घरातल्या घरात

आपल्या घरात स्टोअरेजची समस्या नेहमीचीच असते. खरं तर घरात जास्त किंवा अनावश्यक सामान साठवून ठेवणे, चुकीचेच. पण ते जरी वजा केलं तरी, ‘स्टोअरेज’ची कमतरता आपल्याला जाणवतेच. अशा वेळी तुम्ही लाकडी खोक्यांचा वापर करून घरातल्या घरात आकर्षक स्टोअरेज बनवू शकता. अगदी शोभिवंत वस्तू ठेवण्यापासून पुस्तकांचे कपाट बनवण्यापर्यंत अनेक बाबतीत तुम्ही घरबसल्या हे स्टोअरेज बनवू शकता. यासाठी लागणारे लाकडी खोके तुम्हाला सहजासहजी बाजारात मिळणार नाहीत. मात्र आंब्याच्या पेटय़ांसाठी विशेषत: फळे निर्यात करण्यासाठी खोके बनवणाऱ्या किंवा निर्यातदारांकडे तुम्हाला अशी खोकी मिळू शकतील.

साहित्य

आठ लाकडी खोकी ल्ल  सॅण्डपेपर ल्ल ड्रिलिंग मशीन आणि स्क्रू ल्ल  वूड पेंट किंवा वॉलपेपर

कृती

सर्वप्रथम लाकडी खोकी घेऊन त्यांची आपल्याला हव्या त्या पद्धतीने रचना करा. यात तुम्ही एक उभे, एक आडवे खोके अशा रितीने मांडणी करू शकता किंवा सगळेच उभे किंवा सगळेच आडवे या पद्धतीनेही त्यांची रचना करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी हे स्टोअरेज ठेवणार आहात त्या जागेचा, कोपऱ्याचा किंवा भिंतीचा विचार करूनच खोक्यांची रचना करा. ही रचना झाल्यानंतर खोक्यांना सर्व बाजूंनी सॅण्डपेपरने घासून त्यावरील तुटलेले लाकडी तुकडे, कण हटवा. यानंतर त्या खोक्यांना आकर्षक पद्धतीने रंगवा. तुम्ही त्यांना वॉलपेपर चिकटवून वेगळा प्रयोगही करू शकता. आता पुन्हा तुम्ही ठरवलेल्या रचनेनुसार खोक्यांची मांडणी करा आणि आवश्यक त्या ठिकाणी ड्रिलिंग मशिनने छिद्र पाडून स्क्रूने खोकी जोडून घ्या. तुमचे ‘स्टोअरेज’ तयार!