाशंकर दिवेआगर-हरिहरेश्वरमध्ये गर्दी होईल. ही गर्दी टाळू इच्छिणाऱ्यांसाठी काही पर्याय..

थंडीत एखाद्या शांत ठिकाणी जावं, थोडीशी पायपीट करावी, नाहीतर एखादा मस्त ट्रेक करावा आणि फ्रेश व्हावं असं वाटतंय? मग गर्दी करणाऱ्यांना जाऊ  देत नेहमीच्या जागी. आपण जरा हटके ठिकाणी जाऊया. सह्याद्रीची आपल्याला लाभलेली साथ हे आपलं मोठं भाग्यच समजायला हवं. या गुलाबी थंडीत सह्याद्रीच्या कुशीत, त्याच्या अंगाखांद्यावर केलेली भटकंती नेहमीच भन्नाट असते. सह्याद्रीच्या कण्यावर म्हणजे घाटमाथ्यावर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जर भटकायला मिळालं, ऐन घाटावर काही ठिकाणी रमतगमत फिरता आलं, काही ऐतिहासिक ठिकाणं पाहता आली तर त्यासारखी चैन नाही.

त्रिंगलवाडी-कावनई

इगतपुरीपासून जवळच असलेली ही दोन ठिकाणे. या दोन्ही ठिकाणी छोटेखानी किल्ले आहेत. त्रिंगलवाडीच्या पायथ्याला जैन लेणी असून आत तीर्थंकरांची मूर्ती स्थापन केलेली आहे. मूर्तीच्या मांडीवर शिलालेख पाहायला मिळतो. जवळच असलेले कावनई क्षेत्र हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्रिंबकेश्वरला कुंभमेळ्यासाठी आलेले साधू पुढे कावनई इथेही येऊन भेट देतात. काहीजणांच्या मते कावनई इथेच पूर्वी कुंभमेळा भरत असे. हा सगळा परिसर भटकायला सुंदर आहे. ऐन थंडीत ढग खाली उतरलेले असतात. इथून नाशिक किंवा मुंबईला जाता येते अन्यथा इथून पूर्वेकडे आल्यावर घोटीवरून कळसुबाईकडेसुद्धा येता येईल. कळसुबाई हे तर प्रसिद्ध ठिकाण झाले, पण परिसरात असलेले आड-औंढा-पट्टा-बितिंगा हे किल्ले मात्र सहज करता येतील. पूर्वी हे किल्ले करायचे म्हणजे ४ दिवस काढावे लागायचे. हल्ली मात्र या किल्ल्यांवर पवनचक्क्या बसवल्या असल्यामुळे अगदी शेवटपर्यंत गाडीरस्ता केलेला आहे. पट्टा किल्ला आवर्जून बघावा. छत्रपती शिवरायांनी इथे जवळजवळ एक महिना विश्रांतीसाठी मुक्काम केलेला होता. किल्ल्यावर जायला उत्तम पायऱ्या आहेत. किल्ल्याचा आकार एखाद्य वाळवलेल्या पट्टय़ासारखा दिसतो. किल्ल्यावरून समोरच्या बाजूला औंढा किल्ल्याचा सुळका आणि पवनचक्कय़ा सुंदर दिसतात. गडावर एक मोठी कोठीसदृश वास्तू आजही उभी आहे. त्याच्या बाहेरच छत्रपतीं शिवरायांचा देखणा पुतळा उभारलेला आहे. इथून परत संगमनेरमार्गे येताना जरा रस्ता वाकडा करावा आणि टाहाकारी इथे असलेले अत्यंत सुंदर प्राचीन शिल्पजडित जगदंबेचे मंदिर पाहून घ्यावे. या मंदिरावर विविध अप्सराची म्हणजेच सुरसुंदरींची शिल्पे कोरलेली आहेत. तसेच या मंदिराचे दगडी छत आणि त्यावर केलेली कलाकुसर फारच अप्रतिम आहे.

भटकणाऱ्या माणसाला सह्याद्री कधी काही कमी पडू देत नाही. काहीतरी नवीन पहायची इच्छा मात्र हवी. ऐन थंडीत रुळलेली चाकोरी सोडून घाटमाथ्यावर जरा वेगळीकडे फिरले तर गर्दी अजिबात लागत नाही आणि अगदी आगळेवेगळे आणि तितकेच सुंदर काहीतरी पाहिल्याचे समाधान मात्र नक्की लाभते.

धुक्यात हरवलेले साम्रद

रतनगड भंडारदरा परिसर वर्षभर कधीही गेलं तरी सुंदरच असतो. याठिकाणी आता गाडीरस्ता झाल्यामुळे संपूर्ण परिसराची परिक्रमा करता येते. शेंडीवरून भंडारदरा जलाशयाला वळसा घालून रतनगडाच्या मागच्या बाजूला असलेल्या साम्रद गावी जावे. ऐन घाटमाथ्यावर वसलेले हे सुंदर आणि टुमदार खेडं. रतनगडाला साम्रद दरवाजा आहे. तिथून उतरून या गावात येऊ शकतो. साम्रदचा परिसर अत्यंत रमणीय आहे. इथेच पश्चिम बाजूला आहे सुप्रसिद्ध सांदण दरी. निसर्गत:च डोंगराला पडलेली प्रचंड मोठी भेग ज्याची लांबी किलोमीटरपेक्षा जास्त आहे. यातून पावसाळ्यात पाणी वाहात असते. पण ऐन हिवाळ्यात या दरीत जावे. खडकातून उतरत उतरत जाणारा रस्ता आणि आपल्या बाजूचे दोन्ही कडे उंचच उंच गेलेले असतात. एका ठिकाणी इथे दोर लावून उतरावे लागते. अन्यथा इथूनच परत मागे फिरावे. साम्रद गावी राहण्या-जेवणाची उत्तम सोय होते. तंबूमध्येसुद्धा राहता येते. नितांत सुंदर असलेल्या साम्रद गावाच्या पाठीशी उभा आहे किल्ले रतनगड आणि त्याचा खुटा.

निसर्गरम्य अहुपे

सह्याद्रीची अनेक रूपे न्याहाळावी अशीच असतात. तो कधी रौद्र दिसतो तर कधी रम्य दिसतो. पण तो आहे राकट, कणखर आणि अत्यंत सुंदर. एकदा त्याच्या प्रेमात माणूस पडला ना की तो ‘वाया गेलाच’ म्हणून समजावे. सह्याद्रीच्या सान्निध्यात कितीही दिवस मजेत घालवता येतात अशीच त्याची जादू आहे. असाच विविध रूपांतला सह्याद्री आणि त्याच्या अजस्र कडय़ांचे नितांतसुंदर दृश्य पाहायचे असेल तर अहुपे घाटात जायलाच हवे. भीमाशंकरजवळ असलेले हे ठिकाण अत्यंत रमणीय आहे. निसर्गाची उधळण, आजूबाजूला डोंगरदरी, जवळच गर्द देवराई, आणि इतके असूनही वर्दळ अजिबात नाही असे हे ठिकाण आहे. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणारे जे अनेक घाटरस्ते आहेत त्यातलाच हा एक अहुपे घाट. मंचरवरून घोडेगाव-डिंभे रस्त्याने अहुपे हे ५२ किलोमीटर अंतर आहे. रस्ता वळणावळणांचा आहे. डावीकडे डिंभे जलाशय कायम सोबतीला असतोच. बुब्रा नदीवरील पूल लागला की समजावे आपण आता आलोच अहुप्याला. अहुप्याच्या शेजारीच एक मोठा कडा आहे त्याला ढग असे म्हणतात. त्याच्या अलीकडच्या कडय़ाला वराडा असे नाव आहे तर डावीकडे असलेल्या कडय़ाला टेकतवणे असे नाव आहे. सरत्या पावसाळ्यात इथे आलात तर या कडय़ावरून एक भन्नाट धबधबा खाली कोसळताना दिसतो. वाघमाचा धबधबा असं याला स्थानिक लोक म्हणतात. या गावाच्या अलीकडे आहे रम्य देवराई. जवळच आहे वचपे गावचे प्राचीन सिद्धेश्व्र मंदिर. अहुप्याच्या अलीकडे असलेल्या पिपरगणे गावातून दुर्ग आणि धाकोबा ही शिखरे दिसतात. अहुप्याच्या अलीकडे एक छोटी देवराई आहे. तिच्या अलीकडे खाली घोड नदीचे उगमस्थान दिसते. पूर्वी इथे अश्व्मुखी असलेल्या दरीतून पाण्याचा प्रवाह वहात असे. त्यामुळे या प्रवाहाला-नदीला घोड नदी असे नाव पडले. अजून एक छान उल्लेख घोडनदीच्या बाबतीत मिळतो. चंद्र्लेहानी पुराण हा ग्रंथ जैन पंडित बुद्रहंसेन याने लिहिला आहे. त्यात तो घोडनदीचा उल्लेख गोर नदी असा करतो. गोर नदीकाठचे सीरवर म्हणजे घोडनदीकाठचे शिरूर असा संदर्भ काही तज्ज्ञ मंडळी सांगतात. घोड नदीचे पाणी इथे पांढरट भुरकट दिसते म्हणूनही त्याला गोरं पाणी गोरनदी असे म्हणत असावेत.  तिथे भैरोबाचे मंदिर आणि काही भग्न शिल्पावशेष दिसतात. अहुप्यातून घाटवाटेने गेले की पायथ्याचे खोपिवली गाव लागते. समोरच गोरखगड आणि मच्छिंद्र सुळका कायम दर्शन देतो.